मी बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी या विषयाच्या द्वितीय वर्षांला शिकत आहे. मला इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिसमध्ये जायचे आहे. त्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होईल का?

अभिषेक गवळी

इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस ही परीक्षा देण्यासाठी वनस्पतीशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, कृषी, फॉरेस्ट्री, सांख्यिकी, अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी इच्छुक उमेदवाराने प्राप्त करायला हवी. या यादीत बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान )शाखेचा समावेश नाही. त्यामुळे तू या परीक्षेला बसू शकत नाहीस.

मी मुंबई विद्यापीठाचा रिटेल मॅनेजमेंटचा पदविका अभ्यासक्रम करत आहे. पण रिटेल इंडस्ट्रीमध्ये काय संधी याबद्दल मला फारशी माहिती नाही. काही माहिती द्याल का?

विनय जाधव

रिटेल उद्योग हा सध्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. मुंबईला रिटेल उद्योगाची राजधानीसुद्धा संबोधले जाते. इथे सातत्याने नव नवे मॉल्स निघत आहेत. आता स्पेशलाइज्ड मॉल्ससुद्धा निघत आहेत. यासाठी प्रशिक्षित, उत्साही, कार्यक्षम, तत्पर, उत्तम संवाद कौशल्य व प्रसन्न व्यक्तिमत्त्व असणाऱ्या परिश्रमी मनुष्यबळाची गरज भासत असते. तुमच्या कौशल्यावर तुम्हास संधी मिळू शकते आणि पुढे या संधीचे सोने करणेही तुमच्या हातात असते. चांगल्या संस्थेतून अभ्यासक्रम केल्यास विषयाचे मूलभूत ज्ञान मिळून पाया पक्का होतो व संधी मिळणे सुलभ जाते. मुंबई विद्यापीठाचा जरी अभ्यासक्रम असला तरी तू कोणत्या संस्थेतून हा अभ्यासक्रम करत आहेस, हेसुद्धा महत्त्वाचे आहे.

मी सध्या फूड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर मला शासकीय नोकरी मिळेल का?

आशीष वावारे

फूड टेक्नॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी/ पीएच.डी. केल्यानंतर तुला अध्यापनाच्या संधी आहेत. ज्या शासकीय महाविद्यालये वा विद्यापीठांमध्ये हा विषय शिकवला जातो, त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. मात्र तिथे जागा कमी आणि उमेदवार अधिक ही परिस्थिती आहे. सध्या कार्यरत असणारे अध्यापक ज्याप्रमाणे निवृत्त होतील त्याप्रमाणे ही संधी मिळू शकेल. शासकीय नोकरीतच यायचे असल्यास राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा अशी संधी मिळवून देतात. तू सध्याच्या अभ्यासक्रमात चांगले ज्ञान संपादन केलेस, उत्तम गुण मिळवलेस तसेच सादरीकरण आणि संवाद कौशल्य प्राप्त केलेस तर अन्न व प्रक्रिया उद्योगातही तुला चांगल्या संधी मिळू शकतील.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा  career.vruttant@expressindia.com