याआधीच्या भागात आपण सौंदर्यशास्त्र आणि केशभूषा या विषयातील करिअरची माहिती घेतली. जनरल अ‍ॅस्थेटिक्स आणि बॉडी थेरपीची माहिती घेतली. त्यात बॉडी थेरपी किंवा सिडेस्को कोर्स पूर्ण केल्यानंतर स्किन क्लिनिकमध्ये नोकरी करता येते. यातून पुढचा मार्ग किंवा टप्पा म्हणजे अ‍ॅडव्हान्स अ‍ॅस्थेटिक्स. या कोर्ससाठी मुळात शरीररचना, शरीरशास्त्र, त्वचेची रचना आणि पॅथेलॉजीचे ज्ञान पक्के असावे लागते. त्याचबरोबर पुढील जनरल अ‍ॅस्थेटिक्स, इलेक्ट्रिक ट्रीटमेंट्स, वेगवेगळे इलेक्ट्रिक करंट्स, स्वच्छता आणि आरोग्य, सुरक्षा नियम व पद्धती, प्रथमोपचार या विषयांची सखोल माहिती त्याचबरोबर ते हाताळण्याची सवय असावी लागते.

अ‍ॅडव्हान्स अ‍ॅस्थेटिक्समध्ये काम करताना खालील विषयांचा अभ्यास करता येतो.

केमिकल पिलिंग – यामध्ये रसायनांचा वापर करून त्वचेवरील नको असलेला एक पातळ थर काढून टाकण्यात येतो. ज्यामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात.

मायक्रो निडलिंग – या उपचारपद्धतीदरम्यान अतिशय बारीक सुया त्वचेवर फिरवल्या जातात. हे काम अत्यंत कुशलतेने आणि हलक्या हाताने करावे लागते, कारण या वेळी योग्य प्रशिक्षण नसल्यास अपाय किंवा दुखापत होण्याची शक्यता असते.

ब्लेमिश रिमूव्हल (थर्मोलिसिसद्वारे)- एका यंत्रामधून गरम वाफेच्या साहाय्याने ही ट्रीटमेंट दिली जाते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे करता येतात.

मायक्रोडर्माअब्रेशन – यातही त्वचेवरचा नकोसा थर काढून टाकण्यासाठी एका पावडरसदृश  सॉल्ट क्रिस्टलचा वापर केला जातो. उपकरणाद्वारे ते त्वचेवर सोडले जाते. यामुळे चेहऱ्यावरचे व्रण, खड्डे नाहीसे करता येता.

लेझर किंवा आयपीएल ट्रीटमेंट – यामध्ये लेझर किरणांचा उपयोग करून डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवता येतात. तसेच केसगळतीवरही याचा उपयोग केला जातो. शिवाय फोटो फेशिअलमध्येही हे तंत्रज्ञान वापरले जाते.

रेडिओ फ्रीक्वेन्सी – त्वचेवर खोलवर उपचार करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे त्वचा अधिक तरुण दिसायला मदत होते.

वरील सर्व विषयांतील एका एका विषयाचा अभ्यासही करता येतो. त्याचे योग्य ते प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीला डर्मेटॉलॉजिस्टकडे साहाय्यक किंवा मदतनीस म्हणून काम करता येते. त्यानंतर ही विविध उपकरणे आणि यंत्रसामग्री हाताळण्याचा आणि वापरण्याचा योग्य तो अनुभव मिळाल्यानंतर स्वत:चे ब्युटी क्लिनिक उघडता येते; परंतु यासाठी लागणारी गुंतवणूक जरा जास्त आहे. यासाठी लागणारी यंत्रसामग्री महाग असते. तसेच या उपचारपद्धतींचे दरही जास्त असतात. या सर्व उपचारपद्धतींसाठीची उपकरणे आणि यंत्रसामग्री भारतात मिळतात. त्यासाठी काही दर्जेदार कंपन्याही आहेत. ही उपकरणे विकताना या कंपन्या ती वापरण्याचे जुजबी ज्ञान देतात. जे पुरेसे नसते. त्यामुळे योग्य ते प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम केल्याशिवाय या क्षेत्रात काम करू नये.

याविषयीचे प्रशिक्षण खालील ठिकाणी मिळू शकेल.

सॅलीडय़ुरंट (www.sallydurant.com)

इंटरनॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅस्थेटिक मेडिसिन (www.iiam.info)

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्मेटॉलॉजी ट्रायकॉलॉजी अँड न्यूट्रिशन (www.iictn.com)

(लेखिका सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)