प्रश्न- मी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय घेऊन बारावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवले आहेत. जेईई, सीईटी या परीक्षा दिलेल्या नाहीत. मला निसर्ग, शेतीशी संबंधित करिअर करायचे आहे. तेव्हा पदवीमध्ये माझ्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय कोणते आहेत? २०१६-१७ मध्ये कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील?
दिनेश काळे, ठाणे

उत्तर-
दिनेश तू बी.एएस्सी ऑनर्स इन बॉटनी हा विषय घेऊन वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक करू शकतो. बी.एस्सी इन फॉरेस्ट्री हा विषय घेऊन वानिकी विषयातील अभ्यासक्रम करू शकतोस. बी.एस्सी. अ‍ॅग्री हा विषय घेऊन तू शेतीविषयक अभ्यासक्रम करू शकतो. जेईई, सीईटी या परीक्षासुद्धा तुला देता येतील. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या सर्वश्रेष्ठ संस्थेतील बी.एस्सी इन बॉयलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन अर्थ अ‍ॅण्ड एनव्हॉर्यन्मेंट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईईचे गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे या वर्षीच्या ब्रेकमध्ये तू जेईईचा अभ्यास जोमाने करू शकतोस.

प्रश्न- मी बी.एस्सी कृषी केले आहे. तरी मला भविष्यात कृषी खात्यातील कोणत्या पदासाठी परीक्षा देता येऊ शकतात? पुढील शिक्षणाविषयी सल्ला द्या.
– स्वप्निल माळी, ठाणे</strong>

उत्तर-
स्वप्निल, तू कृषी अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन या पदांसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतो. तू वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदांसाठीच्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेणाऱ्या परीक्षेसाठी पात्र आहेस. शिवाय भारतीय वन सेवेची परीक्षाही तू देऊ शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कृषीविषयक क्षेत्र अधिकारी पदांसाठी होणाऱ्या परीक्षासुद्धा देऊ शकतोस. कृषी विषयातील तुझ्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करण्याची संधीसुद्धा आहे.

प्रश्न-
मी कॉम्प्युटर इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम केला आहे. यूपीएससी /एमपीएससीशिवाय मला शासनामध्ये कोणत्या संधी आहेत?
– महेश धडांबे

उत्तर– सध्या तरी कॉम्प्युटर इंजिनीअिरग अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना राज्य शासकीय नोकरी थेट उपलब्ध नाही. तथापी टाटा कन्सल्टन्सीसारख्या संस्था शासनाच्या विविध ई-गव्‍‌र्हनन्स वा डिजिटल उपक्रमांसाठी सेवा देतात. त्यात अनेक अभियंते काम करतात. अशा प्रकारे अप्रत्यक्षरीत्या शासनामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

प्रश्न- मी फॉरेस्ट्री विषयात बी.एस्सी केले आहे. मला उत्तम नोकरीच्या दृष्टीने कोणते पर्याय आहेत. माझी शाखा फॉरेस्ट्री असल्याने मला नोकरी मिळण्यामध्ये थोडी समस्या होत आहे. पर्याय सांगा.
– तन्वी भिंगार्डे

उत्तर
– तुला उत्तम संधी मिळवायची असल्यास महाराष्ट्र वनसेवा किंवा भारतीय वन सेवेची परीक्षा उत्तीर्ण व्हायला हवी. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊन महाराष्ट्र वनसेवेत अधिकारी होता येते. भारतीय वनसेवेद्वारे उच्च श्रेणीच्या अधिकारपदावर जाता येते. भारतीय वनसेवेसाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येते. प्राथमिक परीक्षा ही नागरी सेवा परीक्षांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेतच समाविष्ट करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा आणि मुलाखत मात्र वेगळी घेतली जाते.

प्रश्न- मला पुणे येथे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे डिप्लोमा इन अ‍ॅक्टिंग हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करावयाचा आहे. मला त्याबद्दल सखोल माहिती द्यावी.
-राज तोडकर

उत्तर-
पुणेस्थित फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅक्टिंग हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम कोणत्याही पदवीधरास करता येतो. या अभ्यासक्रमासाठी १० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर चाळणी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्र मुंबई आणि पुणे. संपर्क संकेतस्थळ- http://www.ftiindia.com/

प्रश्न- मी कंपनी सेक्रेटरीच्या अंतिम वर्षांला आहे. मी एलएलबीसुद्धा करत आहे. याशिवाय आणखी कोणती अतिरिक्त पदवी घ्यावी. कृपया मार्गदर्शन करावे.
-कल्पेश वीर

उत्तर- अतिरिक्त पदवी घेण्याऐवजी तू कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाच्या उर्वरित भागाचा आणि एलएलबीचा सखोल अभ्यास करावा असे वाटते. शिवाय संवाद कौशल्य आणि सादरीकरण कौशल्य यात प्रावीण्य मिळवावे. त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो.

प्रश्न – मी १२वीचे पेपर दिले आहेत. मला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.कॉमला प्रवेश घ्यायचा आहे. पण काही मुले म्हणतात की या मुक्त विद्यापीठाची पदवी ग्राह्य धरली जात नाही. तर मी याला प्रवेश घेऊ की नको?

सुभाष चौधरी

उत्तर- तुझ्या मित्रांनी तुला चुकीची माहिती दिली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम हे मान्यताप्राप्त आहेत. हे अभ्यासक्रम केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी अर्हता म्हणून ग्राह्य धरले जातात. या मुक्त विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे.

प्रश्न- मी यंदाच एमएसबीटीईचा मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये डिप्लोमा कोर्स केला आहे. माझा प्रश्न असा आहे की, कोणत्याही इंजिनीअिरग कॉलेजमध्ये प्रवेश न करता थेट मुंबई विश्वविद्यालयात अर्ज करून इंजिनीअिरग (बी.ई) करू शकतो का? आणि हे जर नियमात असेल तर त्याविषयीची प्रक्रिया कशी करावी.
– मानगिरीश शिनगबाल

उत्तर- अभियांत्रिकी डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला थेट प्रवेश मिळू शकतो. तू मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येसुद्धा थेट प्रवेशासाठी अर्ज करू शकतो. मात्र यासाठीसुद्धा काही कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. थेट प्रवेशाची जाहिरात तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे प्रकाशित केली जाते. यामध्ये ही कार्यपद्धती नमूद केली जाते. कृपया या जाहिरातीकडे लक्ष ठेवावे.