मी वाणिज्य पदवीधर आहे. मला वन्यजीव छायाचित्रण या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी मला बारावीला बसावे लागेल का? किंवा दुसरा काही पर्याय आहे का?

राजीव हुईलगोल

तुझ्या प्रश्नात तू वाणिज्य पदवीधर आहेस, असे नमूद केले आहे. याचा अर्थ तुझी बारावी झालेली आहे. मग पुन्हा बारावी कशासाठी द्यायची? तुझ्या मनातला हा गोंधळ आधी काढून टाकणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यासाठी मनात गोंधळ असून चालणार नाही. वन्यजीवांचे छायाचित्रण करताना डोके शांत ठेवण्याची आवश्यकता आहे. जर मनात कोणताही गोंधळ, शंका असेल तर हाती घेतलेले काम साध्य होणारच नाही. वन्यजीव छायाचित्रणासाठी मुळात तुला छायाचित्रण ही कला शिकून घ्यायला हवी. ज्या गावात तू राहतोस, तेथील एखाद्या उत्तम छायाचित्रकाराला गाठ. त्याच्याकडून ही कला शिकून घे. त्याच्यासोबत प्रसंगी हरकाम्या बनूनही काम करावे लागेल. थोडी उमेदवारी करण्याची आवश्यकता आहे. तुझ्या गुरूने तुला छायाचित्रणातील बारकावे समजावून सांगण्याची गरज आहे. तू स्वत:ही बराच सराव कर. स्वत:चा चांगल्या दर्जाचा कॅमेरा विकत घे. त्यासाठी तुला बँकेकडून कर्ज मिळू शकते. इतर छायाचित्रणापेक्षा वन्यजीव छायाचित्रण हे वेगळे आणि संयमाची परीक्षा घेणारे असते. नेहमीच्या छायाचित्रणात तुम्ही समोरच्या व्यक्तीला सूचना देऊ शकता. पण वन्यजीव छायाचित्रण करण्यासाठी तू वनात गेल्यावर लगेच प्राणी समोर येऊन ‘माझा फोटो काढा’, असे म्हणतील, अशी शक्यता शून्य आहे. वन्यजीवांचे छायाचित्रण करताना तासन्तास शांतपणे बसून राहावे लागते. अनेक वेळ बसून, चिकाटीने काम केल्यानंतर कुठे चांगले छायाचित्र मिळण्याची शक्यता असते. छायाचित्रणाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून शक्य असल्यास प्रवेश घे.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी

रूम नंबर १, घामट टेरेस, दुसरा माळा, शगून हॉटेलच्या वर, दादर पश्चिम स्टेशनमधला पूल, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम , मुंबई-४०००२८. दूरध्वनी- ०२२-२४३१५७३७,

संकेतस्थळ – www.focusnip.com

ई-मेल- – info@focusnip.com

सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी नॉलेज व्हिलेज, पोस्ट लव्हाळे, ता.-मुळशी, पुणे-४१२११५,  दूरध्वनी- ०२०-३९११६१२८, फॅक्स-३९११६१२६,  संकेतस्थळ – www.ssp.ac.in ई-मेल- enquiry@ssp.ac.in

स्कूल ऑफ फोटोग्राफी (भारती विद्यापीठ) –

पत्ता- भारती विद्यापीठ कॅम्पस, कात्रज डेअरीच्या विरुद्ध दिशेला, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे-४११०४६. दूरध्वनी-०२०-२४३६५१९१, फॅक्स-२४३२९६७५,

संकेतस्थळ- www.photography.bharatividyapeeth

ई-मेल-  photography@bharatividyapeeth.edu

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेत अप्रेंटिस कोर्स इन फोटोग्रॉफी हा अभ्यासक्रम करता येतो. कालावधी एक वर्ष (अंशकालीन). फाइन आर्ट्स या अभ्यासक्रमांतर्गत फोटोग्राफी या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. पत्ता-  द रजिस्ट्रार, सर जे.जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्ट्स, डॉ.डी.एन002Eरोड ,फोर्ट, मुंबई- ४००००१, दूरध्वनी-०२२-२२६२१२७६. संकेतस्थळ- www.jjiaa.org

पर्ल अ‍ॅकॅडेमी – येथे लाइफ फोटोग्रॉफी आणि डॉक्युमेंट्री फोटोग्राफर आदी करिअरच्या संधी मिळू शकतात.

अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा. – career.vruttant@expressindia.com