News Flash

वेगळय़ा वाटा : नवरी नटली!

रंगसंगतीची उत्तम जाण हवी. मेकअप ही काही नुसती रंगरंगोटी नाही.

सौंदर्य आणि प्रसाधन क्षेत्रातील स्कीन, हेअरड्रेसिंग, ब्युटी, अ‍ॅडव्हान्स ब्युटी ट्रीटमेंटस् आदी गोष्टी आपण पाहिल्या. त्यापलीकडेही या क्षेत्राचा बराच मोठा विस्तार आहे. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे ब्रायडल मेकअप. अर्थात वधूचे केशभूषा, वेशभूषा आणि रंगभूषा.

लग्नामध्ये सर्वाचे लक्ष असते ते वधूकडे. ती कशी तयार झाली आहे, कशी साडी नेसली आहे, दागिने कोणते, केशरचना कशी या साऱ्याकडे आमंत्रितांचे लक्ष असते. त्यामुळे प्रत्येकीला आपल्या लग्नात सुंदर दिसायचे असते. यासाठीच मदतीला येतात ब्रायडल मेकअप करणारे कलाकार. ब्रायडल मेकअप असे जरी म्हटले असले तरी यात केशरचना, साडी नेसवणे, सजवणे असे सर्वच येते. वरवर दिसायला जरी हे सोपे वाटले तरी हे सोपे नाही. वधूला विवाह सोहळ्यातील प्रत्येक विधीनुरूप तयार करणे, तेही अगदी थोडक्या वेळात ही ब्रायडलची मुख्य गरज असते. त्यामुळेच ब्रायडल करणाऱ्या व्यावसायिकांना काही गोष्टींचे ज्ञान असावेच लागते.

रंगसंगतीची उत्तम जाण हवी. मेकअप ही काही नुसती रंगरंगोटी नाही. वधूचा मेकअप हा तिचा पोषाख, स्टेज, वराचा पोषाख या सगळ्याला अनुसरून करावा लागतो. तो भडक होऊनही चालत नाही आणि फिका पडूनही चालत नाही. हेअरस्टायलिंग अर्थात केशभूषेचे आणि रचनेचेही उत्तम ज्ञान असावे लागते. नुसतेच केसांचा अंबाडा घातला त्यावर एखादे सजावटीचे फूल वगैरे चिकटवून दिले असे होत नाही. चेहऱ्याची ठेवण, उंची या गोष्टी लक्षात घेऊन केशभूषा निवडायला हवी. शिवाय त्याच्या सजावटीकरता लागणारी उपकरणे वापरण्याचे योग्य ज्ञानही आवश्यक आहे. ब्रायडल मेकअप करणाऱ्या व्यावसायिकाला एकाच व्यक्तीला निरनिराळ्या ढंगात सजवण्याचे कौशल्य असावे लागते. कारण वधू नेमकी कोणत्या कार्यक्रमासाठी तयार होणार आहे, त्यानुसार तिचे दिसणे, सजणे ठरते. म्हणजे हल्ली लग्नात हळद, संगीत, प्रत्यक्ष लग्नविधी, कॉकटेल पार्टी, स्वागत समारंभ असे अनेक कार्यक्रम असतात.

प्रत्येक कार्यक्रमानुसार वधूची केशभूषा, वेशभूषा आणि रंगभूषा बदलते. तसेच स्टेज कसे आहे, त्यावर कशा प्रमाणात लाइट आहे, फोटोग्राफी कशा प्रकारे होणार आहे, त्यावेळी कशा प्रकारे मेकअप हवा, अशा सगळ्या गोष्टींचे ज्ञान असावे लागते. प्रत्येक जातीधर्माच्या वधूंचा पोषाख वेगळा असतो. त्यांच्या पारंपरिक पद्धतींची योग्य माहिती ब्रायडल करणाऱ्या व्यावसायिकाला असायलाच हवी. साडी नेसवण्याचे ज्ञान असावे. त्याचप्रमाणे हल्ली अनेक नववधू लग्नानंतरच्या स्वागत समारंभासाठी पाश्चिमात्य पोषाख निवडतात. हे पोषाख त्यांच्या डौलात वधूला नेसवून देणे, हे ब्रायडल करणाऱ्याचे काम असते. हल्ली वधूबरोबरच वराच्याही रंगभूषेला आणि वेशभूषेला महत्त्व आलेले आहे. त्यामुळे तुम्ही तेही करू शकता. त्याचे वेगळे पैसेही मिळतात. परंतु यासाठी पुरुषांची केशरचना, रंगभूषा याचे ज्ञान असावे लागते. ब्रायडल ही सध्या एक मोठी इंडस्ट्री म्हणून नावारूपाला येत आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात पैसाही आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली लग्नातली चमकधमक वाढली असल्याने दिसण्यावर, नटण्या सजण्यावर भरपूर पैसे खर्च केले जातात. त्यामुळे नवोदित असो की प्रस्थापित या क्षेत्रात प्रत्येक गुणी व्यावसायिकाला संधी आहेत. हल्ली प्री ब्रायडल शूटसाठीही मेकअप आर्टस्टिना बोलावले जाते. यामध्ये शक्यतो आऊटडोअर फोटोशूट असते. त्यासाठी केला जाणारा मेकअप पुन्हा निराळा असतो. या क्षेत्रात लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे, लग्न हा वधू-वरांच्या आयुष्यातला सोनेरी क्षण असतो. शिवाय तो एकदाच येणार असतो. त्यामुळे ब्रायडल करणाऱ्या व्यावसायिकाला आपले काम चोखच करावे लागते. नाहीतर पूर्ण आयुष्यभरासाठी तो बट्टा लागून जातो.

विषयातील शिक्षण देणाऱ्या संस्था

ब्रायडलसोबतच आणखी नव्याने उदयाला येणारे क्षेत्र म्हणजे, नेलआर्ट. नखांचा उल्लेख असला तरी हे करिअर नखाएवढे नाही. त्याचा विस्तार बराच मोठा आहे.

फँटसी मेकअप म्हणजे एखादी थीम किंवा संकल्पना घेऊन त्यावर मेकअप करणे. तसेच प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे चेहरेपट्टी बदलूनच टाकणारा मेकअप आदी गोष्टीही सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण तूर्तास करिअरच्या वाटांमध्ये इतकेच.

hutkey@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2017 12:29 am

Web Title: bridal makeup makeup field
Next Stories
1 आदर्श शाळा
2 नोकरीची संधी
3 एमपीएससी मंत्र : पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेची पूर्व तयारी
Just Now!
X