मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए पूर्ण केले आहे. मला पुढे ग्रंथालयामध्ये काम करण्याची इच्छा आहे. मला चांगली सरकारी नोकरी मिळेल यासाठी मी कोणता अभ्यासक्रम पूर्ण करायला हवा? कैलाश एच

ग्रंथालयातील चांगली नोकरी म्हणजे ग्रंथपाल वा ग्रंथालय साहाय्यकाची. यासाठी बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फर्मेशन सायन्स हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना संधी मिळू शकते. कोणत्याही पदवीधराला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. विविध ग्रंथालयांमधील जागा या मर्यादित स्वरूपाच्या असल्याने, अशा जागा रिक्त झाल्यावरच त्या भरल्या जातात. त्यामुळे हा अभ्यासक्रम केल्यावर लगेच नोकरी मिळणार नाही. सध्या अनेक मोठय़ा बुक स्टोअर्सना/बुक मॉल्सनासुद्धा ग्रंथालय शास्त्रातील पदवीधरांची आवश्यकता भासते. मात्र संबंधितांकडे प्रत्यक्ष जाऊनच तुला याचा शोध घ्यावा लागेल.

मी दहावी-बारावी केले नाही. थेट आठवीनंतर पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए केले आहे. आता मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यात यशस्वी झालो नाही तर दुसरा पर्याय म्हणून कमी कालावधीचा एखादा अभ्यासक्रम करता येईल का? मला तंत्रज्ञान, संगणक, संगीत, इलेक्ट्रॉनिक्स ही क्षेत्रे खूप आवडतात. मी पुढे कोणता अभ्यासक्रम करू?

शैलेश केंगार

सध्याच्या काळात कोणताही अभ्यासक्रम केल्याबरोबर लगेच नोकरी मिळेल असे काही संभवत नाही. त्यातही कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम करून त्यात तज्ज्ञता मिळवल्यासच रोजगाराच्या वा स्वयंरोजगाराच्या संधी मिळणे सुलभ जाऊ  शकते. सध्या चांगली व तत्पर सेवा देणारे इलेक्ट्रिशियन मिळत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रिशियनचा अभ्यासक्रम केल्यास चांगल्या संधी मिळू शकतील. संगीताच्या क्षेत्रात तुला आवड आहे असे तू नमूद केले आहेस. ही आवड गायनाची आहे की संगीत निर्मितीची आहे. हे आधी स्पष्ट व्हायला हवे. गायनाची आवड असल्यास तुला एखाद्या संगीत शाळेतून गायनाचे रीतसर प्रशिक्षण घ्यावे लागेल. तसेच भरपूर सराव करावा लागेल. या क्षेत्रात संधी खूप असल्या तरी स्पर्धासुद्धा तगडी आहे. त्यामुळे तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी विशेष गुणवत्ता असेल तरच स्पर्धेत टिकता येऊ  शकते. शिवाय संधी लगेच मिळेल असेही नाही. त्यामुळे संयमाची गरज भासते.

संगीत निर्मितीच्या क्षेत्रात जायचे असल्यास तुला म्युझिक फाऊंडेशन (लेव्हल वन) हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. अल्प मुदतीचा हा अभ्यासक्रम व्हिसलिंग वूड इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फिल्म कम्युनिकेशन अँड क्रिएटिव्ह आर्ट्स या संस्थेने सुरू केला आहे.

संपर्क – /www.whistlingwoods.net/short-course-unit/ याच संस्थेने सर्टिफिकेट इन म्युझिक कंपोझिंग हा ३ महिने कालावधीचा अभ्यासक्रमसुद्धा सुरू केला आहे.

संपर्क – http://www.whistlingwoods.net/tiss-sve-3-months-programme.

संगणकाचे विविध अल्प मुदतीचे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू असतात. त्यामध्ये डेस्क टॉप पब्लिशिंग, वेब डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग अशासारख्या विषयांचा समावेश आहे. आता एकाच वेळी तुला हे अभ्यासक्रम करणे शक्य होईल का, याचा विचार करायला हवा. ज्या विषयामध्ये तुला सर्वाधिक गती व आवड आहे, त्या विषयातच तू पुढील अभ्यासक्रम करावास असे वाटते. दरम्यान तू स्पर्धा परीक्षेच्या तयारीवरच अधिक लक्ष केंद्रित करावे.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)