सध्या आरोग्य, व्यायाम आणि आहार या त्रिसूत्रीला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. किंबहुना नवी बाजारपेठच मिळाली आहे, असं म्हणता येईल. व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणं ही एक हौस झाल्यामुळे या व्यवसायात खूप मोठया संख्येने प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. बहुतांश महाविद्यालयीन तरुणांना आपल्याकडे एखाद्या फिल्मी अभिनेत्यासारखी शरीरयष्टी असावी, असं मनोमन वाटतं. गृहिणी आणि नोकरदारवर्गही याबाबत जागरूक झाला आहे. पण दिवसभराच्या अतिव्यस्त वेळापत्रकामुळे सगळ्यांनाच व्यायामशाळेत जाणे शक्य होत नाही त्यामुळेच खासगी फिटनेस ट्रेनरची संकल्पना मोठय़ा शहरांमध्ये रूढ होत आहे. तरुणांसोबतच अनेक तरुणीही फिटनेस ट्रेनर म्हणून पुढे येत आहेत. बॉलीवूड, मोठमोठे उद्योगपती यांच्याकडून तर यांना जास्तच मागणी आहे.

फिटनेस ट्रेनर होण्याकरिता आवश्यक बाबी : संतुलित आहार आणि व्यायाम

प्रशिक्षण देणाऱ्या संस्था – ऑनलाइन पोर्टल : जेराई आणि ट्रायफोकस या कंपन्यांचा आरोग्य व फिटनेसचा ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी  घरबसल्या ऑनलाइन पोर्टलच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिटनेस अभ्यासक्रमाची दारे उघडली आहेत.  ‘जेराई फिटनेस’ या मुंबईतील कंपनीने नुकताच दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या ऑनलाइन हेल्थ आणि फिटनेस प्रशिक्षण देणाऱ्या ‘ट्रायफोकस फिटनेस’ या कंपनीशी करार केला आहे. दोन कंपन्या एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त आरोग्य व फिटनेसचे ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवणार आहेत. संकेतस्थळ : http://www.trifocusfitnessacademy.in  संकेतस्थळावरील हे फिटनेसचे अभ्यासक्रम बऱ्याचशा भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस ट्रेनिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम – व्यायाम कसा घेतला जावा, याचे शास्त्रशुद्ध धडे जिम ट्रेनरना मिळावेत, यासाठी मुंबई विद्यापीठाने एक नवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. मुंबई विद्यापीठाने ‘सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस ट्रेनिंग’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन या संस्थेमार्फत हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. व्यायामशाळेत फिटनेस ट्रेनर म्हणून संधी मिळण्यासाठी तो महत्त्वाचा ठरेल. व्यायाम कसा घेतला जावा, याचे शास्त्रशुद्ध धडे जिम ट्रेनरना मिळतील.

 

कालावधी

१ महिना पूर्ण वेळ (सोमवार ते शुक्रवार), (शनिवार आणि रविवार) ३ महिने अर्धवेळ आणि १ महिन्याची इंटर्नशिप.

शैक्षणिक अर्हता 

१० वी उत्तीर्ण

या अभ्यासक्रमात महिलांसाठी विशेष बॅच असणार आहे.

रोजगाराच्या संधी 

व्यायामशाळांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत

भविष्यात व्यायामशाळेत फिटनेस ट्रेनर म्हणून संधी.

खासगी फिटनेस ट्रेनर होता येते.

स्वत:ची व्यायामशाळा सुरू करता येते.