मातृभाषेसोबतच एखादी परकीय भाषा येणे हे खूप महत्त्वाचे असते. त्याचा तुमच्या बायोडेटावर खूप चांगला परिणाम होतो. जागतिकीकरण व अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मुंबईमध्ये असलेले अस्तित्व आणि भारत-जपान व्यापार संबंध यामुळे तरुणांमध्ये या भाषेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. पण केवळ हौस किंवा आवड म्हणून नव्हे, तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही या भाषेचा आपल्याला उत्तम प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो. कारण यात करिअरच्या चांगल्या संधी आहेत.

इतर भाषांच्या तुलनेत जपानी भाषा थोडी अवघड वाटली तरी सराव आणि नियमित अभ्यास याच्या जोरावर तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवू शकता. जपानी भाषेच्या एकूण पाच लेव्हल्स आहेत. एन-५ ते एन-१. यातील एन-५ ही प्राथमिक लेव्हल असून एन-१ ही अ‍ॅडव्हान्स लेव्हल आहे. जपानी भाषेमध्ये हिरागाना व काताकाना या दोन प्रमुख जॅपनीज लिपी आहेत तर कांजी ही चायनीज स्क्रीप्ट आहे. या दोन्ही लिपींचा वापर करून जपानी भाषा लिहिता येते. याचे एक विशिष्ट साहित्य संस्थेतर्फे पुरविले जाते. जसे की कांजी पुस्तक व मिनानो-निहोंगो हे संपूर्ण जपानी भाषेतील पुस्तक विद्यार्थ्यांना पुरविले जाते.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
loksatta analysis causes of rising inflation
विश्लेषण : महागाईविरोधी युद्धात ‘नव्या शत्रूं’चा समावेश?
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी जपानला जायचे आहे, त्यांच्याकरिताही इंडो जॅपनीज असोसिएशनमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम एकूण ५० तासांचा आहे. त्याच बरोबर १०० तासांचा ८ महिने कालावधीचा अभ्यासक्रमही आहे. यामध्ये व्याकरण, जपानी लिपी, भाषांतर या विषयांची तयारी करून घेतली जाते.

*  अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठ, कलिना परिसर येथे जपानी भाषेचे वर्ग घेतले जातात. या ठिकाणी जपानी भाषेतील पदव्युत्तर शिक्षणाची सोयही उपलब्ध आहे.त्याचप्रमाणे जपानी भाषेचे धडे इंडो जॅपनीज असोसिएशन येथे दिले जातात. भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक व आíथक संबंध दृढ करण्यासाठी, १९५४ साली इंडो-जॅपनीज असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या ठिकाणी जपानी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध कालावधीचे वर्ग भरवले जातात. जपानी सरकारतर्फे या भाषेतील अभ्यासासाठी शिष्यवृत्तीही देण्यात येते.

* इंडो जॅपनीज असोसिएशनमध्ये घेतले जाणारे अभ्यासक्रम

*  बेसिक १ (एन ५) – कालावधी –

८ महिने यामध्ये हिरागाना व काताकानाची ओळख करून दिली जाते व त्याचबरोबर १२०कांजी लिपी शिकविल्या जातात. तसेच रोजच्या व्यवहारात बोलले जाणारे शब्द, व्याकरण, वाक्यरचना, अनुवाद व निबंध हे शिकविले जाते. त्यानंतर इंडो-जॅपनीजतर्फे प्रमाणपत्र दिले जाते.

*  बेसिक २ (एन ४) – प्राथमिक टप्पा पार केल्यानंतर बेसिक २ हा कोर्स घेतला जातो. यामध्ये वाक्यरचना व ३६० कांजी लिपी शिकविल्या जातात. या कोर्सचा कालावधीदेखील ८ महिन्यांचा असतो.

*   इंटरमिडियेट १ (एन ३) – हा कोर्स करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यात ७५०कांजी घेतल्या जातात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी करता येते. याचा कालावधी ८ ते ९ महिन्यांचा आहे.

*   इंटरमिडियेट २ (एन २) – हा कोर्स साधारण ८ ते ९ महिन्यात पूर्ण होतो व त्याच्यामध्ये ११००पर्यंत कांजी लिपी घेतली जाते.

*   अ‍ॅडव्हान्सड जॅपनीज (एन १)- हा कोर्स पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवता येते.

(इतर संस्थांमधील अभ्यासक्रमही थोडय़ा अधिक प्रमाणात याच प्रकारे असतात. केवळ कालावधीमध्ये फरक होऊ शकतो.)

*    जपानी भाषेच्या ज्ञानाचे फायदे

भारत व जपान यांच्यामधील व्यापारी संबंधामुळे अस्खलित जपानी बोलता येणा-या तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारत व जपान यांमध्ये झालेल्या करारानंतर अनेक इंजिनीअिरग, फार्मा , बायोटेक्नालॉजी आदी क्षेत्रातील उद्योग भारतात आले आणि भविष्यातही येणार आहेत. त्यामध्ये जपानी भाषेचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना चांगला वाव असतो आणि असेल. जपान सरकार-जपान फाऊंडेशनतर्फे आयोजित केली जाणारी एलपीटी म्हणजे जॅपनीज लँग्वेज प्रोफिशिअंसी टेस्ट उत्तीर्ण केल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होतात.

याशिवाय या भाषेचे शिक्षक म्हणून, भाषांतरकार म्हणूनही संधी आहेत. तसेच दुभाषा म्हणूनही करिअरच्या उत्तम संधी आहेत. मुंबईतील जपानी दूतवास, विमानकंपन्या यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच जपानी टुरिस्ट गाइड म्हणूनही काम करता येऊ शकते. जपानी बँकांमध्येही चांगल्या नोकरीची संधी आहे.

प्रतीक जोशी