खगोलशास्त्राची सुरुवात निरीक्षणांपासून झाली असली तरी एखाद्या निरीक्षणाचा अर्थ खऱ्या अर्थाने गणितानेच लावता येतो. पण त्याचबरोबर सैद्धांतिक पातळीवर केलेल्या भाकितांची परीक्षा ही निरीक्षणातूनच होते. तर खगोलशास्त्राची प्रगती या दोन्ही शाखा जेव्हा एकमेकांचा हात धरून पुढे जातात तेव्हाच होत असते.

या क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ हे सहसा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ असतात. जे खगोलीय निरीक्षणांचा उपयोग करून त्यामागचे विज्ञान शोधायचा प्रयत्न करत असतात. आज या क्षेत्रात संगणकांचा वापर फारच मोठय़ा प्रमाणात होतो. आपल्या परिचयाचे उदाहरण म्हणजे – निरीक्षणांना आधार म्हणून कोपर्निकसने त्या काळी मान्य असलेल्या पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या संकल्पनेविरूद्ध सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना मांडली. त्याला गॅलिलिओच्या निरीक्षणांची साथ मिळाली. पण ग्रह हे पृथ्वीभोवती न फिरता सूर्याभोवती फिरत आहेत याला सिद्धता मिळाली ती  केप्लर आणि मग न्यूटनच्या गणितामुळेच. या क्षेत्रात काम करण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्रावर कौशल्य असणे फार गरजेचे आहे.

खगोलशास्त्रात एक शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करायचे तर आधी एका दुसऱ्या एका तज्ज्ञ शास्त्रज्ञाबरोबर संशोधन करून आधी पीएच.डी.ची पदवी मिळवावी लागते. आपल्या देशात टीआयएफआर, आयुका, पीआरएल, रामन रिसर्च इन्स्टिटय़ूट, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अशा अनेक संस्था आहेत. जिथे खगोलशास्त्रीय संशोधन करता येते.  अशा सर्व मोठय़ा संस्थेतून दर वर्षी पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठी अर्ज मागवतात.  मग ऐच्छिक विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येते. त्यातील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. या मुलाखतीत शास्त्रज्ञांचे दोन वेगवेगळे गट त्यांच्याशी संवाद साधतात. यानंतर या दोन्ही गटांत एकत्र चर्चा होऊन ज्या विद्यार्थ्यांची संशोधन करण्याची पात्रता असते, त्यांना पीएच.डी.साठी आमंत्रण देण्यात येते. या सर्व विद्यार्थ्यांना मग एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यात उत्तीर्ण झाल्यावर ते एखाद्या शास्त्रज्ञाबरोबर पीएच.डी.चे संशोधनकार्य करू लागतात. सुमारे ३-५ वर्षांच्या कालावधीत हे संशोधन यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांना पीएच.डी.ची पदवी मिळते. यानंतर २ ते ४ र्वष पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून ते स्वतंत्ररीत्या संशोधन करू लागतात. शेवटी ते एखाद्या संस्थेत पूर्णवेळ शास्त्रज्ञ म्हणून कामाला सुरुवात करतात. पीएच.डी.च्या कालावधीत तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते. (दरमहा सुमारे २५,०००) तसेच पुस्तके विकत घेण्यासाठीही भत्ता मिळतो. पोस्ट डॉक्टरल फेलोशिप ही ४०,००० असते. तसेच शास्त्रज्ञ म्हणून जेव्हा नोकरीला लागता तेव्हा दरमहा लाखाच्या घरात पगार जातो. त्यामुळे या क्षेत्रातले करिअरही नक्कीच आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे असते.  शास्त्रज्ञ बनण्यासाठी कोणत्या संस्थांतून कशा प्रकारे अभ्यासक्रम चालवला जातो, याची विस्तृत माहिती उद्याच्या लेखात वाचूया.

(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत. )