मी यंदा बीकॉमची परीक्षा देईन. अकाउंट्स हा माझा पक्का विषय आहे. मला शेअर मार्केटिंगमध्ये करिअर करता येईल काय? त्यामध्ये किती वाव आहे? शिक्षण काय लागते? ते योग्य राहील काय?

श्रिया पंतपराडकर

अकाऊंट्स व शेअर मार्केट या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. शेअर मार्केटबद्दल शिकवणारे सात दिवस ते वर्षभराचे विविध कोर्सेस प्रत्येक गावात आहेत. स्वत:ची कुवत हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एखादी याच क्षेत्रातील नोकरी मिळवणे व त्या दरम्यान निदान वर्षभर शेअर्स नावाची भानगड समजून घेणे हा पहिला टप्पा राहील. त्या दरम्यान वडिलांकडून किंवा स्वत:च्या पगारातून शेअर्समध्ये घातलेले फक्त दहा हजार रुपये वर्षभराने कशात रूपांतरित करता येतात हा दुसरा टप्पा राहील. दहा हजाराचे आठ झाले तर हा रस्ता तुमच्यासाठी नाही. दहाचे दहा राहिले तर शिकायला खूप काळ लागेल. कोर्स करून उपयोग नाही. दहाचे बारा हजार जर आपण करू शकलात तर हेच क्षेत्र आपल्याला खुणावत आहे, त्यात शिरायला हरकत नाही. हा झाला एक सामान्य ठोकताळा. सध्या सुरुवात म्हणून स्वत:चे डीमॅट अकाउंट उघडा. त्यासाठीची पूर्तता करताना लागणारी कागदपत्रे, काळजी काय घ्यावी लागते अशा प्राथमिक गोष्टी सुरू करा. तसेच घरातील टीव्हीवर बिझनेस चॅनेलवर काय चर्चा चालतात त्या ऐकायला सुरुवात करावी. विविध शेअर्सचे भाव बदलण्याची कारणे, बोनस शेअरच्या बातम्या, दिला जाणारा डिव्हिडंड व त्याचे आकडे अशा साध्या साध्या गोष्टींची माहिती करून घ्यायला सुरुवात करावी. शेअर मार्केटमध्ये जाण्याची इच्छा असणे आणि त्यात नेमके काय चालते याची प्राथमिक माहिती घेतल्यावरही ती इच्छा टिकणे, यात मोठे अंतर असते. एखादा कोर्स करून ते कधीच पार करता येत नाही. म्हणून श्रियाच्या प्रश्नाच्या निमित्ताने अशा उत्सुक मंडळींसाठी हा रस्ता त्यांना दिशा दाखवू शकेल.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचा  ई-मेल आयडी आता बदललेला आहे. यापुढे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी.  त्यामुळे  उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.