20 September 2018

News Flash

यशाचे प्रवेशद्वार : जीवशास्त्रातील आंतरशाखीय संशोधन

मुंबईस्थित डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स, हे केंद्र टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेच्या परिसरात वसले आहे.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई या संस्थेंतर्गत बेंगळुरुस्थित द नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिक सायन्स ही संस्था कार्यरत आहे. मुंबईस्थित डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स, हे केंद्र टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेच्या परिसरात वसले आहे. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चला डीम्ड युनिव्हर्सटिीचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेत संशोधनकार्यासाठी अत्यंत प्रज्ञावान विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यासाठी देशभरातील विविध केंद्रांवर चाळणी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरु येथे मुलाखती घेतल्या जातात. मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय या विषयांमध्ये पदवी प्राप्त केलेले उमेदवार या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. या संस्थांमध्ये संशोधनासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. देश-विदेशातील इतर संस्थांमध्ये सुरू असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांसोबत सुसंवादाची संधी उपलब्ध करून दिली जाते. देश-विदेशातील संशोधन कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. बेंगळुरु आणि मुंबई कॅम्पसमध्ये वाचनालयात संशोधन कार्यासाठी उपयुक्त ठरतील अशी ग्रंथसंपदा आणि नियतकालिके मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहेत.

HOT DEALS
  • Lenovo K8 Plus 32 GB (Venom Black)
    ₹ 8199 MRP ₹ 11999 -32%
    ₹410 Cashback
  • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
    ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
    ₹1129 Cashback

संशोधनाची संधी

जीवशास्त्रातील संशोधनासाठी, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमार्फत घेण्यात येणारी परीक्षा जॉइंट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर बायोलॉजी अ‍ॅण्ड इंटरडिसिप्लिनेरी लाइफ सायन्स (जेजीईईबीआयएलएस) या नावाने ओळखली जाते.

या परीक्षेद्वारे पुढील विषयांमध्ये संशोधन करण्याची संधी मिळते –

(१) जीवशास्त्र

(२) पीएच.डी. – डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स- मुंबई/द नॅशनल सेंटर फॉर  बायोलॉजिक सायन्स- बेंगळुरु / टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च-हैदराबाद.

(३) इंटिग्रेटेड पीएच.डी. – डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स मुंबई/ द नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिक सायन्स- बेंगळुरु / टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – हैदराबाद.

(४) एम.एस्सी बाय रिसर्च- डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स मुंबई.

(५) एम.एस्सी इन वाइल्ड लाइफ बायोलॉजी अ‍ॅण्ड कंझव्‍‌र्हेशन – द नॅशनल सेंटर फॉर  बायोलॉजिक सायन्स- बेंगळुरु.

या प्रत्येक संस्थेतील अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांला स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागतो.

अर्हता-  पीएच.डी.- मूलभूत विज्ञानशाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा उपयोजित (अप्लाइड) विज्ञान शाखेतील पदवी. यामध्ये एम.एस्सी (कृषी), बी.टेक, बी.ई, बी.व्हीएसससी, बी.फार्म, एमबीबीबीएस, बीडीएस, एम.फार्म. यांचा समावेश आहे.

इंटिग्रेटेड पीएच.डी./एम.एस्सी बाय रिसर्च- मूलभूत विज्ञान शाखेतील कोणत्याही विषयातील पदवी.

एम.एस्सी इन वाइल्ड लाइफ बायोलॉजी अ‍ॅण्ड कंझर्वेशन- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी. वन्यजीव संशोधन आणि संवर्धन अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचा तीव्र कल असावा. जुल २०१८ पर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइनच अर्ज सादर करावा लागतो. तथापी ज्या दुर्गम भागात इंटरनेट जोडणी शक्य नाही, असे विद्यार्थी पोस्टाद्वारे अर्ज पाठवू शकतात. २५ ७ १७ सेमी आकाराचा, स्वत:चा पत्ता लिहिलेला व १० रुपयांची पोस्टाची तिकिटे लावलेला लिफाफा, अ‍ॅडमिशन सेक्शन, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, बेलरी रोड, बंगळुरु- ५६००६५, या पत्त्यावर पाठवावा.

शुल्क- पुरुष उमेदवार- ऑनलाइन शुल्क- ६०० रुपये/  पोस्टाने पाठवावयाचा अर्ज – ६५० रुपये.

महिला उमेदवार- ऑनलाइन आणि पोस्टाने पाठवावयाचा अर्ज- १०० रुपये.

अशी असते परीक्षा

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची व बहुपर्यायी उत्तरे असलेली असते. या परीक्षेमध्ये पदवीस्तरीय गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रातील मूलभूत घटकांवर प्रश्न विचारले जातील. एम.एस्सी इन वाइल्ड लाइफ बायोलॉजी अ‍ॅण्ड कन्झव्‍‌र्हेशन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, वन्यजीवशास्त्र, विश्लेषणात्मक व संख्यात्मक कौशल्याची चाचणी करणारे प्रश्न विचारले जातात. संवर्धनाच्या विषयावर विद्यार्थ्यांना निबंध लिहावा लागेल.  डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्स मुंबई आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिक सायन्स- बंगळुरु या संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी लेखी परीक्षा एकच असेल. मात्र दोन्ही केंद्रातील प्रवेशासाठी बंगळुरु आणि मुंबई येथे स्वतंत्ररीत्या मुलाखती घेतल्या जातात. मुंबईतील मुलाखत प्रक्रिया एकाच दिवशी संपवण्यात येते. बंगळुरु  येथील मुलाखत प्रक्रिया तीन दिवस चालते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ ऑगस्ट पासून होतो.

आंतरशाखीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

या संस्थेतील इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयातील बी.टेक केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. अशा विद्यार्थ्यांना संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहित केले जाते. जीवशास्त्रात पदवी अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांनी केला नसेल, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीस्तरीय विषयांमध्ये संशोधन करण्यास प्रोत्साहित केले जाते. अशा विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्र अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवशास्त्राच्या मूलभूत बाबींचे ज्ञान प्राप्त होते. भौतिकशास्त्र, गणित, संगणकशास्त्र, अभियांत्रिकी अशा आंतरशाखीय विषयांना जोडून जीवशास्त्रातील संशोधन अनेक विद्यार्थ्यांनी केले आहे. तथापी आंतरशाखीय संशोधनकार्याचा केंद्रबिंदू जीवशास्त्रातील संशोधन असणे अपेक्षित आहे. महाविद्यालयीन पातळीवर जीवशास्त्राचा अभ्यास न केलेल्या विद्यार्थ्यांनी जैविक शाखेत उत्तम संशोधन केल्याचे सिद्ध झाले आहे.

संशोधन कार्याची तीव्र आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड पीएच.डी. अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. त्यामुळे संशोधनाकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमासाठी निवडले जाते. पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरच अशा विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि एम.एस्सी ही पदवी प्रदान केली जाते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थाला मध्येच हा अभ्यासक्रम सोडून जाता येत नाही. रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र या विषयांमध्ये बी. एस्सी किंवा एम.एस्सी केलेले विद्यार्थी या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या परीक्षेला बसू शकतात. अशा विद्यार्थ्यांच्या दोन पेपरमधील सर्वोत्कृष्ट गुण निवडीसाठी ग्राह्य धरले जातात. जीवशास्त्राच्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे चार भाग असतात. विद्यार्थी त्यांच्या पदवीस्तरीय अभ्यासक्रमाच्या बलस्थानानुसार प्रश्न सोडवू शकतात.

जीवशास्त्र हा खूप लवचीक विषय असल्याने संशोधन पूर्ण केल्यावर जीवशास्त्रातील विभिन्न पलूंच्या अभ्यासासाठी पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रम कोणत्या विषयात केलेला आहे, याचा अशा जैविक संशोधन कार्यात फरक पडत नाही.

या परीक्षेची महाराष्ट्रातील केंद्रे –

१) केंद्रीय विद्यालय नंबर १, होमी भाभा रोड, नेव्ही नगर कुलाबा, मुंबई- ४००००५,

२) श्री रामदेव बाबा, कमला नेहरू इंजिनीअिरग कॉलेज, जी ब्लॉक-फर्स्ट इअर ब्लॉक, गिट्टिखदान, काटोल रोड, नागपूर- ४४००१३.

संपर्क- दूरध्वनी- ०८०-२३६६६४०४.

First Published on May 26, 2018 1:22 am

Web Title: biological interdisciplinary research