News Flash

ताण हवा, पण..

सतत यशाच्या मार्गावर चालताना हे अचानक आलेले अपयश पचविणे मला कठीण झाले.

लोकसत्ता मार्ग यशाचाया करिअर कार्यशाळेत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी यशाची व्याख्या समजावून सांगितली. ताण हा हवाच, पण तो नेमका किती, हे त्यांनी सोप्या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना समजावून दिले.

आपण सगळेचजण एका गोष्टीच्या मागे धावत असतो, ती गोष्ट म्हणजे यश. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी या करिअर कार्यशाळेमध्ये यशाची व्याख्याच विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्यासाठी त्यांनी स्वतचेच उदाहरण विद्यार्थ्यांना दिले. ते म्हणाले, माणूस स्वत:च्या अनुभवाचे अवलोकन केल्याने अधिक शिकतो. इतरांच्या अनुभवातूनही शिक्षण होतेच, पण स्वानुभवाकडे पुन्हा पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचे कौशल्य असेल तर अधिक विकास होतो. चांगले मार्क असल्याने मला सहज जीएस मेडिकलला प्रवेश मिळाला होता. तिथला अभ्यास, हॉस्पिटलचे वातावरण याला मी छान सरावलो होतो. पण एमबीबीएसला मी नापास झालो. कारण होते माझी प्रात्यक्षिक परीक्षा. जी मेडिकलमध्ये खूप महत्त्वाची असते.  लेखी परीक्षा व्यवस्थित पार पडली आणि प्रात्यक्षिकांचे केंद्रही आमच्याच महाविद्यालयात आले. मी खूश झालो, कारण काळजीचे कारणच नव्हते. अभ्यास तर झाला होता शिवाय प्रयोगशाळा वगैरे सर्व माझ्या माहितीचे होते. त्यामुळे मी एक घोडचूक केली मी या सगळ्याचा जराही ताण घेतला नाही. मी बेफिकीर राहिलो. पण तिथेच जास्त फिकिरीची गरज होती. त्यात मला केसही अगदी सोपी आली. त्यामुळे हुरूप आणखीनच वाढला. मी पटापट सगळे काही लिहिले. आमच्या परीक्षक मॅडमना माझ्यातली सहजता पाहून वाटले की, मी कॉपी केली आहे. मला कोणीतरी आधीच प्रात्यक्षिकाची माहिती दिली आहे. त्यांनी मला तसे विचारलेदेखील. पण खरोखरच तसे नव्हते. मी मात्र माझ्याच यशाच्या धुंदीत होतो. त्यामुळे मी त्यावर त्यांना  म्हणालो, ‘तसे काही नाही, परंतु तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला तसे कोणतेही प्रश्न विचारू शकता.’ आता माझे हे आत्मविश्वासपूर्ण उत्तर म्हणजे त्यांना माझा अतिशहाणपणा आणि उद्धटपणा वाटला. मी चुकीच्या वेळी, चुकीच्या शब्दात, चुकीच्या माणसाबरोबर केलेला हा सर्वात चुकीचा संवाद होता. त्याचे फलित म्हणून त्यांनी मला प्रात्यक्षिकात ६० पैकी ६ गुण दिले. माझ्या नशिबाने तोंडी परीक्षेलाही त्याच बाई आल्या. तिथेही मला ४० पैकी ४ गुण मिळाले. मी नापास झालो.

सतत यशाच्या मार्गावर चालताना हे अचानक आलेले अपयश पचविणे मला कठीण झाले. मी पुरता  कोलमडलो. कोणाला तोंड दाखवण्याची आपली लायकी राहिली नाही, असे मला वाटले. मी जेव्हा घ्यायचा तेव्हा ताण घेतला नाही म्हणून तो नंतर माझ्यावर कोसळला. तशाच अवस्थेत मी घरी गेलो. माझे बाबाही त्याच वर्षी निवृत्त होणार होते. त्यामुळे तर मला त्यांचा अपेक्षाभंग केल्याचे आणखीच वाईट वाटू लागले. तेव्हा बाबांनी शांतपणे मला जवळ घेतले. रडू दिले. मग ते म्हणाले, नेमके काय झालेय, हे आपण समजून घेऊ. एका महत्त्वाच्या परीक्षेच्या, एका विषयाच्या, एका भागामध्ये, एका प्रयत्नात तुला एकदा अपयश आले आहे. पहिल्यांदा मला हे वाक्य कळले नाही. पण २-३ वेळा ते ऐकल्यावर मला कळले की, बाबा म्हणताहेत ते योग्य आहे. आपण जगायलाच नालायक नाही. यापुढेही मार्ग आहे. आपण जगू शकतो. यश मिळवू शकतो. बाबा पुढे म्हणाले, यापुढची परीक्षा कशी द्यायची आहे, हे तुला ठरवायला हवे. मला खात्री आहे, तू नव्या जोमाने प्रयत्न करशील आणि यशस्वी होशील. तो प्रयत्न आताच्या प्रयत्नांपेक्षा अधिक चांगला असेल ही शक्यता तू का लक्षात घेत नाहीस? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुला कितीही टक्के मिळोत. तू अपयशी होवोस किंवा यशस्वी होवोस; तू कायमच माझा आवडता मुलगा राहशील. ते शब्द ऐकल्यावर मला फार धीर आला. माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आपले वडील जर आपल्याला आहे तसे स्वीकारत आहेत तर आपण का नाही? मग मी जोमाने अभ्यासाला लागलो आणि पुढच्या परीक्षेत यश मिळवून दाखवले. पण तोपर्यंत मला आपल्याला केवढा ताण घेण्याची गरज आहे, याची जाणीव झाली होती. त्यामुळे मी उगाच अभ्यास झाला असला तरीही गर्वाने फुगून गेलो नाही. तर परीक्षेचा एक योग्य ताण घेतला. त्यामुळे मला ती परीक्षा चांगल्या पद्धतीने देता आली. त्यात मी यशस्वी झालो.

  • अयशस्वी झाल्यास..

एखाद्या वेळी अपयश आले तर खचून जाऊ नका. तुम्हाला पहिल्यांदा नक्कीच वाईट वाटेल. पण विचार करा, आपल्याला नेमके का वाईट वाटते आहे? इतरांना यश मिळाले आणि आपणाला नाही म्हणून आपल्याला वाईट वाटते आहे की, आपण आपल्या किंवा इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांवर खरे उतरलो नाही, याचे वाईट वाटते आहे. दुखाचा पहिला भर ओसरल्यानंतर नेमके काय झाले आहे, याचा विचार करा. कुठे चुकले ते शोधून काढा. पुढच्या प्रयत्नात ती चूक टाळण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे काम करावे लागेल, हे पक्के करा.

  • नापास झालो तर..

परीक्षेतील अपयश हे आपले बौद्धिक अपयश आहे, त्याला वैश्विक कोंदण देण्याची गरज नाही. समजा अभ्यासात नाही जमले काही, तर आयुष्य काही संपत नाही. इतरही अनेक पर्याय असतातच की. केवळ अभ्यास म्हणजे आयुष्य नव्हे. त्याच्यापलीकडेही आपल्याकडे भलेमोठे आयुष्य पडलेले आहे. त्यातल्या परीक्षांच्या समोर या अभ्यासातल्या परीक्षा काहीच नाहीत.

  • अतिरिक्त ताणामुळे काय होते?

अतिरिक्त ताणामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपण सारासार विचार करण्याची बुद्धी गमावतो. आपल्याला कळत नाही, नेमके कुठे, काय चुकले आहे? यानंतर प्राधान्य कशाला द्यावे? कोणते

पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत? हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे उद्दिष्ट, प्राधान्य आणि पर्याय या तिन्ही महत्वाच्या गोष्टींचा गोंधळ होतो. याचा परिपाक म्हणून आपण दु:खातून आणखी दु:खात जातो. त्यातून बाहेर पडायचा मार्गच दिसत नाही.

  • अपयशातून बाहेर पडताना..

अपयशातून बाहेर पडायचे तर प्रयत्न तर करावेच लागणार. त्याला पर्याय नाही. म्हणून एक उद्दिष्ट ठरवा. त्यासाठी नेमके काय काय करावे लागेल याचा विचार करा. आता जर मला एखादे उद्दिष्ट पार करायचे असेल तर त्याची किंमत ही मोजावीच लागणार. आरामाचा पर्याय हरामाचाच ठरेल, हे समजून घ्या. प्रयत्न तर असतीलच, पण पहिल्यापेक्षा वेगळे प्रयत्न करावे लागणार. कारण पहिल्यावेळी काय चुकले होते, ते टाळायला हवे. त्या जागी काय करायला हवे ते नव्याने समजून घ्यावे लागेल. आपले अनुभव बदलले असल्याने दृष्टिकोनही बदलावाच लागेल.

  • समाधान हवे

आपल्या आयुष्यात अतिरिक्त ताण नव्हे तर उपयुक्त ताण गरजेचा आहे. जेव्हा आपण उपयुक्त ताणाच्या प्रक्रियेत प्रवेश करतो, तेव्हा आपल्या प्रयत्नाच्या प्रक्रियेत आनंद आणि समाधान यायला लागते. उद्दिष्ट, प्राधान्य आणि पर्याय यांची सांगड घातली जाते. सत्य आणि वास्तव याचा सामना जेव्हा आपण करतो तेव्हा अपयशाने उन्मळून जात नाही आणि यशाने बिनधास्त होत नाही. आपण योग्य विचार करून परिस्थिती हाताळू शकतो.

  • विद्यार्थीपालक संवाद

कुटुंबामधील संवाद वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी दोघांनीही आपल्या भावना आणि हेतू थेट, ठामपणे पण चांगल्या भाषेत सांगायला हवा. पालकांनी पाल्याला ओरडताना, गाढवा वगैरेसारख्या कोणत्याही प्रकारच्या उपमा न देता त्याचे जे वर्तन आवडलेले नाही त्याबद्दल ठाम सांगावे. म्हणजे तो त्यावर पहिली प्रतिक्रिया रागाची देणार नाही आणि आपल्या म्हणण्याचा विचार करेल. जेणेकरून संवाद आणि प्रेमही टिकेल शिवाय हेतूही साध्य होईल.

ताणाचे प्रमाण मिठासारखे

ताण हा आयुष्यात हवाच. कमी ताण आपल्या स्वत:बद्दलच्या अपेक्षांचा फुगा फुगवतो आणि अति ताण आपल्याला नामोहरम करू लागतो. ताणाचे प्रमाण मिठासारखे हवे. आपल्याला किती मीठ खायला आवडते, हे आपल्या अनुभवातूनच आपल्याला कळते. ताणाचेही तसेच आहे. आपल्याला किती ताण उपयुक्त ठरेल आणि किती अतिरिक्त हे स्वत:लाच समजून घ्यावे लागेल. त्यासाठी आधी स्वअनुभवांचे अवलोकन करावे लागेल.

प्रायोजक :  या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस होते. पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ, द युनिक अ‍ॅकॅडमी हे होते. तर हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:17 am

Web Title: anand nadkarni in loksatta marg yashacha
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : निबंध लिखाणातील टप्पे
2 आदिवासी शेतकऱ्यांसाठी वीज पंप योजना
3 डोळसपणे पाऊल टाका!
Just Now!
X