मी पुणे विद्यापीठामध्ये बायोटेक करते आहे. मी दुसरे वर्ष द्वितीय श्रेणीत पूर्ण केले आहे. पण मला रसायनांची अ‍ॅलर्जी असल्याने बी.एस्सी.मध्ये दोन वर्षांचे अंतर पडले आहे. मला आता नवे करिअर सुरू करायचे आहे.  या वर्षी मला एम.एस्सी. करायचे आहे. त्यासाठी मार्गदर्शन करा. नोकरी मिळवून देऊ शकतील अशा लघुमुदतीच्या अभ्यासक्रमांची नावे सुचवा. मला एमपीएससी आणि यूपीएससी करायचीही इच्छा आहे.

– प्राजक्ता अग्निहोत्री

तुम्ही एकाच वेळेस अनेक प्रश्न विचारले आहेत. तुम्हाला एम.एस्सी. अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा असल्यास आधी बी.एस्सी. पूर्ण करावे लागेल. आता जर तुम्हाला रसायनांची अ‍ॅलर्जी नसेल तर हे करता येईल.  बी.एस्सी. किंवा कोणत्याही ज्ञानशाखेतील पदवी घेतल्याशिवाय तुम्हाला एमपीएससी वा यूपीएससीची परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे आधी पदवीचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करावा. सीडॅक या संस्थेमध्ये नोकरी मिळवून देणारे आणि माहिती व तंत्रज्ञान या विषयाशी निगडित अनेक अभ्यासक्रम आहेत. आवड असल्यास तेही करता येतील.

संपर्क –  http://cdac.in/

मला बारावी विज्ञान करता आले नाही. त्यामुळे मी तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेतला, पण तिथेही अपयश आले. मला कळत नाही की मी काय करू?

– चंदू जाधव

सध्या अभियांत्रिकी पदविका व पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे फारसे कठीण राहिलेले नाही. त्यामुळे आपली बुद्धिमत्ता, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयातील गती आणि आवड लक्षात न घेता अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला जातो. त्यातूनच तुझ्यासारखी परिस्थिती अनेकांची होते. यावर उपाय म्हणजे स्वत:शी शंभर टक्के प्रामाणिक राहून आपल्या बुद्धिमत्तेस हा अभ्यासक्रम खरोखरच झेपू शकतो का, हा प्रश्न विचारून त्याचे उत्तर शोधणे. हे उत्तर एखाद्या कागदावरही लिहिल्यास काहीच हरकत नाही. तुला जर खरोखरच वाटत असेल तर हा अभ्यासक्रम झेपू शकत नाही, तर तो सोडून देणे श्रेयस्कर ठरेल. कारण रडतखडत पदविका वा पदवी प्राप्त करून पुढे प्रत्यक्ष मार्केटमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होणे जवळपास अशक्य आहे. त्याउपरही हाच अभ्यासक्रम पुढे करावा असे वाटत असल्यास तू कोणत्या विषयात कमी पडतोस हे समजून घेऊन त्याच्या संकल्पना प्राध्यापकांकडून समजून घ्यायला हव्यात. अभियांत्रिकी शिक्षणात गुणांची टक्केवारी जितकी महत्त्वाची ठरू शकते, त्याहीपेक्षा अधिक तुम्ही कितपत ज्ञान मिळवता व त्याचा उपयोग करू शकता हे महत्त्वाचे ठरते.

मी बी.कॉम. पदवीधर आहे. मला एमपीएससीची तयारी करायची आहे. त्यासाठी इंग्रजी भाषेतील पुस्तके सांगा?

– अक्षय जाधव

अक्षय, तुला नेमके काय विचारायचेय यात स्पष्टता नाही. नेमके कशाचे पुस्तक तुला इंग्रजीमध्ये हवे हे तू नमूद केलेले नाहीस. एमपीएससी परीक्षा ही केवळ पाठांतराची परीक्षा नाही, हे तू आणि तुझ्यासारख्या सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विविध विषयांच्या संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे असते. ही परीक्षा तुमच्या ज्ञानाची कसोटी तर घेतेच त्याशिवाय वैचारिक स्पष्टता, चालू घडामोडींवरचे आकलन आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता याचीही कसोटी वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेची सुरुवात करतानाच कितीही क्षुल्लक बाब असली तरी त्याची स्पष्टता असणे गरजेचे आहे.

मी आर्किटेक्चरल इंजिनीअरिंग करत आहे. पाच वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमानंतर काय संधी असतील. सध्या मी पहिल्या वर्षांला आहे.

 – मित्रेश भडसावळे

हा अभ्यासक्रम केल्यावर कन्स्ट्रक्शन मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर्स, ड्राफ्टर्स, सेल्स इंजिनीअर, बिल्डिंग इन्स्पेक्टर, कन्सल्टिंग इंजिनीअर, टेक्निकल आर्किटेक्ट, कन्स्ट्रक्शन एस्टिमेटर आदी संधी मिळू शकतात. म्हाडा, सिडको, एमएमआरडीए आदी संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते. सध्या गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या अनेक कामांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे  आर्किटेक्चर या विषयातील पदवीधरास उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.