मी ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विषयामध्ये मास्टर्स पदवी घेतलेली आहे. शासकीय संस्थेत ग्रंथपाल म्हणून नोकरी करीत आहे. मला करिअर कौन्सेलर म्हणून काम करण्याची इच्छा आहे. या विषयासंबंधी कोणते प्रशिक्षण उपलब्ध आहे? कुठे मिळू शकेल?

प्रणित लांडगे

नोकरीतील एका गोष्टीचा तुम्हाला करिअर कौन्सेलर होण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो आणि तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ती म्हणजे तुमच्या हाताशी असलेली ग्रंथसंपदा व माहिती. करिअर कौन्सेलरचे काम करण्यासाठी ते काम कसे चालते याचे निरीक्षण करावे लागेल. जमल्यास प्रत्यक्षानुभव घेऊन यातून सुरुवात होऊ शकते. दुर्दैवाने आपल्याकडे कौन्सेलिंगचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे मात्र करिअर संदर्भात फारच गोंधळ आहे. सरकारी नोकरीतील शालेय शिक्षकांसाठी असलेला एक वर्षांचा एकमेव कोर्स उपलब्ध आहे. त्याचा तुम्हाला उपयोग नाही.  पुण्यातील श्यामची आई फाउंडेशन (रआ) तर्फे काही पदविका अभ्यासक्रम घेतले जातात. त्यांचेतर्फे महाराष्ट्र सरकारसाठी ‘अविरत’ हा सेल्फ लर्निग तीस तासांचा ऑनलाइन अभ्यासक्रम पण तयार आहे. तसेच mahacareermitra.com या संकेतस्थळावर सर्व अभ्यासक्रमांची एकत्रित जिल्हावार माहिती आहे. यातून व स्वअभ्यासातून मग विद्यार्थ्यांशी संवाद असा रस्ता जातो.

 मी बोरिवली येथे असून १९९५ मध्ये माझी बारावी कॉमर्सची परीक्षा झाली. लवकर लग्न झाले, शिक्षण अर्धवट राहिले त्यामुळे नोकरीमध्ये स्थैर्य येत नाही. आता माझे वय ४० असून मुले मोठी झाली आहेत. मला बीबीए किंवा बीएमएस करावे वाटते. मुंबई किंवा एसएनडीटी विद्यापीठातून प्रवेश घेण्यासाठी काय करावे? मी दूरध्वनीवरून चौकशी केल्यावर कोणीही नेमकी माहिती देत नाही. विविध गोष्टी सुचवत राहतात. कृपया मला योग्य मार्गदर्शन कराल का?

नेहा परेरा

आपल्या मनात असलेले दोन्ही अभ्यासक्रम कोणत्याही मोठय़ा संस्थेच्या कॉमर्स कॉलेजच्या अंतर्गत चालवले जातात. त्यांचा विद्यापीठाशी फक्त पदवी देण्यासाठी संबंध येतो. आपल्याजवळ अंधेरी ते विरार या दरम्यान अशी अनेक कॉलेज आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घ्यावा लागतो. तसेच पूर्ण वेळाचा अभ्यासक्रम आपल्या निम्म्या वयाच्या मुलामुलींबरोबर करणे हे कठीण राहणार आहे. म्हणून आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या याच पदवीचा विचार करावा. तसेच त्यासाठीची क्रमिक पुस्तके चाळून मगच निर्णय घ्यावा असेही मुद्दाम सुचवत आहे.

( विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नवीन वर्षांच्या खूप शुभेच्छा. यंदाही करिअरमंत्र हे सदर आपल्यासोबत असणार आहेच. पण  यापुढे करिअर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत हे आपल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. आपले प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com या पत्यावर पाठवा)