मी २०१७ साली बारावी, सीईटी, नीट या परीक्षा दिल्या. कमी गुण पडले म्हणून वडिलांच्या सांगण्यावरून पुन्हा प्रयत्न करीत आहे. मला डॉक्टरकी करायची नाही, मात्र चित्रपटात काम करायची इच्छा आहे. काय करावे?

महेश लोंढे

चित्रपटाची स्वप्ने पाहत आहे म्हणून बारावीत कमी मार्क पडले आहेत काय? तर आधी जागा हो. चित्रपटाचे क्षेत्र आकर्षक वाटले तरी तिथेही अभ्यास, कष्ट व चिकाटी याला अजिबात पर्याय नाही. हे चित्र वरुन जेवढे चकचकीत दिसते तेवढे ते खचितच नाही. यंदा उत्तम अभ्यास करून चांगले मार्क मिळवून मग वडिलांच्या संमतीने मास कम्युनिकेशन या पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकता. त्यानंतर चित्रपट, टीव्ही चॅनेल्स, मनोरंजन, जाहिरात या साऱ्या क्षेत्रात तुमचा शिरकाव शक्य आहे.

मी बीए करत आहे. मला पुढील शिक्षण मला परदेशात शिकायचे आहे. पण माझी आर्थिक परिस्थिती नाही. मला कशाप्रकारे ते शिक्षण घेता येईल

विशाल के

बीएसाठी उत्कृष्ट गुण व त्यानंतर तसेच मार्क मिळवून मास्टर्स म्हणजेच एमए पूर्ण करून मगच हा रस्ता सुरू होतो. उत्कृष्ट शब्द आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अत्यंत गरजेचा आहे. अत्यंत मोजक्या हुषार विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य घेऊन परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. अन्यथा याचा विचार दूर ठेवावा.

मी केमिकल इंजिनीअर आहे. मला अमेरिकेत फुड टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स करण्याची इच्छा आहे. जीआरई व टोफेलचे डिसेंट स्कोअर्स आले आहेत. (GRE 300, TOEFL 85) प्रथम त्या क्षेत्रात काम करून मग जावे का लगेच प्रवेश घ्यावा?  

अनिकेत देशमुख

आपण दिलेले जीआरई स्कोअरचे आकडे आपल्याला सामान्य दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून देऊ शकतील. त्याचा नीट विचार करावा. आपण केमिकल इंजिनीअर आहात. फुड रिलेटेड कंपनीत दोन वर्षांचा अनुभव मिळाला तर याच स्कोअरवर चांगले विद्यापीठ आपण मिळवू शकता. नंतर नोकरीची शक्यता निर्माण होते. तशा नोकरीचा शोध घ्यावात किंवा जास्त अभ्यास करून जीआरईचा स्कोअर ३२० ते ३२५ पर्यंत वाढवावा. सब्जेटवर स्पेशल जीआरईचाही विचार करू शकता.

आपले प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com या पत्यावर पाठवा