22 February 2019

News Flash

शब्दबोध

स्कर्ट आणि ब्लाऊज यांच्या समुच्चयालाही जंपर असे म्हणतात.

झंपर

आजही खेडेगावात शुभकार्य झालेल्या घरामध्ये एखाद्या स्त्रीच्या तोंडी हे वाक्य हमखास ऐकायला मिळते; ‘येवढा मोठा कार्यक्रम केला तिनं पण हातावर साधं झंपराचं कापड गी टिकवलं नायी! ‘ आजच्या सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास झंपर म्हणजे ब्लाउजपीस. पण खरेतर स्त्रियांच्या ऊध्र्ववस्त्राला हे नाव आहे. नव्या फॅशनमध्ये ते मागे पडले. त्यातही गंमत अशी की ‘झंपर’ हा मूळ शब्द नाही. मूळ शब्द इंग्रजी आहे तो म्हणजे ‘जंपर’. ‘ज’ हे च, छ, ज, झ या वर्गातील व्यंजन असल्याने अपभ्रंश होता होता बोलाचालीत ‘ज’ चे ‘झ’ झाले. एकाच वर्गातील व्यंजनांमध्ये असे बदल सहजच घडतात. त्यातून तयार झाले ‘झंपर’ आणि पुढे रूढ झाला ‘झंपर’. तसे बघितले तर मूळ जंपर हे सलग कापडाचे, बाही नसलेले परिधान असा त्याचा अर्थ आहे. स्कर्ट आणि ब्लाऊज यांच्या समुच्चयालाही जंपर असे म्हणतात. मराठीत मात्र ब्लाऊजपुरताच सीमित होऊन रूढ झाला.

पुरंध्री

हा मूळ संस्कृत शब्द आहे, पुरंध्री म्हणजे स्त्री. तसे तर मराठीत स्त्रीसाठी ललना, मानिनी, कामिनी, ललिता असे कितीतरी शब्द आहेत. मग ‘पुरंध्री’मध्ये असे काय वेगळेपण आहे? तरुण, कोवळ्या मुलीला पुरंध्री म्हणता येणार नाही. कारण पुरंध्री म्हणजे प्रौढ स्त्री. तारुण्याचा टप्पा पार केलेली तरीही अधिक सौंदर्यवती अशी स्त्री. शब्दश: अर्थ केला तर पूर म्हणजे गाव आणि ध्र म्हणजे धारण करणारी. साऱ्या पुराचा म्हणजे नगराचा मान धारण करणारी, काळजी करणारी, सन्मान प्राप्त झालेली, कुशल, जबाबदार, कतृत्ववान स्त्री. ‘प्रौढप्रताप पुरंध्री महाराणी अहिल्यादेवी होळकर’ एक आदर्श पुरंध्री डोळ्यासमोर साकारणारे हे वाक्य किती चपखल आहे. केवळ वयाने तर कोणीही प्रौढ होईल, पण ‘पुरंध्री’ होता आले पाहिजे. पुरंध्रीपासून ‘पुरंदरी’ हा शब्दही तयार झाला आहे, पण पुरंदरी म्हणजे विलासी स्त्री या अर्थाने तो सहसा वापरला जातो.

वाचकहो, शब्दबोध हे सदर तुम्हाला कसे वाटते, ते आम्हाला जरूर कळवा. career.vruttant@expressindia.com शिवाय एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तरीही नक्की विचारा.

First Published on February 10, 2018 12:34 am

Web Title: article on marathi word