मी बी. कॉमच्या तिसऱ्या वर्गाला आहे. मला एमबीए करायचे आहे. मी मध्यमवर्गीय मुलगी आहे. एमबीएसाठी आर्थिक खर्च किती येईल? एवढा खर्च केल्यानंतर चांगल्या संधी मिळतील का? कोणत्या महाविद्यालयातून आणि कोणत्या शाखेतून एमबीए केल्यावर चांगली संधी मिळेल? त्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे?

हर्षदा भुजाडी

एमएच सीईटी-एमबीए या परीक्षेद्वारे पहिल्या पाच क्रमांकाच्या एमबीए शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट करिअर घडू शकते. पहिल्या पाचमध्ये जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, सिडनेहॅम, के. जे. सोमय्या, वेलिंगकर्स, पुम्बा यांचा समावेश होतो. खासगी महाविद्यालयांचे शुल्क चार लाख रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी बँकाकडून शैक्षणिक कर्ज मिळू शकते. सिडनेहॅमचे वार्षिक शुल्क ७० हजार रुपये आहे. कॉमन एंन्ट्रन्स एक्झामिनेशन देऊन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश मिळवता येऊ  शकतो. आयआयएममधील प्रवेश हा उत्तम करिअर घडवण्याची खात्री देतो. आयआयएमची फी अधिक असली तरी त्यासाठीही बँका कर्जसुद्धा देतात. दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये कॅटच्या गुणांवर प्रवेश दिला जातो. त्याचे वार्षिक शुल्क ४० हजार रुपयांच्या आसपास आहे. ही संस्था अनेक आयआयएमपेक्षा चांगली समजली जाते.

मला बारावीला ६५ टक्के मिळाले होते. तर दहावीमध्ये ७० टक्के मिळाले होते. देशाच्या संरक्षण सेवेत जाण्याचे माझे स्वप्न आहे. ते कशा प्रकारे पूर्ण करता येईल?

साहिल केदारे

नॅशनल डिफेन्स एक्झामिनेशन ही परीक्षा देऊन भूदल, वायूदल किंवा नौदलात सामील होण्याची संधी तरुणांना मिळते. ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी दोनदा घेण्यात येते. या परीक्षेद्वारे निवड झाल्यास तुला वरिष्ठ पदावर नियुक्ती मिळू शकते.

संकेतस्थळ  www.nda.nic.in आणि www.nda.nic.in

त्याच पद्धतीने एअर मॅनची परीक्षा देऊन वायुदलात कनिष्ठ स्तरावर प्रवेश मिळवता येतो. त्यासाठी संकेतस्थळ आहे.  https://airmenselection.gov.in

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.