मी दहावीची विद्यार्थिनी आहे. मला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा हा अभ्यासक्रम भारतात करावा की रशियामध्ये? जास्त सोईचे ठिकाण कोणते ठरेल?

रिद्धी कुलकर्णी

भारतातील वैद्यकीय शिक्षण हे निश्चितच चांगले मिळते. त्यामुळे केवळ जाहिरातींवर भुलून परदेशातील अनोळखी संस्थांमध्ये असे शिक्षण घेण्यात फार हशील नाही. देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील शैक्षणिक शुल्क महाग वाटत असेल तरीही त्यासाठी तुम्हाला बँकांकडून शैक्षणिक कर्जाची सोय आहे. त्याचा फायदा घेता येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क तर अल्पच असते.

मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षांला आहे. भविष्यासाठी उत्तम अभ्यासक्रम कोणता राहील ?

पराग पाटील

मेकॅनिकल अभियंत्याला पदवी घेतल्यानंतरही चांगल्या नोकरी मिळू शकतात. तथापी त्यासाठी विषयाचे ज्ञान परिपूर्ण हवे. उत्तम संवाद कौशल्य हवे. स्वत:ला प्रभावीरीत्या सादर करता आले पाहिजे. तू ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहेस, तेथील प्लेसमेंट सेलद्वारे आता कॅम्पस निवडीची प्रक्रिया सुरू झाली असेलच, त्यात सहभागी होण्याची संधी मिळत असल्यास ही संधी घे. आपली निवड होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कर. सुरुवातीला कमी पगाराची नोकरी मिळाली तरी काही वर्षांच्या अनुभवानंतर तुला अधिक चांगली कंपनी व पगार मिळू शकतो. मेकॅनिकल पदवी घेतल्यावर आयआयटी / एनआयटी किंवा सीओईपीसारख्या संस्थांमधून एम.टेक केल्यास चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात जाऊन एम.एस करण्याचा पर्याय बरेच विद्यार्थी निवडतात. मात्र तेथेही तुला दर्जेदार शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळायला हवा. त्यासाठी जीआरई/ टोफेलमध्ये चांगले गुण मिळायला हवे. तू पदवीपर्यंत काही प्रकल्प केले असल्यास वा क्रीडाकौशल्य , अभिनय कौशल्य वा इतर अशाच प्रकारचे इतर कौशल्य प्राप्त केले असल्यास त्याचा आणखी लाभ होऊ शकतो. जर्मनीमध्ये मेकॅनिकल शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उत्तम समजला जातो. त्यासाठी तू प्रयत्न करावास.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)