आशुतोष शिर्के, रश्मी पटवर्धन
वन्य-जीव संवर्धन आणि पशुवैद्यक शास्त्र अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी लहानपणी डिस्कव्हरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफिकवरील माहितीपट पाहताना थरार अनुभवतात. यातून ते एका विशाल, जिवंत आणि गुंतागुंतीच्या जगाची ओळख करून घेत असतात. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात सिंहांचा मागोवा घेणारा संशोधक, हिमालयात दुर्मीळ पक्ष्यांचे निरीक्षण करणारी वैज्ञानिक किंवा जखमी प्राण्यांवर उपचार करणारा पशुवैद्य. ही सारी दृश्ये त्यांच्या मनात घर करून राहतात.परंतु वय थोडे वाढल्यावर करिअर निर्णयांची वेळ आली की मात्र समाजाच्या अपेक्षा पुढे येतात. डॉक्टर, अभियंता, व्यवस्थापन या मार्गांना सुरक्षितता आणि प्रतिष्ठा लाभलेली दिसते. आणि मग जंगल, जैवविविधता, प्राणी हे सारं जणू ‘छंद’ म्हणून मागे पडतं.

मात्र आजच्या काळात ही ओढ केवळ भावनिक नाही; ती आजच्या वास्तवाची गरज आहे, भविष्याची हाक आहे. हवामान बदल, अनेक प्रजातींचा झपाट्याने होणारा ऱ्हास, मानव–वन्यजीव संघर्ष या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान ही केवळ करिअरची क्षेत्रे राहिलेली नाहीत; ती भविष्याशी निगडित नैतिक जबाबदारीची क्षेत्रे ठरली आहेत.

जगभरात या विषयांत प्रचंड संशोधन होते आहे आणि सहाजिकच त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च शिक्षणासाठी विविध संधी या क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन रिसर्च युनिट वन्यजीव संरक्षण-धोरण आणि क्षेत्रीय संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. नेदरलँड्समधील वागेनिंगेन युनिव्हर्सिटी अँड रिसर्च पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या अभ्यासासाठी जगामध्ये अग्रस्थानी मानले जाते.

वन्यजीव संवर्धनाचा विचार करताना आपण अनेकदा जंगलातील संशोधकांची प्रतिमा डोळ्यांसमोर आणतो. परंतु या संपूर्ण परिसंस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे पशुवैद्यकीय विज्ञान. आज ‘वन हेल्थ’ ही संकल्पना जगभर स्वीकारली जाते. मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचे परस्पर संबंध अधोरेखित करणारी ही दृष्टी. झुनोटिक रोग, पशु-धन आरोग्य, लसींवरचे संशोधन, वन्यजीव पुनर्वसन, जैव-सुरक्षा अशा सर्व क्षेत्रांत प्रशिक्षित पशुवैद्यकांची गरज जगभर वाढत आहे.

पशुवैद्यकीय क्षेत्रात ब्रिटनमधील रॉयल व्हेटरिनरी कॉलेज आणि अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस या संस्था उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न आणि युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी यांसारख्या संस्था वन्यजीव आरोग्य आणि क्लिनिकल प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ ग्वेल्फ पशुवैद्यकीय संशोधनासाठी अनेक वर्षांपासून ओळखले जाते.

ही यादी इथेच संपत नाही. न्यूझीलंडमधील मॅसे युनिव्हर्सिटी आणि डेन्मार्कमधील युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन पर्यावरणीय विज्ञान व वन्यजीव व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ निवडताना इतर क्षेत्रांप्रमाणे ह्या क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी केवळ क्रमवारी न पाहता अभ्यासक्रमाची दिशा, संशोधनाच्या संधी आणि क्षेत्रीय अनुभवाचा विचार करणे आवश्यक आहे. आर्थिक साहाय्यासाठी चेव्हनिंग स्कॉलरशिप्स, कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन आणि फुलब्राइट–नेहरू फेलोशिप यांसारख्या शिष्यवृत्ती योजना भारतीय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

या अभ्यास-क्षेत्रामध्ये अनेक भारतीय संशोधकांनी आजपर्यंत उल्लेखनीय काम केले आहे. हा मार्ग केवळ स्वप्नांचा नाही तर साध्य करता येणारा आहे. प्रश्न केवळ इतकाच आहे की आपण तथाकथित ‘प्रतिष्ठा’ निवडणार आहोत की करिअर मधील ‘अर्थपूर्णता’? काही करिअर आपल्याला केवळ एक ओळख देतात, काही करिअर आपल्याला जबाबदारी देतात. वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान ही जबाबदारीची क्षेत्रेही आहेत. जागतिक शिक्षण आत्मसात करूया , पण त्याची मुळे आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न करूया. आपल्या पृथ्वीच्या भविष्यासाठी उभे राहूया!

हत्तींना वाचवणारे डॉक्टर यदुराज खडपेकर

काही वर्षांपूर्वी मुंबईतील अतिशय आजारी अवस्थेतील लक्ष्मी हत्तिणीची बंधनातून मोठ्या जिकिरीने आणि धाडसाने मुक्तता करून ट्रकवरून तीन दिवसाचा प्रवास करत आग्र्याच्या हत्ती संवर्धन केंद्रात तिला घेऊन जाणार्या तरूण डॉक्टरचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले. डॉ. यदुराज खडपेकर. या प्रसंगातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या यदुराज यांनी यानंतर सातत्याने अनेक आजारी हत्तींची अशी सुटका केली.

हे व्हेटर्नरी डॉक्टर कोण? यांचा शिक्षण प्रवास नेमका कसा घडला या उत्सुकतेतून आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. बारावीपर्यंत विज्ञान शाखेत मुंबई विद्यापीठातून चांगले गुण मिळवून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्राण्यांवरील गाढ प्रेमामुळे यदुराज यांनी पारंपरिक वाटेपासून वेगळा असा करिअरचा मार्ग निवडला. त्यांनी पशुवैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील उदगीर, लातूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

इंटर्नशिपदरम्यान त्यांची सहा महिन्यांसाठी औरंगाबाद प्राणीसंग्रहालयात नेमणूक झाली. हा काळ त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. येथे त्यांना वन्यप्राण्यांबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला आणि वन्यजीव संवर्धनाबद्दल त्यांची ओढ अधिक दृढ झाली.

वन्यजीव आणि आदिवासी समाजासाठी डॉ. प्रकाश आमटे यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याने यदुराज अतिशय प्रेरित झाले. त्यांनी डॉ. आमटे यांची भेट घेतली आणि नंतर त्यांना पत्र लिहिले. डॉ. आमटे यांच्या सकारात्मक व प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिसादामुळे यदुराज यांच्यासमोर नवे मार्ग खुले झाले.

पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर यदुराज हेमलकसा येथे गेले आणि दोन महिने डॉ. आमटे यांच्यासोबत राहिले. या अनुभवाने वन्यजीव क्षेत्रातच करिअर करण्याचा त्यांचा निर्णय पक्का झाला. यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील मरडॉक विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ व्हेटर्नरी स्टडीज इन कन्झर्वेशन मेडिसिन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. अनेक विद्यापीठांमधील कोर्सेस आणि संवर्धनाचे काम यांचा तौलनिक आढावा त्यांनी हा अभ्यासक्रम निवडताना घेतला. ह्या विद्यापीठातील वन्यजीव, प्राणीसंग्रहालय संबंधित संवर्धन वैद्यक या विषयांतील संशोधन आणि या क्षेत्रातील प्रसिद्ध प्राध्यापक डॉ क्रिस्टिन वॉरेन यांचे आध्यापन अतिशय समृद्ध करणारे होते.

पद्व्योत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर यदुराज भारतात परतले आणि हत्ती बचाव कार्याच्या क्षेत्रात काम सुरू केले. आज हत्तींना आपल्या “जादुई स्पर्शाने बरे करणारे डॉक्टर” अशी त्यांची ख्याती आहे.