महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा 

देशभरातील उच्चशैक्षणिक सोयी-सुविधांच्या विकासासाठी म्हणून केंद्र सरकारच्या मनुष्यबळविकास मंत्रालयामार्फत स्वातंत्र्योत्तर काळात व्यापक प्रयत्न केले गेले. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून केंद्रीय विद्यापीठांच्या निर्मितीकडे पाहिले जाते. राज्य सरकारांच्या अखत्यारित असणाऱ्या राज्य विद्यापीठांबरोबरच देशामध्ये थेट केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालणारी विद्यापीठीय यंत्रणा म्हणून आपल्याकडे केंद्रीय विद्यापीठांचा विचार केला जातो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, केंद्रीय विद्यापीठांसाठीच्या स्वतंत्र अशा कायद्यान्वये सध्या देशभरात एकूण ४७ केंद्रीय विद्यापीठे चालतात. त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक सहा केंद्रीय विद्यापीठे आहेत. देशभरात विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये सातत्याने वरच्या क्रमांकांमध्ये राहणारे दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ किंवा दूरशिक्षणासाठी देशभरात नावाजले जाणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) हेदेखील केंद्रीय विद्यापीठीय रचनेचाच एक भाग आहे. महाराष्ट्रामध्ये वर्धा येथे असणारे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे महाराष्ट्रामधील एकमेव केंद्रीय विद्यपीठ ठरते.

संस्थेची ओळख

हिंदी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा विचार महात्मा गांधींनी मांडला होता. या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठीचे काम करण्यासाठी म्हणून या विद्यापीठाची स्थापना झाली. हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि विकासासाठी १९९७ साली वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ अस्तित्वात आले. वर्धा येथील गांधी हिल्स परिसरामध्ये या विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल वसलेले आहे. त्यासोबतच अलाहाबाद आणि कोलकात्यामधील उपकेंद्रांमधूनही या विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज चालते. हिंदी भाषा आणि साहित्याचा विकास करणे हा या विद्यापीठाच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषांशी निगडित साहित्याचा तौलनिक अभ्यास, भाषांतर, संशोधन यासाठी व्यापक प्रयत्न या विद्यापीठामार्फत चालतात. विद्यापीठाच्या विविध विभागांमधून भाषाविषयक संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण, भाषांतर, भाषाशास्त्राच्या संदर्भाने विशेष अभ्यास चालतो. हिंदीचा वापर आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अभ्यासक्रमांवर हे विद्यापीठ भर देते. हिंदी भाषेतून सामाजिक शास्त्रांचा विश्वकोश तयार करण्याचे मोठे काम या विद्यापीठामार्फत सुरू आहे. http://www.hindivishwa.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे विद्यापीठ सध्या केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील दिसते. दूरशिक्षणाच्या माध्यमातूनही विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये एम. ए. हिंदी, एमएमसडब्ल्यू, डिप्लोमा इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन हे अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

विभाग आणि अभ्यासक्रम

या विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य एकूण आठ स्कूल्सच्या अंतर्गत विभागण्यात आले आहे. स्कूल ऑफ लँग्वेज, स्कूल ऑफ लिटरेचर, स्कूल ऑफ कल्चर, स्कूल ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन, स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल ऑफ एज्युकेशन या त्या आठ स्कूल्स होत. स्कूल ऑफ लँग्वेजच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स अँड लँग्वेज टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन अँड लँग्वेज इंजिनीअरिंग सेंटर, फॉरेन लँग्वेज अँड इंटरनॅशनल स्टडी सेंटर हे विभाग चालविले जातात. लँग्वेज टेक्नॉलॉजी, कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स, लँग्वेज टीचिंग या विषयांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांपासून ते एम. फिल- पीएचडीच्या संशोधनापर्यंतचे नानाविध अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. फॉरेन लँग्वेज अँड इंटरनॅशनल स्टडिज सेंटरमध्ये परकीय भाषांशी संबंधित पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. स्कूल ऑफ लिटरेचर अंतर्गत विविध भाषांमधील साहित्याचा सखोल आढावा घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या स्कूल अंतर्गत हिंदी अँड कम्पॅरेटिव्ह लिटरेचर, परफॉर्मिग आर्ट्स, इंग्लिश, उर्दू, संस्कृत आणि मराठी भाषेच्या अभ्यासासाठीचे विविध अभ्यासक्रम चालतात. स्कूल ऑफ कल्चरच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ गांधी अँड पीस स्टडीज, विमेन स्टडीज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर- सिदो कान्हू मुर्मू दलित व जनजातीय अध्ययन केंद्र, डॉ. भदंत आनंद कौशल्यायन बौद्ध अध्ययन केंद्र चालविले जाते. त्यामध्ये विविध तत्त्वज्ञानांचे सखोल अध्ययन करण्याच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्कूल ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशनच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सलेशन स्टडीज आणि डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड डाएसपोरा स्टडीज चालते. भाषांतराशी संबंधित पदव्युत्तर पदविका, एम. फिल आणि पीएच.डी.साठीचे संशोधन पूर्ण करण्यासाठीच्या सुविधा या विभागांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसच्या अंतर्गत तीन विभाग चालविले जातात. त्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अंतर्गत चालविले जाणारे अभ्यासक्रम माध्यमांच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या विभागामध्ये पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि एम. फिल- पीएच.डी.चे संशोधन असे वेगवेगळ्या टप्प्यांवरील माध्यमविषयक अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाच्या अलाहाबाद आणि कोलकाता सेंटरवरही विद्यापीठाच्या वेगवेगळ्या स्कूल्समधील निवडक अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्या भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योगेश बोराटे borateys@gmail.com