का? कुठे? कसे?

अटल पेन्शन योजना ही निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही,

अशा नागरिकांसाठी लाभदायक आहे.

*   १८ ते ४० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ  शकतात.

*   या योजनेत सहभागीसाठी होण्यासाठी १८ वर्षे वयाच्या व्यक्तीला बँकेत या योजनेअंतर्गत दरमहा ४२ रुपये भरावे लागतील. त्यानंतर  सदर व्यक्तीला वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रुपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. याच धर्तीवर दरमहा २१० रुपये भरल्यास पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळू शकेल.

*   या योजनेत ग्राहकाच्या पहिली पाच वर्षे सरकारचेही योगदान असणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या ५० टक्के (एक हजारपेक्षा कमी रक्कम असल्यास त्याप्रमाणे असेल)आहे. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे.

*   ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस ही पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एकरकमी परत करण्यात येईल.

*   दररोज जगण्यासाठी संघर्ष करत असताना सुरक्षित भविष्याचा विचार करणे प्रत्येकालाच जमते असे नाही. असुरक्षित उत्पन्न आणि असंघटित रोजगाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ मिळत नसलेल्या व्यक्तींसाठी ‘अटल पेन्शन योजना’ ही एक प्रकारे म्हातारपणी आर्थिक आणि सामाजिक संरक्षण देणारी योजना आहे.