दरवर्षी विद्यापीठांची जागतिक क्रमवारी काही खासगी संस्थांकडून जाहीर करण्यात येते. विद्यार्थी संख्या, अभ्यासक्रम, त्यातील नावीन्य, पायाभूत सुविधा, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी अशा काही निकषांवर ही क्रमवारी ठरवण्यात येते. टाइम्स या क्रमवारी ठरवणाऱ्या संस्थेकडून शिक्षकांची गुणवत्तेनुसार, जागतिक स्थान, विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेनुसार अशा वेगवेगळ्या क्रमवारी जाहीर करण्यात येतात.

गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठांची प्रतिष्ठा किंवा जनमानसातील प्रतिमा यांनुसारही क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. या क्रमवारीच्या अहवालानुसार जागतिक क्रमवारीप्रमाणेच अमेरिकेतील विद्यापीठांचा यातही वरचष्मा आहे. जागतिक क्रमवारीत आशिया खंडातील सिंगापूर, चीन, जपान या देशांची विद्यापीठे गेल्या काही वर्षांत वरचे क्रमांक पटकावत आहेत. मात्र, तरीही जागतिक पटलावर जनमानसात आशियातील विद्यापीठे आपली प्रतिमा अजून उमटवू शकलेली नाहीत. या विद्यापीठांना पसंती देणारे विद्यार्थी हे बहुतेक करून त्या देशातीलच आहेत. फार तर शेजारील काही देशांतील विद्यार्थ्यांकडून या विद्यापीठांना पसंती दिली जाते. मात्र, या विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे या विद्यापीठांची क्रमवारी वधारत असल्याचे टाइम्सने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

अमेरिकेतील विद्यापीठांना जगभरातून पसंती मिळते आहे. मात्र युरोपमधील विद्यापीठांबाबत तेथील देशांपेक्षाही इतर देशांतील विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यामुळे आशियातील विद्यापीठांमध्ये शेजारील राष्ट्रामधील परदेशी विद्यार्थी संख्या अधिक असते. युरोप किंवा अमेरिकेतील विद्यार्थी येथे फारसे येत नाहीत. मात्र त्या उलट भारतीय काय किंवा आशियातील इतर देशांतील विद्यार्थ्यांचा कल हा अमेरिका अथवा युरोपमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याकडे अनेक वर्षांपासून आहे.आशियातील विद्यापीठे विश्वासार्हता टिकवण्यात कमी पडतात. त्याचप्रमाणे निर्णय प्रक्रियेत प्रत्येक घटकाला सामावून घेतले जात नाही, विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती दिली जात नाही त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिष्ठेवर होतो, असेही निरीक्षण टाइम्सने नोंदवले आहे.

हार्वर्ड विद्यापीठ या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्याशिवाय पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये अमेरिकेतील ४३ विद्यापीठे आहेत. केंब्रीज, ऑक्सफर्डसह युरोपमधील ९ विद्यापीठे आहेत. भारतीय विद्यापीठे ही अद्याप या म्हणावी तशी या स्पर्धेतही नाहीत. नाही म्हणायला बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सने ९१ ते १०० दरम्यान स्थान मिळवले आहे. मात्र त्यालाही भारतीय आणि आशिया खंडातील विद्यार्थ्यांकडूनच सर्वाधिक पसंती आहे.

संकलन – रसिका मुळ्ये