मला अ‍ॅनिमेशनमध्ये करिअर करायचे आहे. मी ते बी.कॉम किंवा बीएफए सोबत केले तर चालेल का? पुण्यात व मुंबईत कोणत्या चांगल्या व दर्जेदार अ‍ॅनिमेशन संस्था आहेत?

जान्हवी देसाई

अ‍ॅनिमेशन रीतसर शिकणे ही गोष्ट सहसा चित्रकला उत्तम येत असेल, आवड असेल व सर्जनशीलता असेल तरच उपयुक्त ठरते. आणि त्यात करिअर यशस्वी होते. याऊलट फक्त कोर्स केला आणि पुढे फारसे काही घडलेच नाही असे होण्याची शक्यता जास्त. कोणतीही बारावी झालेला विद्यार्थी पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाच्या बीएस्सी अ‍ॅनिमेशन कोर्सला प्रवेश घेऊ शकतो, त्यांची प्रवेश परीक्षा पास होणे गरजेचे आहे. रिलायन्स एज्यु. व अरेना या दोन संस्थांतर्फे सर्व मोठय़ा शहरात खासगी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डीएसके व सिंबायोसिस डिझाइन स्कूल्समध्ये स्पेशलायझेशन म्हणून हा विषय घेता येतो. या साऱ्यांचा खर्च चार ते चाळीस लाख आहे. यातील छोटा कोर्स निवडून त्यात स्वत:ला आवड व गती आहे याची खात्री झाल्यावरच पुढे जावे असे सुचवत आहे. अन्यथा पदवीकडे दुर्लक्ष होऊन त्याचा करिअरवर कायमचा परिणाम होऊ शकतो.

मला केंद्रीय राखीव पोलीस दलात सहाय्यक समादेशक होण्याची इच्छा आहे. या पदासाठी कुठले आयोग परीक्षा घेते, कधी घेते याविषयी माहिती द्याल का?

मयूर औतकर

यूपीएससीतर्फे  केंद्रीय राखीव पोलीस दलासाठीची परीक्षा घेतली जाते. सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सची सर्व माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर दरवर्षी प्रसिद्ध होते. वयाची वीस वर्षे पूर्ण केलेली आणि पदवीधर असलेली कोणतीही व्यक्ती ही परीक्षा देऊ शकते. त्यासाठी स्त्री किंवा पुरुष असे बंधन नाही. पंचवीस वर्षांपर्यंत ही परीक्षा देता येते. दरवर्षी सहसा दोनशे ते तीनशे एकूण पदे या परीक्षेद्वारे भरली जातात. मात्र नोकरीचे स्वरूप सहसा राज्याबाहेर कायमची नोकरी असे असते. फिजिकल फिटनेसची सतत गरज राहते. या दोन्ही घटकांचा नीट विचार करावास.

मी आता कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मी इव्हेन्ट मॅनेजमेंट करू का साऊंड इंजिनीअरिंग? माझा फार गोंधळ उडालेला आहे. मी डीजे म्हणूनही यापूर्वी काम केलेले आहे. पुढे वाव कशात राहील?

प्रथमेश काळे

डीजे म्हणून केलेले काम व साऊंड इंजिनीअर यामध्ये खूप फरक आहे. साऊंड इंजिनिअरिंगच्या रीतसर प्रशिक्षणासाठी फिजिक्स घेऊन बारावी सायन्स गरजेचे असते. तो रस्ता तुझ्यासाठी नाही. मात्र कॉमर्सची पदवी घेत असताना इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कोणत्याही छोटय़ा कंपनीत तुला उमेदवारी करणे सहज शक्य आहे. विविध प्रकारची कामे कष्टाने, चिकाटीने व कौशल्याने करता येणे ही इव्हेंट मॅनेजमेंटची मूळ गरज आहे. उमेदवारी करतानाच तुझी पदवी पूर्ण करावीस. त्या स्वरूपाची कामे आयुष्यभर करायला आवडेल असे तुला वाटले तर त्यात खूपच मोठा वाव निर्माण होत आहे. अन्यथा कॉमर्समध्ये करिअर करणे चालूच राहील ना? इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात अनुभवायला सर्वात जास्त महत्त्व आहे. केवळ एखादा कोर्स करून तो कधीही मिळत नाही.

( विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नवीन वर्षांच्या खूप शुभेच्छा. यंदाही करिअरमंत्र हे सदर आपल्यासोबत असणार आहेच. पण  यापुढे करिअर कौन्सेलर डॉ. श्रीराम गीत हे आपल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. आपले प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com या पत्यावर पाठवा)