प्रा. नितीन कुलकर्णी

हल्ली आपण अनेक जण नियमित मॉलमध्ये जातो. तिथे जाणे पूर्वीपेक्षा जास्त आवडू लागलेले आहे. तिथे नियमित खरेदी करतो, असे नाही. पण जाणे महत्त्वाचे आहे. मॉलमध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणकोणती प्रलोभने असतात? केवळ खरेदी हे एकमेव कारण असते, असे नाही. कधी कधी खरेदीशिवायच आपण बाहेर पडतो पण आपल्याला रुखरुख वाटत नाही, याचे कारण आपल्याला मॉलचा एकंदरीत अनुभव महत्त्वाचा असतो. मनोरंजनासोबत खानपान आणि खरेदी किंवा विण्डो शॉपिंग तेही एसीच्या थंडगार हवेत, हे आपल्याला हवेहवेसे वाटते. सरकत्या जिन्यांवरून जाताना कॉरिडॉरमधून फिरताना दुकानांचे दिसणारे दर्शनी भाग, त्यातील समोरच मांडलेल्या लोभस वस्तू कळत-नकळत आपल्याला खुणावत असतात. आपली नजर खिळते, पाऊल वळते आणि आपण दुकानात शिरलेलो असतो. नेमके हेच ब्रॅण्ड्सना हवे असते. त्यांचे अर्धे काम इथेच फत्ते झालेले असते. आपले हे मॉलमधले वागणे डिझाइन केलेले असते, जे शक्य होते, ‘व्हिज्युअल मर्चंडायझिंग’मुळे.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

नव्वदचे दशक संपताना जेव्हा मॉल्स आले तेव्हा आपण सर्वानीच नाकं मुरडली. आपले रोजचे दुकानदार कसे चांगले वागतात, मॉलमध्ये किती महागाई आहे, हे सांगून आपण तिथे जाण्याचे टाळले. यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी आपली ठरलेली दुकाने होती. दुकानदार आपल्याला वैयक्तिक ओळखत असे. कपडे शिंप्याकडे, किराणा वाण्याकडे.. पण हळूहळू काळ बदलला. रेडीमेडचा जमाना आला. सुपरमार्केट्स आली आणि भारतातील एकंदरीत विक्रीव्यवस्थाच बदलली. ग्राहकांकडे पूर्ण स्वातंत्र्य आले विक्रेत्याने वस्तू ग्राहकाच्या हातात देण्याऐवजी दुकानात मांडल्या जाऊ लागल्या. पूर्वी जे काम सेल्समन करत असे ते आता केवळ वस्तूंच्या मांडणीवर येऊन पडले. यावरून आपल्याला लक्षात येईल की केवळ दुकानाची रचना, त्यातील विक्रीयोग्य वस्तूंची रचना व त्या अनुषंगाने केलेली आर्टवर्क्स फोटोग्राफी या सगळ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. त्याचा एकत्रित परिणाम साधण्यासाठी communication design च्या शिक्षणाची गरज निर्माण झाली.

*   दृश्य माध्यमातून विक्री

दृश्यकलेच्या ‘उपयोजित कला’ विभागात जाहिरात कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले जाते. यात मुख्यत्वाने कल्पकतेच्या माध्यमातून एखाद्या वस्तूचे अथवा ब्रॅण्डचे महत्त्व ग्राहकांच्या मनावर ठसवणे याचा अंतर्भाव असतो. छापील अथवा दृक्श्राव्य माध्यमातून (आजकाल सोशल मीडियादेखील) आपल्या उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षून  घेण्यासाठी हा सगळा सायास असतो. परंतु बदलत्या परिस्थितीत अनेक ब्रॅण्ड्सच्या भाऊगर्दीत केवळ जाहिरात कामी येत नाही. जाहिरातीतून तोंडओळख झालेल्या ब्रॅण्ड इमेजचा विस्तार करण्याची गरज असते, इथेच मदतीला येते व्हिज्युअल मर्चंडायझिंग अर्थात व्ही.एम. कामास येते.

ग्राफिक डिझाइन, एक्झिबिशन डिझाइन, स्पेस डिझाइन, वेब डिझाइनबरोबरच व्ही.एम.चे शिक्षण देणारी एकमेव अग्रगण्य संस्था म्हणजे, नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. या संस्थेत फॅशन कम्युनिकेशन या नावाचा एक कोर्स आहे, या चार वर्षांच्या डिग्री कोर्समध्ये वर उल्लेखिलेल्या सर्व उपशाखांचे शिक्षण दिले जाते. दृश्य संवांदाची कला या शाखेंतर्गत दृश्य रचनेच्या परिणामकारकतेमधून संदेश पोहोचवणे, हे महत्त्वाचे असते. कलेची मूलतत्त्वे रेषा, आकार, पोत, रंग इत्यादींच्या साहाय्याने हे कसे साधायचे, याचे शिक्षण इथे दिले जाते. हे सर्व करत असताना एखाद्या समकालीन ट्रेंडचा आधार घेतला जातो. तसेच दृश्य कथाकथनाचाही आधार घेतला जातो. यातील सर्वात महत्त्वाचे काम असते ते, विण्डोचे. दुकानाच्या दर्शनी भागात नवीन कलेक्शनचे छोटेसे प्रदर्शन मांडलेले असते. यालाच विण्डो डिस्प्ले म्हटले जाते. त्यात प्रामुख्याने दुकानात उपलब्ध असलेल्या नव्या वस्तू, कपडे यांची रचना पुतळे किंवा इतर साधनसामग्रीच्या साहाय्याने केलेली असते. माणसाच्या शरीराप्रमाणेच या पुतळ्यांचाही आकार असतो. त्यात निरनिराळे रंगही असतात. या मांडणीमागे असते, व्हिज्युअल मर्चंडायझरने बनवलेली थीम. प्रत्येक ब्रॅण्डसाठी खास व्हिज्युअल मर्चंडायझर असतात. या व्यतिरिक्त काही त्रिमितीचे प्रॉप्सही असतात. हे डिझाइन करण्यात कल्पकतेइतकेच महत्त्वाचे असते कमीतकमी आर्थिक रक्कमेत हे गणित बसवणे. २-३ महिन्यांच्या कालावधीत ते विण्डो डिझाइन बनवले जाते.

ग्राहकांना आकर्षून घेणे इतकेच काही व्हिज्युअल मर्चंडायझरचे काम नसते. दुकानाच्या आतही निरनिराळ्या वस्तूंची आकर्षक रचना केलेली असते. त्याला म्हणतात, मर्चंडाईझ डिस्प्ले. याअंतर्गत डिस्प्लेचे निरनिराळे प्रकार येतात. क्लस्टर डिस्प्ले म्हणजे दुकानाच्या मधोमध उभे केलेले मनुष्याकृती पुतळे आणि प्रॉप्सची रचना. यात प्रामुख्याने दुकानाच्या या विभागातील प्रमुख डिझाइन रचलेले असते. बऱ्याचदा आपल्याला दाखवलेले कपडेच जास्त आवडतात. कारण आपण स्वत: तो ड्रेस घातला असल्याची कल्पना करू शकतो. या भागात कुठेही प्लेन बॅकग्राऊंड नसल्याने वस्तूंची त्रिमितीय रचना व त्यातील अवकाशाचा विचार महत्त्वाचा ठरतो. आणखी प्रकार म्हणजे गोंडोला डिस्प्ले. यात लांब कप्पे असलेला डिस्प्ले संच असतो. यात काही कपडे हँगरवर लावलेले असतात तर काही कप्प्यांमध्ये लावलेले असतात. कधी यावर केवळ मानव धडाच्या आकारातील किंवा पायाच्या आकारातील पुतळ्यांना कपडे घालून ठेवलेले असते. ते पाहून ते कपडे घालून पाहण्याची इच्छा आपल्यालाही होते. गंमत म्हणजे साधारणत: याच्या आजूबाजूलाच ट्रायल रुम असते. तर कलर ब्लॉकिंगमध्ये कपडय़ांची रचना रंगाबरहुकूम केली जाते. त्यामुळे ती मोहक ठरते. शिवाय योग्य रंगांची निवडही करणे शक्य होते.

व्हिज्युअल मर्चंडायझिंगचे शिक्षण देणारी एकच संस्था भारतात आहे. उद्योगान्मुख आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एक सहा महिन्यांचा कोर्सही आहे. त्यासाठी आठवडय़ातील दोन दिवस द्यावे लागतात. या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषयांचा अंतर्भाव केला जातो -एलिमेंट्स अ‍ॅण्ड प्रिन्सिपल्स ऑफ स्पेस डिझाइन, ब्रॅड मॅनेजमेंट, व्हिज्युअल र्मचडायझिंग, डिजिटल ग्राफिक्स, व्हिज्युअल कम्युनिकेशन अ‍ॅण्ड रिप्रेझेंटेशन, मटेरिअल एक्सप्लोरेशन, ड्रेपिंग अ‍ॅण्ड स्टायलिंग. अधिक माहिती  https://nift.ac.in/  या संकेतस्थळावर मिळेल.

व्हिज्युअल मर्चंडायझर, विण्डो स्टायलिस्ट स्टोअर मॅनेजर आणि हेड व्हिज्युअल मर्चंडायझर अशा पदांसाठी भारतातले मोठमोठे ब्रॅण्ड्स हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देतात.

लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी मुंबई या संस्थेत साहाय्यक प्राध्यापक आहेत तसेच मास्टर ऑफ डिझाइन, डिझाइन स्पेसचे प्रमुख आहेत.