आजच्या लेखामध्ये आपण भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ या घटकांमधील प्राचीन भारत या घटकाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी यावर चर्चा करणार आहोत. आता आपण या घटकावर २०११ ते २०१६मध्ये किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहू या-

cv1chart

वरील विश्लेषणामध्ये कला आणि संस्कृती संबंधित प्रश्न ग्राह्य धरलेले नाहीत. या घटकाची पुढील लेखामध्ये स्वतंत्रपणे चर्चा करणार आहोत. आत्तापर्यंत एकूण १८ प्रश्न विचारलेले आहेत. यातील काही प्रश्नांचा आपण सर्वप्रथम आढावा घेऊ. ज्यामुळे या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा योग्य अंदाज घेता येईल.

२०११च्या परीक्षेमध्ये सिंधू अथवा हडप्पा संस्कृतीवर दोन विधाने देऊन प्रश्न विचारण्यात आलेला होता.

यातील पहिले विधान – धार्मिक गोष्टीचे अस्तित्व असूनही एक धर्मनिरपेक्ष संस्कृती होती.

दुसरे विधान – या काळात कापूस वस्त्र निर्मितीसाठी वापरले जात होते.

२०१२ मध्ये प्रारंभीच्या वैदिक आर्याचा धर्म कोणता होता अशा प्रकारचा प्रश्न ‘वैदिक संस्कृती’ या पाठावर विचारलेला होता. तसेच याच परीक्षेमध्ये पुढील प्रश्न आणि तीन पर्याय होते.

प्राचीन भारताच्या संदर्भानुसार जैन व बौद्ध धर्म यांच्यात काय एकसारखे होते

पर्याय

  • द:ुख आणि आणि आनंद या दोन्ही भावनांचा अव्हेर,
  • वेदाबाबत अनास्था अथवा विरक्ती,
  • कर्मकांडाचे महत्त्व अमान्य.

तर २०१३मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित निर्वाण या संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

खालीलपकी कोणत्या राज्याचा बुद्धजीवनाशी संबंध होता?

पर्याय

  • अवंती, गांधार, कोशल, मगध हा प्रश्न २०१४ आणि २०१५मध्ये लागोपाठ विचारण्यात आलेला होता. २०१६ मध्ये आलेला प्रश्न होता,

सर्वप्रथम अशोकाच्या शिलालेखाची उकल कोणी केली?

पर्याय

  • जॉर्ज बुहलर, जेम्स प्रिन्सिप, मॅक्स मुल्लर आणि विल्यम जोन्स
  • याव्यतिरिक्त प्राचीन भारतातील श्रेणी व्यवस्था, परकीय प्रवाशाद्वारे प्राचीन भारताचे केलेले वर्णन यांसारख्या बाबींवरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले होते.

वरीलप्रमाणे गतवर्षीच्या प्रश्न विश्लेषणावरून या विषयाची तयारी कशी करावी, याची एक स्पष्ट दिशा निर्धारित करता येते. यातील बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड यावर सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. यातील जवळपास सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे प्राचीन भारताचा अभ्यास करताना याची विविध टप्प्यांनुसार अथवा कालखंडानुसार विभागणी करून संबंधित कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आíथक आणि राजकीय घडामोडीचे व्यवस्थित आकलन करणे गरजेचे आहे. तसेच या विषयाची एक व्यापक समज आपणाला तयार करावी लागते. सिंधू संस्कृतीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नासाठी सिंधू संस्कृतीकालीन धार्मिक आणि आíथक जीवन पद्धतीची माहिती असणे गरजेचे आहे.  हा प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणार आहे त्यामुळे याची अचूक माहिती असल्याखेरीज हा प्रश्न सोडविणे शक्य होणार नाही. या विषयावर विचारण्यात येणाऱ्या जवळपास सर्व प्रश्नासाठी अशा स्वरूपाचे आकलन करूनच अभ्यासाचे नियोजन करावे लागते. हा विषय पारंपरिक स्वरूपाचा आहे त्यामुळे याचा सर्वागीण अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यास सोपा करण्यासाठी स्वत: टिपणे काढली, मुद्दे लिहिले तर उत्तम.

तसे पाहता यावर सर्वसाधारणपणे कमी प्रश्न विचारले जातात. म्हणूनच याच्या तयारीसाठी किती वेळ द्यावा, हे आधी निश्चित करा. याची तयारी आपण फक्त पूर्वपरीक्षेसाठी करत असतो, त्यामुळे पहिल्याप्रथम या विषयाचा सर्वागीण अभ्यास करून काढलेल्या नोट्सची वारंवार उजळणी करणे गरजेचे आहे. जरी या विषयावर प्रश्न कमी विचारले जात असले तरी जे येतील ते अचूक सोडवणे गरजेचे आहे. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी या घटकाची तयारी करणे, अपरिहार्य आहे.

आत्ता आपण या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भसाहित्य वापरावे याची चर्चा करू. या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. या घटकाचे स्वरूप हे पारंपरिक असल्यामुळे अचूक माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. ज्यासाठी आपणाला एनसीईआरटीची  इयत्ता- ८ वी ते १२वीची इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात. ज्यामध्ये विशेषकरून इयत्ता १२वीचे ‘Themes in indian History part I’  हे पुस्तक वाचावे लागते. याच्या जोडीला आर.एस.शर्मा लिखित प्राचीन भारत या विषयावरील एनसीईआरटीचे जुने पुस्तक वाचणे आवश्यक आहे. या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ बाजारात उपलब्ध आहेत. पण परीक्षेचा विचार करून त्यातले नेमके कोणते निवडायचे हे ठरवा आणि त्याचा अभ्यास करा. यामध्ये  Early India-  रोमिला थापर आणि History of Ancient and Early Medieval India –  उपेंद्र सिंग या पुस्तकांचा वापर करणे, फायद्याचे ठरते. यापुढील लेखामध्ये आपण मध्ययुगीन  भारत या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.