डॉ. श्रीराम गीत
नमस्कार सर, मी यंदा बी.ए. प्रथम वर्षांला आहे. मला दहावीला ८६ टक्के व बारावीला विज्ञान शाखेतून ६२ टक्के मिळाले. मी यूपीएससी करण्याचे ठरवले आहे, मराठी माध्यमातून आणि आता सध्या स्व-अभ्यास करणार आहे. तरी पण अभ्यासाला कशी सुरुवात करावी? थोडे मार्गदर्शन करावे.- अंजली नागरगोजे.




तुझे बी.ए.चे विषय कळवलेले नाहीस. तसेच माध्यम पण कळवलेले नाहीस. त्यामुळे मी मोघम सल्ला देत आहे. इंग्रजी वाचन सुरू कर. रोज दहा पाने वाचत रहा. त्यातील सहा पाने तुम्ही घेतलेल्या विषयाशी संबंधित इंग्रजी माध्यमातील पुस्तकाची वाच. तर चार पाने एखाद्या इंग्रजी पुस्तकाची वाचत रहा. एखादे इंग्रजी वृत्तपत्र सलग आठवडाभर वाचत रहा. दररोज नवीन मराठी वृत्तपत्रातील अग्रलेख वाचून त्याचा अर्थ समजून घे. ताज्या बातम्यातून पूर्ण संदर्भ व टिपणी काढत रहा. उदाहरणार्थ चीनमध्ये सध्या आशियाई गेम्स चालू आहेत. याआधी भारताने आशियाई स्पर्धा कुठे कुठे काय काय जिंकले व कोण कशात हरले हे तुझी तीन वर्षांची टिपणे वाचताना तुला कळू शकेल. एम.ए. करायला सुरुवात कर व त्या वेळेला यूपीएससीचा क्लास लावून तयारी करायची का सेल्फ स्टडी करायचा याचा विचार तुझा तुलाच करायचा आहे. या साऱ्याची चर्चा आई-वडिलांशी सविस्तर करून किती प्रयत्न करायचे, याला त्यांचा पाठिंबा आहे व आर्थिक पाठबळ कसे देणार आहेत हे नक्की करावे.
दहावीला ८२.६० टक्के, त्यानंतर १२ सायन्स मध्ये ७६ टक्के आहेत. आता बीएस्सी कॉम्प.च्या शेवटच्या वर्षांला आहे. त्या नंतर मला यूपीएससी करायची आहे .पण आत्मविश्वास कमी झालाय. सोबत एमपीएससीचा सुद्धा विचार करतोय. काय योग्य ठरेल ?- स्वप्निल तिकांडे
स्पर्धा परीक्षांचा रस्ता थेट आता तुझ्यासाठी सुरू होत नाही हे नीट लक्षात घे. त्या रस्त्याचा अभ्यास करायला लागशील तर कॉम्प्युटरचे सर्व विषय कायमचे विसरून जाशील. पदवीला ७० टक्के मार्क कसे मिळतील, पहिली नोकरी कोणत्याही स्वरूपाची कॉम्पिटक्षेत्रात कशी मिळेल, याच्यावर लक्ष दे. नोकरीमध्ये तीन वर्षे गेल्यानंतर पण तुझ्या हाती स्पर्धा परीक्षांकरिता सहा वर्षे आहेत. नोकरी करत असताना रोज एक तासाचा अभ्यास करून नीट तयारी कर म्हणजे मानसिक स्थिती पण चांगली राहील. आर्थिक स्थिती बळकट राहील. मग परीक्षेमध्ये यश मिळणार असेल तर मिळू शकेल. हे सदर वाचणाऱ्या सर्वांनी एक वाक्य पक्के लक्षात ठेवावे. मराठीत एक म्हण महत्त्वाची व कायम आठवण करून देणारी ठरते. ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे कधीही लागू नये’. हातातल्या पदवीचा वापर कसा करायचा? त्यातील कौशल्ये नीट आत्मसात कशी करायची? त्यातून अर्थार्जन करण्याबद्दल स्वत:चा आत्मविश्वास प्रथम वाढवायचा? हे करून मग स्पर्धा परीक्षांच्या रस्त्याला वळण्याचा विचार करावा. याला अपवाद अगदी थोडे असतात. त्या अपवादांमध्ये आपण बसतो का नाही? याचा एक सोपासा मार्गही येथेच लिहीत आहे. करिअर वृत्तांतमध्ये सलग तीन आठवडे काय छापून येते ते वाचून त्याचा पूर्ण अर्थबोध होतो का? त्यावर टिप्पणी करता येते का? हे सहजपणे कोणीही विद्यार्थी ठरवू शकतो. मनात प्रत्येकाच्या येत असते की मी स्पर्धा परीक्षा लायक आहे आणि पद काढणारच. हा सोपा उपाय प्रश्न विचारणारे किंवा अन्य विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना सांगून करून पहावा. मी ते सदर गेली पाच वर्षे वाचत आहे. तरीही अनेकदा मला अडखळल्यासारखे होत असते.
सर, मी अॅग्रीकल्चर विषयची पदवी या वर्षी घेतली आहे. पदवीला ७.८ सीजीपी आहे. मी मास्टर्ससाठी प्रवेश परीक्षा दिली आहे पण त्यामधे नंबर लागणे थोडे कठीण वाटत आहे. तरी मी पुढचा पर्याय म्हणून पुढल्या वर्षी रिपीट करावी की तांत्रिकीची तयारी करावी? या मधे कृषी सेवक इ.येतात. का एमबीएचा विचार करावा . – अमर धोटे
एमबीएचा विचार नको. तो वेगळाच रस्ता आहे. केवळ स्पर्धा परीक्षांचा विचार करण्यापेक्षा अॅग्रो मार्केटिंग किंवा सेलिंगमध्ये एखादा जॉब मिळाला तर तो करावा. पुढच्या वर्षी एम.एस्सी. एंट्रन्स रिपीट करावी. कोणतीही स्पर्धा परीक्षा दिली तरीसुद्धा प्रत्यक्ष पद हाती येऊ नोकरी सुरू होऊस्तोवर तीन वर्षे जाऊ शकतात. हे लक्षात घे. कामाचा अनुभव कधीही वाया जात नाही पण पदवी हातात आल्यानंतर फक्त घरी बसून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे असे सांगितले तर त्याला कोणीही अनुभव समजत नसतो. नीट विचारांती निर्णय घ्यावा.