माझे एम.कॉम.चे शिक्षण ई-कॉमर्स या विषयात झाले आहे. मला मँडेरिन भाषेचे बेसिक ज्ञान आहे. माझे वय बावीस आहे. येत्या तीन वर्षांत करिअर प्रगतीसाठी आपण कोणता मार्ग सुचवाल?

अमृता बडकी

प्रथम एखाद्या नोकरीच्या संदर्भात आपण प्रयत्न करून ती पटकवावी. ती मिळाल्यास मूलभूत ज्ञानात प्रगती करत, नोकरीत स्थिर स्थावर होणे महत्त्वाचे आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातच नोकरीसाठी प्रयत्न केलेत व यश मिळाले तर येत्या तीन वर्षांत मँडेरिनचे ज्ञान वाढवून लॉजिस्टिक्समध्ये काम करणाऱ्या, चिनी व्यापाराशी संबंधित कंपनीत शिरकाव करून घेणे शक्य होईल. परदेशी भाषेचे मूलभूत ज्ञान म्हणजे किमान तिसऱ्या पातळीची परीक्षा रीतसर पास होणे असा इंडस्ट्रीत अर्थ लावला जातो. ती पातळी आपण गाठणे यासाठी गरजेचे राहील. मँडरिन संदर्भात ते बऱ्यापैकी कठीण आहे.

माझे इलेक्ट्रिकलमध्ये बी.ई. २०१६ मध्ये झाले आहे. मी सध्या खासगी कंपनीत नोकरी करत आहे. एम.बी.ए. करायचे झाले तर उत्तम संस्था कोणती? त्याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे? दूरस्थ पदवी घेणे शक्य आहे? विषयाची निवड कशी करावी? सैन्यदलात कोणत्या संधी मिळतील?

प्रतीक कुराळे

बी.ई. झाल्यावर तुझ्या नोकरीला यंदा दोन वर्षे पूर्ण होतील. नोकरी चालू ठेवून कोणत्याही विद्यापीठाद्वारे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम चालवले जातात, त्याला प्रवेश घेऊन हेतू साध्य होतो. मात्र त्याचा उपयोग मुख्यत: बढतीसाठी होऊ शकेल.

पूर्ण वेळ एम.बी.ए. करण्यासाठी केंद्रीय व राज्य स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. तिला नीट तयारी करून बसल्यास राज्यातील चांगली संस्था मिळू शकेल. अन्यथा आतापासून कॅट, एनमॅट, झ्ॉट अशा तीव्र स्पर्धात्मक  परीक्षांची तयारी करायला लाग. नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९दरम्यान होणाऱ्या या परीक्षांतून भारतातील सर्वोत्तम अशा पहिल्या पन्नास संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. विषयाची निवड पहिले वर्ष झाल्यावर संस्थेतील प्राध्यापकांच्या मदतीने केली जाते. सैन्य दलातील संधींसाठी बहुधा तू वयाची मर्यादा ओलांडली असावीस, म्हणून तो विचार नको.

माझे वय ४७ आहे. मी बी.कॉम. आहे. सध्या बँकेत नोकरी चालू आहे. मला मानसोपचार शिकायचे आहेत. यासाठी मला परत बी.ए. करावे लागेल का? किंवा दुसरा कुठला कोर्स सुचवाल?

सायली चव्हाण

मानसोपचार शिकणे म्हणजे आपणास कोण बनायचे आहे? का नोकरीमध्ये बदल करावयाचा आहे? त्यासाठी मानसशास्त्रातील बहि:स्थ पदवी किंवा मुक्त विद्यापीठाची पदवी प्रथम घेणे महत्त्वाची गरज आहे. हौशी स्वरूपाचे असे हे काम नक्कीच नाही.

मात्र बँकेतील नोकरी सोडून हे सर्व तेही या वयात करणे, फारसे व्यवहार्य नाही, हे लक्षात घ्यावे. फार फार तर मॅरेज काऊन्सेलिंगचा एखादा कोर्स आपण थेट करू शकता व कोणाच्या तरी मदतीने त्या कामाला सुरुवातही करू शकता. म. ए. सोसायटी, पुणेचा असा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.