मी मेकॅनिकल विषयात बीई केले आहे. परंतु मला पुढे गणितामध्ये संधी उपलब्ध आहेत का?

विजय जाधव

तुला नेमके काय करायचे आहे, हे तुझ्या प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. तुला गणितात पदवी शिक्षण घ्यायचे आहे की, गणितामध्ये संशोधन करायचे आहे? का तुला गणिताचे शिकवणीवर्ग घ्यायचे आहेत? हे स्पष्ट व्हायला हवे. तू अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असल्याने तुझे गणित चांगलेच असले पाहिजे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे गणित शिकवण्याचे तसेच बँकांसाठी आवश्यक असणारे गणित शिकवण्याचे वर्ग काढू शकतोस. सध्या चांगल्या गणितज्ज्ञांची वानवा आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यातच विकेट जाते. तेव्हा तू या क्षेत्रात उतरलास व तू उत्तमरीत्या मुलांचे समाधान करू शकलास तर गणिताचे अध्यापन तुझ्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

माझे बी.व्हॅकेशनल फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या विषयात झाले आहे. आता मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. माझ्या क्षेत्रात मला कुठे व कशा प्रकारची सरकारी नोकरी मिळेल?

कपिल सुतार

तू कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेस, ही बाब तुझ्या प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. तथापि तू राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झालास तर तुला केंद्र किंवा राज्य शासनातील वरिष्ठ शासकीय पदे मिळू शकतात. बँकेच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्या क्षेत्रातील वरिष्ठ पदे मिळतात. तुझे पदवीपर्यंतचे शिक्षण हे अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान या विषयात झाले असल्याने तुला खासगी क्षेत्रात ऑरगॅनिक केमिस्ट्स, बायोकेमिस्ट्स, अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्स, होम इकॉनॉमिस्ट्स, रिसर्च सायंटिस्ट्स, सीनिअर फूड टेक्नॉलॉजिस्ट अशासारख्या संधी मिळू शकतात. केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारित अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान उद्योग फार मोठय़ा प्रमाणावर नाहीत. काही संस्था कार्यरत आहेत. यामध्ये विविध पदांच्या उपलब्धतेनुसार या जागा भरल्या जातात. याविषयीची माहिती प्रसंगपरत्वे ‘लोकसत्ता करिअर वृत्तांत’ तसेच ‘रोजगार समाचार’ या साप्ताहिकात प्रकाशित केली जाते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.