उत्पनाच्या दाखल्याचा फायदा काय असतोमाझ्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मी मागासवर्गीय असल्यास माझ्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी या उत्पन्न दाखल्याचा काही उपयोग होऊ शकतो का?

मितेश पाटकर

ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीयांसाठी सवलत मिळू शकते. त्याअंतर्गत अभ्यासक्रमनिहाय प्रवेश शुल्कामध्येही विशिष्ट प्रमाणात सवलत मिळू शकते. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठी फायदा होऊ  शकतो. तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये नॉन क्रिमिलेअर मागासवर्गीय प्रमाणपत्र धारकांनाच इतर मागासवर्गीय संवर्गासाठी असलेल्या राखीव जागा, प्रवेश शुल्क व इतर तत्सम बाबींचा लाभ मिळू शकतात. त्यासाठी अधिकृत उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे ठरते.

मी बी.ई मेकॅनिकल करतो आहे. सध्या शेवटच्या वर्षांस आहे. मला शासकीय अभियांत्रिकी सेवेमध्ये जायचे आहे. अशा परीक्षांविषयी मला माहिती द्यावी. या परीक्षांची कशी तयारी करायची ते सांगाल का?

अभिजित मोहिते

शासकीय सेवेमध्ये विद्यार्थ्यांना तीन पद्धतीने प्रवेश घेता येऊ शकतो.

(१) गेट परीक्षा- गेट परीक्षा म्हणजेच ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित भारत सरकारच्या अखत्यारितील ओएनजीसी, कोल इंडिया, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न, मिनीरतन यासारख्या कंपन्या मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करतात. मुलाखतीमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना वरिष्ठ पदावर व नियुक्ती दिली जाते.

(२) इंडियन इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिस- संघ लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे मेकॅनिकल विषयातील अभियंत्यांना इंडियन रेल्वे सव्‍‌र्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इंडियन रेल्वे स्टोअर्स सव्‍‌र्हिस, इंडियन डिफेन्स सव्‍‌र्हिस ऑफ इंजिनीअर्स, सेंट्रल मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिस, सेंट्रल वाटर इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिस ग्रुप ए, सेंट्रल वाटर पॉवर इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिस, सेंट्रल इंजिनीअरिंग रोड सव्‍‌र्हिस, इंडियन इन्सेपक्शन सव्‍‌र्हिस, इंडियन नॅव्हल आर्मामेंट सव्‍‌र्हिस, इंडियन सप्लाय सव्‍‌र्हिस, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर ग्रुप ए-जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर इन कॉर्प्स ऑफ इएमई, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स-जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, असिस्टंट नॅव्हल स्टोअर ग्रेड वन इन इंडियन नेव्ही. या सेवांमध्ये वरिष्ठ पदे मिळू शकतात. पहिले पद हे साहाय्यक अभियंता हे असते. या पदावर नियुक्त झालेले अभियंते संबंधित संस्थेच्या चेअरमनपदी वा व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नत होऊ  शकतात. या परीक्षेचे तीन टप्पे आहेत. (१) प्राथमिक परीक्षा (२) मुख्य परीक्षा (३) मुलाखत. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. उपलब्ध जागांनुसार उमेदवारांना नियुक्ती दिली जाते.

(३)कंबाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसद्वारे लष्कराच्या मेकॅनिकल अभियंता शाखेत नोकरी मिळू शकते. पदवीपर्यंतचा अभ्यास सर्व संकल्पना समजून केल्यास या परीक्षांमध्ये यश मिळवणे कठीण जात नाही. अनेक विद्यार्थी अशा प्रकारे यश मिळवत असतात. तथापी या परीक्षा विशिष्ट पद्धतीने घेतल्या जातात. त्याचा भरपूर सराव केल्यास फायदा होऊ शकतो. त्यासाठी बऱ्याच संस्था कोचिंग क्लासेस चालवतात. अशी शिकवणी लावणेही फायद्याचे ठरू शकते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)