डॉ. श्रीराम गीत

मी एम.ए. मराठीच्या चौथ्या सत्राला आहे. नेटची परीक्षा पास झालो आहे. या पदवीच्या आधारे एमपीएस्सीच्या कोणत्या परीक्षा देता येतील? त्याचा अभ्यासक्रम काय असेल? प्राध्यापकीव्यतिरिक्त कुठल्या क्षेत्रात जाता येईल

राहुल राऊत

तुझ्याकडे पदवी असल्याने स्पर्धा परीक्षांसंदर्भात सर्व प्रकारच्या परीक्षांना तुला बसणे शक्य आहे. या साऱ्याची विस्तृत माहिती ‘लोकसत्ता’मध्ये दररोज थोडी थोडी छापून येत असते. ती वाचायला सुरुवात तर कर!

त्या अभ्यासाचा आवाका कळेपर्यंत एम.ए. पूर्ण होईल. एम.ए. मराठी पदवीचा या अभ्यासाशी फार कमी संबंध आहे, मात्र भाषेचा नेमका वापर करायला उपयोग होणार आहे. मीडिया किंवा अनेक माध्यमे तुझ्यासाठी वाट पाहात आहेत. पत्रकारिता, मास कम्युनिकेशन, जाहिरात क्षेत्र. या क्षेत्रांची माहिती करून घे. त्यामध्ये काम करणाऱ्यांना समक्ष भेटून माहिती घेतलीस तर अतिउत्तम. केवळ कोणती परीक्षा देऊ, तयारी कशी करू, पदवी कोणती घेऊ, असे प्रश्न विचारण्याआधी या भेटी घेणाऱ्याला यशाची शक्यता किती तरी पटीने वाढते. तुझ्या निमित्ताने करिअर वृत्तान्त वाचणाऱ्या अनेकांसाठी हा उल्लेख मुद्दाम करत आहे.

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेट महामंडळ, नागपूर यांच्या नोकरीच्या जाहिरातीत सायन्समधील पदवी व बारावीला गणित असणे आवश्यक असा उल्लेख आहे. माझे फूड टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक पूर्ण झाले आहे. कोकण कृषी विद्यापीठाचीही पदवी आहे. मी अ‍ॅग्रीचा पदवीधर असून, ऑनलाइन अर्ज भरताना तुमची पदवी/ अभ्यासक्रम या पदासाठी अयोग्य अशी दरवेळी नोंद येते. काय करावे?

वीरेंद्र चव्हाण

आपली पदवी कोकण कृषी विद्यापीठाची आहे, हे बरोबर असले तरी फूड टेक्नॉलॉजी हा विषय फॉरेस्ट डेव्हलपमेंटमध्ये येत नाही, हे नक्की. तसेच सायन्समधील पदवी हा उल्लेख असला तरी तांत्रिकी वा व्यावसायिक पदव्या त्यांना चालतात वा नाही हा त्यांचा निवडीचा प्रश्न असू शकतो. त्याचे उत्तर फक्त संबंधित संस्थेचे पदाधिकारीच देऊ शकतील. अनेकदा नोकरीची जाहिरात वाचून अर्ज करावासा वाटतो, पण संबंधित संस्था काय कामे करते व त्यामध्ये आपला सहभाग कोणता याचा विचार नसेल तर वेळ व पैसा वाया जातोच, पण निराशासुद्धा पदरी येते. अक्षरश: लाखो पदवीधरांचा हा प्रश्न आहे म्हणून त्याला थोडासा स्पर्श करून थांबतो.

बारावी सायन्स केल्यानंतर ऑटोमोबाईल डिप्लोमाची तिसऱ्या वर्षांतील एक विषय वगळता अन्य विषयांची परीक्षा मी यशस्वीपणे पार पाडली आहे. सध्या या दरम्यान होंडाच्या सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये सव्‍‌र्हिस अ‍ॅडव्हायझर म्हणून नोकरी चालू आहे. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी मला काय करावे लागेल?

रोहन पालकर

डिप्लोमाचा एक विषय राहिला तरीही तू नोकरी मिळवली आहेस, याबद्दल अभिनंदन. परीक्षा पास होणे हा तुझ्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. त्यादरम्यान व नंतरसुद्धा नोकरी सोडण्याचा विचार नको. आता तुझ्या मॅन्युफॅक्चरिंगमधील नोकरीबद्दल बोलू. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सध्या अत्यंत प्रगत पद्धतीत होत असते. त्यामध्ये तुझा शिरकाव झाला तर कामगार म्हणून फार तर होऊ शकेल. ते तुला आवडणे शक्य नाही व अपेक्षितही नसावे. नेमकेपणाने सांगायचे तर पाच वर्षांचा चांगला अनुभव किंवा अतिउत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमी यातून त्या कंपन्यांची निवड करण्याची पद्धत गेली २५ वर्षे रूढ आहे. म्हणून सध्याच्या नोकरीतून प्रगती करावीस, ते उपयुक्त राहील.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचा  ई-मेल आयडी आता बदललेला आहे. यापुढे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी. त्यामुळे  उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.