13 December 2017

News Flash

डोळसपणे करिअर निवडा

पालक, मित्र आणि त्या क्षेत्रातील जाणकारांची मदत घ्या.

शलाका सरफरे | Updated: June 17, 2017 1:52 AM

कोणते क्षेत्र सध्या प्रसिद्ध आहे, किंवा कोणत्या क्षेत्रात अधिक वाव आहे, असे विद्यार्थी कायम विचारतात. पण आधी आपली आवड आणि क्षमता तपासून घेण्याचा  करिअर समुपदेशक विवेक वेलणकर देतात. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमांची माहिती..

दहावीनंतर  विद्याशाखा ठरवताना फक्त गुणांचा विचार केला जातो. मात्र या वेळी आपली आवडही तपासा. ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’सारख्या प्रकारांमुळे कधी कधी मुलांचे खरे गुण नसून तो गुणवाढीचा फुगवटा आहे की काय, असे वाटू लागते. त्यामुळे केवळ टक्क्यांवर प्रवेश ठरवू नका. नाही तर एखाद्या मुलाला असतात ९० टक्के तो म्हणजे मला विज्ञान शाखेत जायचेय, पण वस्तुस्थिती अशी असते की, त्याला नेमके विज्ञानातच कमी गुण मिळालेले असतात. जास्त गुण मिळाले म्हणजे विज्ञान शाखा निवडायची आणि कमी गुण मिळाले की इतर शाखांकडे वळायचे, हा  विचार डोक्यातून काढून टाका. आपल्याला आवडतील, जमतील आणि झेपतील असे विषय निवडा. पालक, मित्र आणि त्या क्षेत्रातील जाणकारांची मदत घ्या. मात्र निर्णय  स्वत:च घ्या. घेतलेल्या निर्णयाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहा. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांत करिअरच्या समान संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

होम सायन्स

हा मुलींसाठी एक उत्तम पर्याय आहे. पण होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक असा गैरसमज असल्याने या विषयाकडे मुली वळतच नाहीत. खरी परिस्थिती वेगळी आहे. होम सायन्समध्ये अनेक उत्तम अभ्यासक्रम आहेत. होम मेकिंगपासून ते इंटिरिअर डेकोरेशन आणि इंटिरिअर डिझाइनचे अनेक विषय येतात. त्यामुळे पदवीनंतर स्वत:चा व्यवसाय करायला संधी आहे. या क्षेत्राचाही विद्यार्थ्यांनी विचार करावा.

अभियांत्रिकी अभ्यासक्रम

पदविका आणि बारावीनंतर प्रवेश परीक्षा देऊन पदवी अभ्यासक्रम असे दोन मार्ग अभियांत्रिकीसाठी आहेत.   पदविकेनंतर थेट पदवीच्या द्वितीय वर्षांला प्रवेश घेता येतो.   या दोन्हीपैकी कोणता मार्ग निवडायचा, हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायला हवा. बारावीनंतर इंजिनीअरिंगसाठी ७० शाखा आहेत. पण विद्यार्थी त्याकडे लक्षच देत नाहीत. आर्मी इंजिनीअरिंगचा पर्यायही आहेच. तो फक्त मुलांसाठी आहे.  त्यात कठोर मेहनत आहे.

कायद्याचे शिक्षण

यासाठी स्वतंत्र सीईटी  सुरू झाली आहे. ती पास झाल्यावर त्या गुणांच्या आधारे,  कायद्याचे शिक्षण देणाऱ्या  महाविद्यालयात ५वर्षांचा अभ्यासक्रम करता येतो. मात्र यात नोकरीपेक्षा व्यवसायाच्या संधी जास्त आहेत.

हॉटेल मॅनेजमेंट 

हॉटेल मॅनेजमेंटला जाण्यासाठी अकरावी-बारावी, एमसीव्हीसी कोणताही अभ्यासक्रम चालतो. अकरावी-बारावी हॉटेल मॅनेजमेंट असाही अभ्यासक्रम आहे. हा कौशल्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असून परीक्षा आणि प्रमाणपत्रही शासनाकडून दिले जाते. त्यामध्ये पाच विषय त्या त्या संदर्भातील कौशल्याचे असून इतर दोन विषय इंग्लिश, मराठी सर्वसामान्य विषय आहेत. त्यामध्ये वीस प्रकारचे अभ्यासक्रम असून त्यामध्ये विद्यार्थ्यांला त्या विषयाचे किमान ज्ञान दिले जाते. यातून विद्यार्थ्यांना पुढील प्रगती साधता येते किंवा  स्वत:च्या पायावर उभे राहता येते.

वाणिज्य शाखेतील व्यावसायिक शिक्षण

सीए, सीएस असे अनेक पर्याय या शाखेत आहेत. फक्त ज्यांच्या स्वभावात चिकाटी आहे, त्यांनी ते निवडावेत. यासाठी प्रवेश परीक्षा, मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा अशी या परीक्षांची चौकट ठरलेली आहे.

मेडिकलमधील करिअर

एमबीबीएस, बीडीएस यापलीकडेही मेडिकलमध्ये अनेक संधी आहेत.   फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, अ‍ॅक्युप्रेशरथेरपी, व्हेर्टनरी सायन्स यात खूप वाव आहे.  प्राण्यांच्या डॉक्टरांना तर परदेशात खूप मागणी आहे. इन्शुरन्स कंपन्या आणि बँकांकडूनही प्राण्यांच्या डॉक्टरांची नेमणूक केली जाते. फिजिओथेरपिस्ट हा चांगला अभ्यासक्रम आहे. फार्मसीलाही चांगला वाव आहे पण    महाविद्यालय चांगले निवडावे लागते.

र्मचट नेव्ही

या अभ्यासक्रमाचे शिक्षण दोन सरकारी महाविद्यालये देतात. बी.एस्सी. नॉटिकलचे शिक्षण मुंबई आणि कोलकात्याला मिळते.  अनेक खासगी महाविद्यालयेही याचे शिक्षण देतात. मात्र यात कंत्राटी पद्धतींवर नोकऱ्या असतात.  हे साहसी माणसांचे करिअर आहे. आता यामध्ये मुलींनाही संधी आहेत.

वैमानिक होण्यासाठी

वैमानिक होण्यासाठी सरकारी आणि खासगी दोन्ही मार्ग आहेत. एनडीएमध्ये प्रवेश मिळवून सरकारी खर्चाने वायुदलामध्ये यशस्वी प्रवेश करता येतो किंवा विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून शिक्षण घेऊन विमान चालवण्याचे व्यावसायिक परवाना मिळवता येतो. मात्र त्यासाठी सुमारे ३५ ते ३६ लाखांचा खर्च आहे. त्यासाठी रायबरेली येथे सरकारी कॉलेज असून त्याचे शुल्कही ३५ लाखांपर्यंत आहे.

First Published on June 17, 2017 1:52 am

Web Title: career counselor vivek velankar career guidance