मी बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला पुढे कोणत्या संधी आहेत?

प्रतीक महाजन

प्रतीक तुला अनेक संधी आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे. बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुढील संधी मिळू शकतात.

  • गणित आणि भौतिकशास्त्रात गती असेल तर तू अभियांत्रिकी शाखेची निवड करू शकतोस.
  • नॅशनल डिफेन्स अकॅडेमीची परीक्षा देऊ शकतोस. त्याद्वारे नौदल, भूदल किंवा वायुदलातील वरिष्ठ पदांसाठीच्या प्रशिक्षणासाठी निवड होऊ  शकते.
  • गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात ७० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास लष्कराच्या १०+२ डायरेक्ट एन्ट्री योजनेंतर्गत अभियांत्रिकी शाखेमध्ये थेट प्रवेश मिळू शकतो.
  • जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई- अ‍ॅडव्हान्स्ड)मध्ये उत्तम गुण मिळाल्यास थिरुवनंतपूरम येथील इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी प्रवेश मिळू शकतो.
  • नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचा बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम करता येईल.
  • वास्तुकला (आर्किटेक्चर), बीएस्सी अ‍ॅग्रिकल्चर हे पयार्यही उपलब्ध होतात.
  • बी.एस्सी. करून पुढे संशोधनाच्या क्षेत्रात जाता येते. बेंगळूरुस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे वा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास संशोधनाचे करिअर उत्तमरीत्या घडू शकते.
  • जर तुला जीवशास्त्रात गती असेल तर वैद्यकीय शाखा (अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, होमिओपथी, दंतवैद्यक, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी इत्यादी) या संधी आहेत.

अशा संधी असल्या तरी उत्तम प्रकारचे करिअर घडवण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जेईई मेन/ अ‍ॅडव्हान्स्ड, एमएच-सीईटी या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळे तू या सर्व संकल्पना समजून घे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर.

मी मेकॅनिकल इंजिनीअरिंग करत आहे. सध्या शेवटच्या वर्षांला आहे. मला यूपीएससी द्यायची आहे. परंतु मराठीतून तर मला मराठी माध्यमातील कोणती पुस्तके उपयुक्त ठरतील?

सिद्धेश्वर खडतरे

नागरी सेवा परीक्षा मराठी वा इतर कोणत्याही अधिकृत भाषेतून देता येत असली तरी या परीक्षेसाठी असलेल्या विषयांचे दर्जेदार अभ्यास साहित्य, संदर्भ साहित्य (मराठी वाङ्मय सोडून) इंग्रजीमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या साहित्याचा उपयोग करून त्याच्या नोट्स काढल्यास चांगलाच लाभ होऊ  शकतो. तसे करायचे नसल्यास महाराष्ट्रातील विद्यापीठांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी मराठीतून प्रकाशित केलेली जी पुस्तके सुचवलेली असतील त्यांचा उपयोगही करू शकतोस. अशा पुस्तकांमध्ये मराठीतून लिहिलेल्या संदर्भग्रंथाची सूची दिली असते. त्याचा अवश्य वापर करायला हवा. सामान्य अध्ययानाच्या अभ्यासाठी योजना (मराठी), लोकराज्य (मराठी ), भारत वार्षिकी (हिंदी), ‘लोकसत्ता’सारख्या दर्जेदार वृत्तपत्रांचे नियमित वाचन करायला हवे. राज्य शिक्षणमंडळाच्या बारावीपर्यंतच्या मराठीतून प्रकाशित झालेल्या सर्व विषयांचा अभ्यास करू शकतोस.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)