17 November 2019

News Flash

करिअरमंत्र

सूक्ष्मजीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये अनेक संधी आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

* मी बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षांला आहे. सध्या सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचा अभ्यास करतो आहे. यामध्ये पुढे कोणत्या संधी आहेत?

– पुरुषोत्तम मोहिते

सूक्ष्मजीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये अनेक संधी आहेत. या विषयातील पदवीधरांना बायोमेडिकल सायन्टिस्ट, क्लिनिकल रिसर्च असोसिएट, फूड टेक्नॉलॉजिस्ट, हेल्थकेअर सायन्टिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्माकॉलॉजिस्ट, रिसर्च सायन्टिस्ट इन लाइफ सायन्सेस, टेक्निकल ब्रिवेर, वॉटर क्वालिटी सायन्टिस्ट, इकॉलॉजिस्ट, फॉरेन्सिक सायन्टिस्ट, फिजिशिअन असोसिएट, सायन्स रायटर, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, इंडस्ट्रिअल मायक्रोबायोलॉजिस्ट, अ‍ॅग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजिस्ट, मरिन मायक्रोबायोलॉजिस्ट, बॅक्टेरिऑलॉजिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट, सेल बायोलॉजिस्ट, जेनेटिस्टिक्स, मायकोलॉजिस्ट, प्रोटोझुऑलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, इम्युनोलॉजिस्ट, व्हायरॉलॉजिस्ट, एनव्हिरॉन्मेंटल  मायक्रोबायोलॉजिस्ट, फूड मायक्रोबायोलॉजिस्ट अशासारख्या करिअर संधी प्राप्त होऊ  शकतात.

* माझे एम.एस्सी. झाले आहे. सध्या वय २६ वर्ष आहे. मी पुण्यात राहतो आणि आता गेल्या चार महिन्यांपासून यूपीएससीची तयारी सुरू केली आहे. पण मित्र म्हणतात की, माझे वय जास्त असल्याने मी यशस्वी होऊ शकणार नाही. मला खूप नैराश्य आले आहे. मी काय करावे? 

– निवृत्ती मोटे

सर्वात प्रथम एक गोष्ट करा, ते म्हणजे तुम्हाला बदसल्ला देणाऱ्या तुमच्या त्या मित्रांना तुमच्या आयुष्यातून निवृत्त करत राहा. नैराश्य देणाऱ्या लोकांपासून दूर राहिलेलं कधीही उत्तमच. वयाचा आणि यूपीएससीतील परीक्षेचा  काहीही संबंध नाही. तुम्ही आणखी तीन-चार वेळा ही परीक्षा देऊ  शकता. तुम्ही मनापासून या परीक्षेची तयारी केली तर यात यश मिळणे अशक्य नाही. अनेक उमेदवार तुमच्यापेक्षासुद्धा अधिक वयाचे असतात. तुम्ही एम. एस्सी. केले असल्याने कोणती तरी नोकरी करत असालच. त्यामुळे तुमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. तेव्हा अगदी निश्चिंत मनाने झोकून द्या. अभ्यास करा. शिवाय सध्या पुणे शहरात अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्था व मार्गदर्शक आहेत. शक्य असल्यास त्यांचाही लाभ घ्या.

*  मी बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. पण माझे इंग्रजी चांगले नाही. त्यासाठी मी काय करावे?

– विशाल ढोबळे

इंग्रजी उत्तम येत असेल तर स्पर्धा परीक्षा आणि पुढे करिअरमध्येही त्याचा नक्कीच फायदा होतो. नागरी सेवा परीक्षेतील मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी निबंधाचा पेपर, उमेदवाराचे इंग्रजी आकलन आणि लेखनकौशल्य तपासणी करण्यासाठी असतो. बँकांच्या परीक्षेमधील अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमध्ये एक पेपर उमेदवारांचे इंग्रजीचे सर्वसाधारण ज्ञान तपासण्यासाठी असतो. शिवाय मुलाखतीमध्ये उमेदवारांचे इंग्रजी संभाषणकौशल्य तपासले जाते. एमपीएस्सी परीक्षेतही इंग्रजी उत्तम येत असल्यास इतर उमेदवारांपेक्षा तुम्ही दोन पावले पुढे राहू शकता. या बाबी ध्यानात घेता तू इंग्रजीचा मुळापासूनच अभ्यास करावास. त्यासाठी चांगल्या अध्यापकाची मदत घेणे गरजेचे आहे. स्वत:ला काहीच येत नाही, असे प्रामाणिकपणे सांगून या अध्यापकाकडून इंग्रजीचे धडे गिरवावेस. कष्टाने अभ्यास करून आपले इंग्रजी सुधारून घ्यावे. सध्या इंग्रजी चांगले नाही, याचा अर्थ ते कधीच होणार नाही, असे नव्हे. प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल.

First Published on September 20, 2017 5:10 am

Web Title: career counselor answer career related question
टॅग Career