मी समाजशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. मला कायद्याचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागात नोकरी आहे. कोणत्या विद्यापीठात प्रवेश घेता येईल? शासनाच्या नोकरीत असल्याने कोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते? नोकरी असताना तो अभ्यासक्रम कसा पूर्ण करू?

रविर बनसोडे

तुम्हाला तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम सर्व लॉ कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. त्याचा विद्यापीठाशी संबंध नसतो. तुमच्या शहरातसुद्धा तो उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी यंदाची प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश मिळवावा लागेल. नोकरी करताना विभाग प्रमुखांना त्याची नोंदणी करण्यापूर्वी लेखी माहिती देणे अपेक्षित असते. मात्र नोकरी सांभाळून हा अभ्यासक्रम आपण कसा पूर्ण करणार याची प्रथम खात्री क रून घ्यावी. नोकरीच्या वेळा व कॉलेजच्या वेळा जमणे महत्त्वाचे आहे ना? याची खात्री करावी. तसेच आरोग्य विभागातील कामाशी तुमच्या या पदवीचा संबंध काय व कसा असू शकेल याची खातरजमा करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. अन्यथा तीन वर्षांचा कठीण अभ्यास करून फक्त स्वान्तसुखाय पदवी हाती लागेल. सरकारी नोकरीत आपण असल्याने याचा विचार महत्त्वाचा ठरावा.

मी इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला राज्यसेवा स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. कधीपासून व कशी तयारी सुरू करू?

आकाश दामोदर गुळगे

याच पानावर ‘लोकसत्ता’मध्ये त्याविषयी माहिती असते. ती वाचण्यासाठी तुला फार तर दहा मिनिटे द्यावी लागतील. इंजिनीअरिंगचा अभ्यास कठीण व महत्त्वाचा आहे. त्यात विषय राहून उपयोग नाही. त्यामुळे सध्या त्यावर लक्ष दे. जोडीला सामान्य ज्ञानावर आधारित माहिती गोळा करणे व त्याविषयी स्वत:च्या शब्दात दहा वाक्यांचे टिपण लिहिणे एवढे सुरू करावे. काय वाचावे याविषयी सांगण्याऐवजी पाचवी ते बारावीदरम्यानचे सर्व विषय आवश्यक असून, त्याला सध्याच्या सामान्य ज्ञानाची जोड द्यावी लागते, हेच महत्त्वाचे सांगेन.

माझे बी.ए. पूर्ण झाले आहे. मी सध्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत बिलिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे. परंतु मला ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचा कोर्स करायचा आहे. त्यासाठी काय करावे लागेल?  

तृप्ती उबाळे

बी.ए. असून बिलिंगमध्ये काम करत आहे, याचा अर्थ स्पष्ट होत नाही. तसेच बी.ए.चे विषय व गुण यांचाही उल्लेख नाही. तरीही तुमची इच्छा तीव्र असल्यास प्रथम तुम्ही काम करत असलेल्या कंपनीचे विविध विभाग कसे काम करतात याचे निरीक्षण सुरू करावे. जोडीला कामात दोन वर्षे पूर्ण केल्याच्या अनुभवाचे सर्टिफिकेट हाती आले तर या विषयातील लॉजिस्टिक्स/ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचे कोर्सेस पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटअंतर्गत अनेक संस्था चालवतात. मुक्त विद्यापीठांचेही हे कोर्सेस आहेत. मात्र अनुभव व निरीक्षण या दोन्हीशिवाय निव्वळ कोर्स पूर्ण करून काहीही फायदा होणार नाही, हे लक्षात घ्यावे. भारतातील ट्रान्सपोर्ट क्षेत्र हे पुरुषी प्राबल्याचे आहे, हेही एक वास्तव लक्षात घ्या. निरीक्षण सुरू केल्यास ऑफिस वर्क व ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट यातील फरक समजत जाईलच.

आपले प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com