मी एक माजी सैनिक आहे. मी पदवीचे पहिले आणि दुसरे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्यामध्ये माझे विषय, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास हे होते. मात्र तिसऱ्या वर्षांसाठी मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला होता आणि हिंदी विषय घेऊन ती पदवी मिळवली होती. तर मी एमपीएससी किंवा अन्य परीक्षा देऊ शकतो का? माझी पदवी ग्राह्य़ धरली जाईल का?

सुनील कांबळे, परभणी

तीन वर्षे कालावधीची कोणत्याही विषयातील पदवी ही  राज्य लोकसेवा आयोग वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी किमान अर्हता आहे. आपण दिलेल्या माहितीवरुन मराठवाडा विद्यापीठातील आपला पदवी अभ्यासक्रम अपूर्ण असल्याचे दिसून येते. मुक्त विद्यापीठाच्या हिंदी विषयातील पदवीचा उल्लेखही तुम्ही केलेला आहे. ही एक वर्षांची पदवी तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे का, याची विचारणा तुम्ही मुक्त विद्यापीठाकडेच करणे आवश्यक आहे. ही पदवी जर तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या समकक्ष असेल. तर तुम्हाल नि:संशय एमपीएससीची परीक्षा देता येणे शक्य आहे.

मी बी.एस्सीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला बँकिंगमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करायचा आहे. तर मी कोणता अभ्यासक्रम निवडू?

सुशांत व्यवहारे

बँकिंगमध्ये  पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी पुढील काही अभ्यासक्रम तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील. या अभ्यासक्रमासोबत ते कोणत्या संस्थेत उपलब्ध आहेत. त्यांचीही माहिती दिली आहे.

१)पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्शिएल सव्‍‌र्हिसेस),

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँक मॅनेजमेंट – पुणे, संपर्क- http://pgdm.nibmindia.org

२)एमबीए इन बँकिंग टेक्नॉलॉजी.

पाँडेचरी युनिव्हर्सिटी, संपर्क- http://www.pondiuni.edu.in/programmes

३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग.

इन्स्टिटय़ूट ऑफ फायनान्स, बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स-मुंबई, संपर्क – http://www.ifbi.com/program.aspx

४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग, इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड इन्शुरन्स.

वेलिंगकर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च-मुंबई, संपर्क – https://www.welingkaronline.org/academic-programs.aspx. याच संस्थेने डिप्लोमा इन बँकिंग हा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रमही सुरू केला आहे.

५)  एम.कॉम इन बँक मॅनेजमेंट.

देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदौर, संपर्क – http://www.dauniv.ac.in

६) एमबीए इन बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स, संस्था सिम्बॉयसिस स्कूल ऑफ बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स पुणे,

संपर्क – www.ssbf.edu.in/mba_banking_finance

७) एमबीए इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स

डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी- http://www.dypatil.edu/schools/management/mba-in-banking-insuranc तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)