सध्या मी बारावी कला शाखेत शिकत आहे. मला विधिशाखेत करिअर करण्याची इच्छा आहे. पण मला नेमके कळत नाही की, बारावीनंतर त्यासाठी प्रवेश घेऊ की पदवीनंतर विधिशाखेच्या अभ्यासक्रमाकडे वळू? दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहेत्यासाठी शिकवणी लावायची आवश्यकता आहे का? तसेच संबंधित अभ्यासासाठी पुस्तके सुचवाल का?

धनश्री पाटील

तुला बारावीमध्ये असतानाच विधिशाखेत करिअर करण्याची इच्छा निर्माण झालीय, हे खूपच चांगले आहे. त्यामुळे भविष्यातील तुझा मार्ग स्पष्ट झाला आहे. मग बारावीनंतर विधिशाखेला जावे की पदवीनंतर हा प्रश्नच मिटतो. बारावीनंतर प्रवेश घेतल्यास पाच वर्षांत विद्यार्थ्यांची सर्व दृष्टीने तयारी केली जाते. इंग्रजी भाषेची विशेष तयारी केली जाते. कोणत्या तरी विषयात पदवी घेऊन त्यानंतर विधिशाखेत जाण्याऐवजी थेट बारावीतच या शाखेला प्रवेश घेतलेला बरा.

कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट ( सीएलएटी) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा तुला द्यावी लागेल. या परीक्षेद्वारे तुला १८ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळू शकतो. या संस्थांची स्थापना भारत सरकारने विधि शाखेतील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केली आहे. त्यामुळे या संस्थेत प्रवेश मिळाल्यास तुझे करिअर नक्कीच वेगळ्या उंचीवर जाऊ शकते.

अर्हता – बारावीच्या कोणत्याही शाखेत ४५ टक्के गुण मिळायला हवेत. एससी, एसटी, ओबीसी गटातील उमेदवारांना ४० टक्के गुण हवेत.

संपर्क संकेतस्थळ – http://clatportal.com/

दिल्लीस्थित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील बॅचलर ऑफ आर्ट्स अँड एलएलबी (ऑनर्स) या पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट (ailet) घेण्यात येते.

संपर्क – नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली, सेक्टर १४, द्वारका, न्यू दिल्ली – ११००७८,

संकेतस्थळ – http://nludelhi.ac.in

दूरध्वनी- ०११-२८०३४२५७

निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ लॉमध्ये

१) बॅचलर ऑफ आर्ट अँड एलएलबी(ऑनर्स),

२) बॅचलर ऑफ कॉमर्स अँड एलएलबी(ऑनर्स),

३) बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड एलएलबी(ऑनर्स) हे अभ्यासक्रम करता येतात.

प्रवेशासाठी कॉमन लॉ एन्ट्रन्स अ‍ॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल.

संकेतस्थळ http://www.nirmauni.ac.in/ संपर्क- द अ‍ॅडमिशन ऑफिसर, इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ, निरमा युनिव्हसिर्टी, सारखेज-गांधीनगर रोड, अहमदाबाद, गुजराथ- ३८२ ४८१,

दूरध्वनी- ०२७१७-२४१९११/२४१९००-०४.

सिम्बॉयसिस लॉ स्कूलमध्ये बॅचलर ऑफ आर्ट अँड एलएलबी (आणि बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड एलएलबी हे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सिम्बॉयसिस एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. या चाळणी परीक्षेचा पेपर हा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा राहील.

परीक्षेसाठी http://www.set-test.org/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

पत्ता- सिम्बॉयसिस लॉ स्कूल, सव्‍‌र्हे नंबर- २२७, प्लॉट नंबर ११, रोहन मिथिलिया नवीन विमानतळ मार्ग, विमान नगर पुणे-४११०१४,  दूरध्वनी – ०२० – ६५२०१११४, संकेतस्थळ – https://www.symlaw.ac.in/

या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम हा साधारणत: सारखाच असून त्यासाठी बारावीपर्यंतच्या  इंग्रजी व गणिताची उत्तम तयारी केल्यास परीक्षेचा पेपर कठीण जात नाही. सामान्य ज्ञानाच्या पेपरसाठी चांगले पुस्तक विकत घ्यावे. अनेक खासगी संस्थांनी अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत. विधिशाखेचे शिक्षण घेण्याकडील तुमचा कल तपासण्यासाठी एक पेपर घेतला जातो. तो सर्वसाधारण स्वरूपाचाच असतो. त्याच्या तयारीसाठीही खासगी प्रकाशकांची पुस्तके वाचण्यास हरकत नाही. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप कळू शकते. काही संस्था या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणीवर्ग चालवतात. शक्य असल्यास तो लावायला हरकत नाही.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com