डॉक्टर होणे, हे अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यामुळे मेडिकलकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतोच.  ‘लोकसत्ता मार्ग यशाचाकार्यक्रमामध्ये या  मेडिकल विश्वातील करिअरसंधी, वाटचाल याविषयी विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी आले होते,सुप्रसिद्ध ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते.

डॉक्टर होणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण सगळ्यात आधी तुम्हाला डॉक्टर का आणि कशासाठी व्हायचे आहे? असा प्रश्न मनाला विचारा आणि त्याचे उत्तर शोधा. त्याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही. बरेचसे विद्यार्थी अकरावीची परीक्षा झाली की विद्यार्थी जागे होतात. खरे तर आपल्याला वैद्यकीय शाखेत जायचे असेल तर दहावीची परीक्षा संपली की या विषयाकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. बारावीनंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षेसाठी विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला जावा. पहिल्यांदा तुमच्या विषयांचे फक्त वाचन करा, त्यानंतर समजून घेऊन वाचा, त्या पुढच्या टप्प्यात पुस्तक बंद करून आधी जे वाचलेले आहे ते आठवून कागदावर लिहून काढा आणि शेवटच्या टप्प्यात त्याची उजळणी करा. ही उजळणी दररोज, आठवडा, महिना अशा प्रकारे केली जावी. ‘नीट’ किंवा अन्य संबंधित परीक्षांची विद्यार्थ्यांना खूप भीती वाटत असते. ही भीती घालविण्यासाठी एक साधा प्रयोग करून पाहा. परीक्षेत आपण किती प्रश्न सोडवायचे याची एक संख्या मनाशी ठरवा आणि दररोज ते प्रश्न सोडविण्याचा सराव, अभ्यास करा. या परीक्षेत वेळेचे गणित जमणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘एमबीबीएस’ झाल्यानंतर ‘एमडी’ केलेच पाहिजे का, असा प्रश्न काही विद्यार्थी विचारतात. तर हो, केलेच पाहिजे. केलेले केव्हाही चांगलेच आहे.

‘एमबीबीएस’साठी आपल्याला प्रवेश मिळावा, असे प्रत्येक विद्यार्थ्यांला वाटत असते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केलेले असतात. पण कधी काही कारणांमुळे ‘एमबीबीएस’साठी प्रवेश मिळू शकत नाही. तर अशा वेळी निराश होऊ नका. ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळाला नाही म्हणजे सर्व काही संपले, आता काय करायचे? असे अजिबात नाही. अन्य वैद्यकीय शाखांचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्या पर्यायांवरही गंभीरपणे विचार करायला हरकत नाही. ते निवडल्यानंतरही तुम्हाला त्यात शिक्षण घेऊन यातही चांगले करिअर करता येऊ शकते. आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी, नर्सिग, फिजिओ थेरपी, रेडिओलॉजी, जैव वैद्यकीय अभियांत्रिकी आणि अन्य पर्यायांकडे वळा. त्या क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत.

‘एमबीबीएस’ किंवा वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अन्य अभ्यासक्रम किंवा शाखांमध्येही रुग्ण हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो. डॉक्टर होऊनच रुग्णसेवा करता येते असे नाही. तसा गैरसमज मनात असेल तर तो आधी काढून टाका. संबंधित अन्य क्षेत्राची निवड केली तरीही रुग्णसेवा करता येते. ‘एमबीबीएस’ला ‘बीएएमएस’हा चांगला पर्याय असून त्यातही तुम्ही पुढे ‘एमडी’ करू शकता. होमिओपॅथी शाखा आणि त्यातील शिक्षण हाही एक पर्याय आहे. ‘नर्सिग’ हे खूप मोठे क्षेत्रही उपलब्ध आहे. हे क्षेत्र केवळ मुलींकरताच  आहे असे नाही. मुलेही या क्षेत्रात येऊ शकतात. मुळात या क्षेत्रात हे काम करणाऱ्यांचा तुटवडा आहे. मराठी मुली किंवा मुले तुलनेत कमी दिसून येतात. ‘नर्सिग’ क्षेत्रातही वेतन चांगले आहे. ‘एमएससी-नर्सिग’ असे शिक्षण तुम्हाला घेता येऊ शकते. त्याखेरीज ‘फिजिओथेरपिस्ट’ या क्षेत्राला सध्या खूप मागणी आहे. फिजिओथेरपिस्ट म्हणून तुम्ही नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. क्रीडा क्षेत्रात फिजिओथेरपीस्ट म्हणून करिअर करण्याची चांगली संधी आहे. क्रिकेट आणि अन्य क्रीडा प्रकारात खेळाडूंसाठी किंवा त्या खेळाच्या संघासाठी फिजिओथेरपिस्ट आज आवश्यक आणि गरजेचा असतो. जैव वैद्यकीय तंत्रज्ञान, जैव वैद्यकीय अभियांत्रिकी येथेही प्रवेश घेऊन तुम्हाला करिअर घडविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये या क्षेत्रासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. भविष्यकाळात या क्षेत्रालाही उत्तम भवितव्य आहे. रेडिओलॉजी, मेडिसीन या विषयातही तुम्ही विशेष अभ्यास (स्पेशलायझेशन) करू शकता.

शेवटी कोणतेही करिअर निवडताना आपल्या मनात डोकावून पाहा. आपली बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक क्षमता तपासून पाहा. जे झेपेल तेच करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमची पदवी तुम्हाला मोठे करत नसते तर तुमची ‘पॅशन’ महत्त्वाची आहे.

वैद्यकीय शिक्षण हे अगदी सोपे नाही. या क्षेत्रामध्ये जवळपास बारा र्वष म्हणजे एक तप अभ्यास करण्याची मानसिक तयारी असणे अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण जरी सोपे नसले तरी त्याबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही. दहावी-बारावीपेक्षा इथली गुणांची चाळणी वेगळी आहे. त्यामुळे ती लक्षात येईपर्यंत कमी गुण मिळाले तरी खचण्याचे कारण नाही. नीटची भीती बाळगू नये. कारण या परीक्षेसाठी अभ्यासक्रम पाठय़पुस्तकातीलच असतो. परंतु त्याची काठिण्य पातळी थोडी जास्त असते. वैद्यकीय शिक्षण घेताना प्राधान्याने सरकारी महाविद्यालयांची निवड करा. या महाविद्यालयांमध्ये अनुभवी शिक्षक तर असतातच, परंतु अनेक आजारांच्या रुग्णांवर अभ्यास करण्याची पुष्कळ संधी मिळते. मात्र गुण कमी पडल्याने सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला नाही तरी खासगी महाविद्यालयांचा पर्याय उपलब्ध आहे. खासगी महाविद्यालयांची निवड करताना मात्र अनुभवी शिक्षक वर्ग, शिक्षणाची पद्धती, सुविधा आणि शुल्क आदी बाबींची पडताळणी करा.

भारतातील सरकारी रुग्णालये आणि परदेशातील रुग्णालये यांमध्ये कमालीचा फरक आहे. परदेशामध्ये चार तासांच्या वर काम केले तर तिथल्या डॉक्टरांना कामाचा ताण येतो. परंतु भारतामध्ये मात्र डॉक्टर अगदी ३६ तास सलग काम करत असतात. त्यामुळे त्यांची अशी तयारी झालेली असते की ते जगाच्या पाठीवर कुठेही काम करू शकतात. त्यामुळे एमबीबीएस भारताबाहेर केले असले तरी पदव्युत्तर शिक्षण भारतातून घेणे फायदेशीर असेल. पुस्तकांशी मैत्री करा, सोशल मीडियापासून चार हात दूरच राहिलेलं बरं. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. पुस्तक वाचल्यानंतर त्याचे स्मरण करण्याची सवय लावा म्हणजे काय समजले ते लक्षात येईल.

नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळू शकला नाही, तरी दुसरे अनेक पयार्य निवडून तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता येते. जसे की एमएस्सी मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजी अशी पदव्युत्तर शाखांमधून उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत.  या क्षेत्रांमधून प्रत्यक्ष सर्जन किंवा शल्यचिकित्सक म्हणून शस्त्रक्रिया करता येणार नसली तरी वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अनेक अन्य शाखांमध्ये यश मिळवता येते. भूलतज्ज्ञ होणे, हेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तो नसेल तर शल्यचिकित्सक काहीच करू शकत नाही. त्याचसोबत डायटीशीयन अर्थात आहारतज्ज्ञ होण्यासाठीही संधी आहेत. यासाठी बारावीनंतर एक कोर्स आहेत, बीएस्सीनंतर किंवा परदेशातील विद्यापीठांमधूनही या क्षेत्रात शिक्षण घेता येईल. आहारतज्ज्ञांची गरज मनोरंजन व्यवसायातील व्यक्तींसाठी जास्त असते. त्यामुळे तुम्ही अभ्यासपूर्ण काम करत यात चांगला जम बसवला तर उत्तम आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. फिजिओथेरपीला देशापेक्षा परदेशात भरपूर मागणी आहे.

सगळ्यात शेवटी एकच, शिक्षण कुठेही घ्या, देशात किंवा परदेशात. पण सेवा मात्र भारतातच द्या! पदवी नाही तर पॅशन महत्त्वाची!

‘ ‘एखाद्या क्षेत्रात उत्तम करिअर करायचे तर त्यातली पदवी महत्त्वाची आहेच. पण त्याचसोबत त्या क्षेत्रासाठी आपली पॅशनही तितकीच महत्त्वाची आहे.’

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

अभ्यासाला पर्याय नाही!

डॉक्टरी पेशाला समाजामध्ये आपसूकच सन्मान, आदर आहे. तो टिकवण्यासाठी उत्तम रुग्णसेवा हाच एकमेव मार्ग आहे. त्यासाठी अभ्यासपूर्ण वाचन-मनन-चिंतन हवे. या क्षेत्रात येण्यासाठीही अभ्यास करावा लागतो आणि टिकून राहण्यासाठीही सतत शिकण्याची वृत्ती ठेवून अद्ययावत ज्ञान मिळवावे लागते.

डॉ. विजय सुरासे, हृदयरोगतज्ज्ञ