26 February 2021

News Flash

वेगळय़ा वाटा : खाद्यचित्रांची रंगत

ज्या व्यक्तीला या विषयात काम करायचे असेल त्याला टेबलटॉप छायाचित्रणाचे प्रशिक्षण आवश्यक आहे.

फूड फोटोग्राफी अर्थात खाद्यपदार्थाचे छायाचित्रण हा अतिशय वेगळा प्रकार आहे. छायाचित्रणामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला मार्ग आहे. ज्या व्यक्तीला या विषयात काम करायचे असेल त्याला टेबलटॉप छायाचित्रणाचे प्रशिक्षण आवश्यक आहे. कोणत्या खाद्यपदार्थासोबत कोणती काचेची भांडी, चमचे आदी शोभून दिसतील, याचे ज्ञान आवश्यक आहे. या प्रकारच्या छायाचित्रणामध्ये खाद्यपदार्थाचे स्टायलिंग करणे फार महत्त्वाचे आहे. ज्या पदार्थाचे फोटो काढले जाणार आहेत, तो आकर्षकरीत्या बनवून घेणे, त्याला सजवणे महत्त्वाचे. कोणताही पदार्थ दिसताक्षणी पसंत पडायला हवा अशा पद्धतीने सजवून नक्षीदार किंवा खास भांडय़ांमध्ये, वाटय़ांमध्ये ठेवण्याचे काम फूड स्टायलिस्टचे असते. कोणत्याही मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला तिथे पिझ्झा, बर्गर अशा तयार पदार्थाची पाकिटे देणारी पोस्टर्स दिसतात. या सगळ्यासाठी खाद्यपदार्थाचे छायाचित्रण गरजेचे असते. कधी कधी फूड स्टायलिस्टने बनवलेला पदार्थ खाण्याजोगा नसला तरी तो आकर्षक दिसावा म्हणून त्यात काही अतिरिक्त पदार्थाचा वापर केला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या पदार्थात खरे दूध घालण्यापेक्षा फूड स्टायलिस्ट आणि छायाचित्रकार फेविकॉल वापरतात. प्रकाशयोजना, मांडणी आणि लेन्स या तिन्ही गोष्टी खाद्यपदार्थाच्या छायाचित्रणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. कोणत्याही पदार्थाचे छायाचित्रण करताना त्यासाठी पाश्र्वभूमी कशी असावी, हे छायाचित्रकाराला समजावे लागते. त्याच्यामध्येही तेवढी क्षमता असणे आवश्यक आहे. तंदुरी आणि आईस्क्रीम या दोन गोष्टी एकाच पाश्र्वभूमीवर शूट केल्या जाऊ  शकत नाहीत. प्रत्येक खाद्यपदार्थासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे पडदे, रंगसंगती, पाश्र्वभूमी गरजेची असते.

एखाद्या बल्लवाचार्यासाठी खाद्यपदार्थाच्या पुस्तकाचे छायाचित्रण करणार असाल तर त्यात पदार्थासोबत त्या बल्लवाचार्याचे सोबतीही असतात. याशिवाय काही पंचतारांकित हॉटेलमध्ये पदार्थाच्या चित्रासोबतच त्या हॉटेलमधील वातावरण, रंगसंगती आणि मांडणी यावी, असा आग्रह असतो. परंतु हे तुलनेने सोपे असते. एखाद्या संकेतस्थळासाठी करण्यात येणारे हटके टेम्प्लेट किंवा खाद्यपदार्थाच्या वेष्टनासाठी केले जाणारे छायाचित्रण जास्त कठीण असते. कलादिग्दर्शक त्यांना कशा पद्धतीचे छायाचित्र हवे आहे ते सांगतो. एखाद्या खाद्यपदार्थाच्या वरती दोन इंचांची जागा हवी की नको यांसारख्या गोष्टी कलादिग्दर्शक सांगतो. दोन इंचांची जागा ही ब्रॅण्डचे नाव आणि डाव्या बाजूला वरच्या भागात थोडीशी जागा लोगोसाठी मोकळी सोडण्यात येते. तसेच वेब डिझायनरच्याही काही अपेक्षा असतात. ५५० पिक्सल १५०० पिक्सल एवढय़ा आकाराचेच छायाचित्र जर त्याला हवे असेल तर ते तेवढय़ाच आकाराचे द्यावे लागते. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवणे म्हणजे व्यावसायिक छायाचित्रकार बनणे. या सगळ्या गोष्टी जेवढय़ा अनुभवाने येतात तेवढीच त्याला शिक्षणाचीही योग्य साथ असणे गरजेचे आहे. नावाजलेल्या संस्थांमध्ये या सर्व गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात.

खाद्यचित्रणामध्ये अनेकदा रसायनांचाही वापर करावा लागतो. उदाहरण द्यायचे झाले तर एका पेल्यात सोडय़ाचा एखादा द्रवपदार्थ आहे, सुरुवातीला सोडय़ाचे जेवढे बुडबुडे त्या पेल्यात दिसतील तेवढे थोडय़ा वेळाने दिसत नाहीत. मग ते दिसण्यासाठी खास रसायन घालावे लागते. ज्यामुळे परत ते बुडबुडे येऊ  शकतील. हे रसायन कोणते, याचे ज्ञानही खाद्यचित्रणकाराला असणे आवश्यक आहे. कापलेले सफरचंद काळे न पडण्यासाठी त्यावर कोणती प्रक्रिया करावी, जेणेकरून छायाचित्रात ते ताजे दिसेल, या क्लृप्त्या छायाचित्रकाराला माहिती असणे गरजेचे असते.

संधी

’ मुक्त छायाचित्रण करण्याची संधी यामध्ये असते. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात, काही खास खाद्यपदार्थ, फळांची छायाचित्रे काढून ती देश-विदेशांतील खानपानाशी संबंधित कंपन्यांना विकू शकता.

’ एखाद्या हॉटेल किंवा बल्लवाचार्याच्या पुस्तकासाठी काम करू शकता.

शिक्षण देणाऱ्या संस्था-

शारी अ‍ॅकॅडमी (www.shariacademy.com )

फोकस एनआयपी (www.focusnip.com/focusnip)

सिम्बॉयसिस स्कूल  ऑफ फोटोग्राफी. www.ssp.ac.in/  )

उडान (www.udaan.org.in/)

dilipyande@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 5:05 am

Web Title: career in food photography
Next Stories
1 नोकरीची संधी
2 देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : सिंगापूरमध्ये एमबीएची संधी
3 वायफाय वापरताना..
Just Now!
X