नवनिर्मितीक्षम एआयची (‘जनरेटिव्ह एआय’) खासियत म्हणजे संगणकाला न शिकवलेल्या गोष्टींच्या बाबतीतसुद्धा तो स्वत:च नवनिर्मिती करू शकतो! म्हणजे जणू संगणकाला आपण त्याचं मन दिलं आणि त्याचबरोबर त्याला स्वत:ची स्वप्नं बघण्याची क्षमतासुद्धा दिली, असं आपण म्हणू शकतो.
एआयची खासियत म्हणजे आपण आधी संगणकाला शिकवायचं आणि त्याचबरोबर कसं शिकायचं हेसुद्धा शिकवायचं. त्यानंतर संगणक स्वत:च शिकून सगळी कामं स्वत: करायला लागतो. नवनिर्मितीक्षम एआय (‘जनरेटिव्ह एआय’) ची खासियत म्हणजे संगणकाला न शिकवलेल्या गोष्टींच्या बाबतीतसुद्धा तो स्वत:च नवनिर्मिती करू शकतो! म्हणजे जणू संगणकाला आपण त्याचं मन दिलं आणि त्याचबरोबर त्याला स्वत:ची स्वप्नं बघण्याची क्षमतासुद्धा दिली, असं आपण म्हणू शकतो. आणखी सोपं करून सांगायचं तर एआयचा वापर करून आपण त्याला दाखवलेलं चित्र कुत्र्याचं आहे का मांजराचं; असं विचारल्यावर आपल्याला तो बरोबर उत्तर देतो. नवनिर्मितीक्षम एआय मात्र याच्यापुढे जाऊन कुत्रा आणि मांजर यांचं मिश्र चित्र काढून आपल्याला देऊ शकतो. एआय मोनालिसाचं चित्र अगदी हुबेहूब, जसंच्या तसं आपल्याला काढून दाखवू शकतो. नवनिर्मितीक्षम एआय आजवर कुणी काढलेलं नसेल असं नवंच अद्भुत चित्र काढू शकतो. म्हणजेच नवनिर्मितीक्षम एआयमध्ये अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची नवनिर्मिती करण्याची अभूतपूर्व क्षमता असते.
इतके दिवस एआयचं तंत्रज्ञान दिलेल्या माहितीचं पृथक्करण करणं, तिचं विश्लेषण करणं, त्यातून अंदाज बांधणं किंवा एखाद्या गोष्टीविषयी अचूकपणे भाष्य करणं यात निष्णात होतं. क्रेडिट कार्डाचा व्यवहार योग्य का भामट्याचा, चित्र कुत्र्याचं का इतर कुठल्या प्राण्याचं; अशा प्रकारची कामं एआय सहजपणे करू शकत असे. आता मात्र स्वत:हून निर्मिती करण्याचं काम एआय करायला लागलं आहे. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ. आपण एका लहान मुलाला प्राण्यांविषयी माहिती देत आहोत; असं समजू.
कुत्र्याचं चित्र दाखवून त्याचे चार पाय, त्याची शेपटी, त्याचं भुंकणं अशा गोष्टींविषयी आपण त्या मुलाला सांगू. हळूहळू आपण इतर प्राण्यांचे गुणधर्म त्यांच्या चित्रांसह दाखवून त्या मुलाला अनेक प्राण्यांविषयीची माहिती देऊ. यामुळे तो मुलगा हे सगळे प्राणी ओळखायला लागेल. आता यापुढे जाऊन आपण त्या मुलाला त्यानं तोपर्यंत न बघितलेल्या एका प्राण्याचं नुसतं बाह्य रेखाटन दाखवलं आणि त्याला त्यामधले तपशील स्वत:च्या कल्पनाशक्तीनुसार भरायला सांगितले तर? एआयच्या विश्वात लहान मुलांसारखी ही नवनिर्मितीची संकल्पना साकारण्यासाठी ‘जनरेटिव्ह ?डव्हर्सियल नेटवर्क (गॅन)’ नावाच्या संकल्पनेचा वापर केला जातो.
२०१४ साली इयन गुडफेलो आणि त्याचे काही सहकारी यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. हा एकदम खासच प्रकार आहे. त्यात दोन घटक असतात: निर्माता (क्रिएटर) आणि टीकाकार (डिस्क्रिमिनेटर). निर्माता जणू एखाद्या उत्साहानं सळसळणाऱ्या क्रियाशील मुलासारखा निर्मिती करतो; तर टीकाकार एखाद्या शिक्षकासारखं या निर्मितीचं रास्त मूल्यमापन करतो. या भन्नाट संकल्पनेमुळे निर्मात्याला आपल्या कामात अधिकाधिक अचूकता आणणं भाग पडतं आणि मानवनिर्मित आणि यंत्रनिर्मित या दोन निर्मितींमधला फरक जवळपास नष्ट होईल इतकी अद्भुत क्षमता त्यात येते. उदाहरणार्थ अगदी हुबेहूब माणसारखं दिसणारं; पण आजवर कुठल्याही माणसाचं नसलेलं रुपडं असलेला चेहरा यातून तयार होऊ शकतो. तसंच अगदी एखाद्या माणसानं लिहिलेली असावी अशी कथा यंत्राद्वारे निर्माण करता येते.
नवनिर्मितीक्षम एआयचं सगळ्यात गाजलेलं रूप म्हणजे अर्थातच चॅट जीपीटी. चॅट जीपीटी मधल्या जीपीटीचा अर्थ ’जनरेटिव्ह प्रीट्रेण्ड ट्रान्स्फॉर्मर’ असा आहे. एआयच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात क्लिष्ट आणि बनवायला अवघड असलेल्या भाषांविषयीच्या कामांमध्ये चॅट जीपीटी सद्यास्थितीला जगात सर्वोत्तम आहे असं मानलं जातं. चॅट जीपीटीनं माणसांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना दिलेली उत्तरं ही जणू माणसानंच दिलेली असावीत अशा प्रकारची सफाई त्यात आहे. अर्थात याला गुगल कंपनीचं जेमिनी, मेटा कंपनीचं लामा असे प्रतिस्पर्धी आहेत. चॅट जीपीटी वापरायला खूप सोपं आहे. त्याच्या वेबसाइटवर जाऊन आपण आपली नोंदणी केल्यावर आपण त्याला कुठलेही प्रश्न विचारू शकतो. नमुन्यादाखल काही प्रश्न चॅट जीपीटी आपल्यासमोर मांडतोसुद्धा. विज्ञानामधल्या क्लिष्ट संकल्पनांपासून अगदी किरकोळ गोष्टींपर्यंत अगदी काहीही आपण चॅट जीपीटीला विचारू शकतो. सॉफ्टवेअर लिहिणारे प्रोग्रॅमर्स आपले प्रोग्रॅम्ससुद्धा चॅट जीपीटीकडून लिहून घेऊ शकतात! यातून अनेक नवे प्रश्न निर्माण होतात. चॅट जीपीटी लेखकांना कथा लिहून देऊ शकतं. यापुढे जाऊन लेखक, कवी, गीतकार, पत्रकार, ब्लॉगर अशा लोकांची गरजच काय; अशा प्रश्न काही जण बोलून दाखवतात. आपल्याला हव्या असलेल्या विषयावर काल्पनिक किंवा वस्तुनिष्ठ अशा कुठल्याही प्रकारचा मजकूर चॅट जीपीटी तयार करून देतं. हा मजकूर एखाद्या माणसानं लिहावा तसा हुबेहूब वाटतो. शिक्षकांना विद्यार्थ्यांची उत्तरं तपासताना हे विद्यार्थ्यानं लिहिलं आहे का चॅट जीपीटीनं, हे समजूदेखील नये इतकी सफाई त्यात असते.
हा विषय अफाट असल्यामुळे त्याविषयी आणखी पुढच्या वेळी.
akahate@gmail. com