18 November 2017

News Flash

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीमध्ये जीवशास्त्राचा अभ्यास

विज्ञानातील मूलभूत संशोधनासाठी जर्मनीतील अनेक संस्था प्रसिद्ध आहेत. त्या

प्रथमेश आडविलकर | Updated: May 20, 2017 12:34 AM

जीवशास्त्रातील मूलभूत संशोधन करण्यास योग्य अशा आयएमबी या जर्मनीतील संस्थेद्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. जगभरातून केवळ १० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे त्याचे महत्त्व निश्चितच जास्त आहे.

विज्ञानातील मूलभूत संशोधनासाठी जर्मनीतील अनेक संस्था प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे, द इन्स्टिटय़ूट ऑफ मॉलिक्युलर बॉयोलॉजी (आयएमबी.) या संस्थेकडून दरवर्षी जीवशास्त्रातील पीएच.डी.च्या संशोधनासाठी जगभरातून फक्त १० विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ मधील स्प्रिंग सेमिस्टरच्या पीएच.डी. प्रवेशांसाठी संस्थेकडून

दि. २३ जून २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदारांना नोंदणी मात्र दि. १६ जून २०१७ पूर्वी करायची आहे.

शिष्यवृत्तीविषयी –

जर्मनीतील द इन्स्टिटय़ूूट ऑफ मॉलिक्युलर बॉयोलॉजी (आयएमबी) ही  २०११ साली स्थापना झालेली संशोधन संस्था आहे. ही संस्था जर्मनीमधील ‘जोहान्स गुटेनबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ मेइन्झ’चे जीवशास्त्रातील मुख्य संशोधन केंद्र असून तिथे ‘डेव्हलपमेंटल बॉयोलॉजी, एपिजेनेटिक्स व डीएनए रिपेअर’ या विषयांमध्ये संशोधन केले जाते. आयएमबी ही संस्था जर्मनीतील नामांकित संशोधन संस्थांपैकी एक असून जीवशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. आयएमबीमध्ये सध्या एकूण २३ देशांतील १०० पूर्णवेळ पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांचे संशोधन सुरू आहे. दरवर्षी ‘डेव्हलपमेंटल बॉयोलॉजी, एपिजेनेटिक्स व डीएनए रिपेअर’ या विषयांमध्ये पीएच.डी.तील संशोधनासाठी जगभरातून फक्त १० विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शिष्यवृत्ती संस्थेकडून दिली जाते. फक्त याच विषयांमधील संशोधनामध्ये कार्यरत असणारी जगातील ही एकमेव संस्था असावी. कारण म्हणूनच दरवर्षी पीएच.डी.च्या एका जागेसाठी जगभरातून किमान पाचशे अर्ज येतात.

शिष्यवृत्तीचा सुरुवातीचा कालावधी हा तीन वर्षांचा असेल. नंतर तो पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या आवश्यकतेनुसार वाढू शकतो. शिष्यवृत्तीधारकाला पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जाईल.

पूर्ण केलेली पीएच.डी. पदवी त्याला युनिव्हर्सिटी ऑफ मेइन्झ’कडून बहाल करण्यात येईल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला नि:शुल्क शिक्षण, मासिक वेतन, दरमहा निवासी भत्ता, वेतन भत्ता, सामाजिक सुरक्षा निधी, प्रवास भत्ता, संशोधनासाठीची अनुदानित रक्कम व इतर सुविधा देण्यात येतील.

आवश्यक अर्हता  –

द इन्स्टिटय़ूट ऑफ मॉलिक्युलर बॉयोलॉजी या संस्थेतील पीएच.डी.साठीचा असलेला प्रवेश व शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॉलिक्युलर बॉयोलॉजीशी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. पदव्युत्तर पातळीवर त्याचा प्रथम श्रेणी जीपीए असावा. अर्जदाराचा पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल हा एक महत्त्वाचा निकष निवडीकरिता संस्थेने ठरवलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गुणात्मक संशोधन व दर्जात्मक अहवाल या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा.

अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली जीआरई परीक्षा उत्तीर्ण असावे, अशी कोणतीही अट संस्थेने घातलेली नाही. मात्र, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेतली तर या परीक्षांपैकी शक्यतो जीआरई या परीक्षेत अर्जदाराने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरेल. अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

तसेच अर्जदारांसाठी आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या दोन्हींपैकी एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी संस्थेने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही, मात्र अर्जदाराचा बायोडेटा अतिशय उत्तम असावा. त्याच्याकडे एखाद्या संशोधन संस्थेमधील संशोधन अनुभव असणे किंवा जर्मन भाषेचे उत्तम ज्ञान असणे इत्यादी बाबी त्याला अंतिम निवड प्रक्रियेमध्ये निश्चितच प्राधान्यक्रम मिळवून देऊ  शकतात.

अर्ज प्रक्रिया –

द इन्स्टिटय़ूट ऑफ मॉलिक्युलर बॉयोलॉजी या संस्थेतील पीएच.डी. प्रवेशासहित असलेल्या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी आवश्यक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदाराने त्याप्रमाणे पीएच.डी.चा अर्ज पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या पीडीएफ प्रतींसह संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करावा. कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय पाठवलेला अर्ज अपूर्ण मानला जाईल. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रकाशित केलेले शोधनिबंध, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीआरई व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, संशोधनाचे किंवा कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र, पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल, तसेच त्याच्या आवडीच्या संशोधन-विषयांची माहिती व त्यातील अनुभव विशद करणारा एकपानी लघु अहवाल इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदाराने त्याच्या संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन शास्त्रज्ञांची शिफारसपत्रे पाठवावीत. अर्जासोबत कव्हर लेटर असावे.

निवड प्रक्रिया –

अर्जदाराची शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनातील पूर्व अनुभव एकूण लक्षात घेऊन त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. अर्जदाराची मुलाखत दि. २६ जून ते २८ जून २०१७ अशी तीन दिवस सखोलपणे घेतली जाईल.

मुलाखत जर्मनीमध्ये संस्थेच्या आवारात घेतली जाईल. त्यासाठी अर्जदाराला विमानप्रवास आणि निवासाचा पूर्ण खर्च दिला जाईल. निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना त्यांच्या निवडीबाबत त्याच वेळी कळवण्यात येईल.

मुलाखतीसाठी एकूण २५ अर्जदारांना बोलावण्यात येईल व त्यामधून १० अंतिम अर्जदारांची निवड करण्यात येईल.

उपयुक्त संकेतस्थळ –

https://www.imb.de/

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. १६ जून २०१७ तर अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. २३ जून २०१७ ही आहे.

itsprathamesh@gmail.com

First Published on May 20, 2017 12:34 am

Web Title: biology studies in germany