सचिन त्याच्या घरात वाढला तोच डेरिंगबाज म्हणून. अंगात जबरदस्त रग आणि कशाचीच भीती नसलेला. कुठेही मारामारी झाली आणि सचिन त्यात नाही असं क्वचित होई. मारामारी कशासाठी? हक्कासाठी, मदतीसाठी, आपल्या लोकांसाठी. मित्रांमध्येही सचिनची डेिरगबाज म्हणून ख्याती होती. कुणाही मित्राला कुठल्याही प्रकारची मदत कुठल्याही प्रहरी लागली की सर्वाना सचिनची आठवण होई. लागेल ती कसरत करून कुठेही घुसून कुणाचीही ओळख काढून, वाटल्यास मारामारी करून आपलं काम करवून घेण्याची जिगर त्याच्यात होती. नंतर नंतर मग कुठलं जोखमीचं काम आलं की ‘सचिनला सांग, तो कुणाला घाबरत नाही’ असं अनेक जण म्हणू लागले.
सचिन अ‍ॅडमिनमध्ये अगदी नवा नवा लागला. कंपनीही तशी छोटीच होती. ही त्याची पहिलीच नोकरी. इनमिन तीन जणांची टीम. तो आणि त्याच्याबरोबरचे दोघं, तिघं मिळून पेरीला रिपोर्ट करीत. नवा नवा असताना त्याच्या एक वर्ष जुन्या सहकारी विनोदनं त्याला सांगितलं बॉस पेरी टेरर आहे. सचिन त्यावर उत्तरला, आपण कुणाला घाबरत नाही.
नव्या नोकरीवर पण सचिनला आपला जम बसवायला वेळ नाही लागला. सगळ्यांची कामं करायची, कुणाला नाही म्हणायचं नाही. सुरुवातीला सगळ्यात ज्युनियर म्हणून अनेक छोटी मोठी कामं त्याच्या गळ्यात पडायची. अंगचा मूळ शहाणपणा असल्याने त्यानंही तक्रार न करता पडेल ते काम केलं. कुणा व्हिझिटरला एअरपोर्टवरून पिक करा, त्याला हॉटेलमध्ये ड्रॉप करा, त्याला ऑफिसमध्ये घेऊन या. मॅनेजर मंडळींना लंचला जायचं असलं की रेस्टॉरंटमध्ये टेबल रिझव्‍‌र्हेशन करणं, ऑफिसच्या गाडय़ा तनात करणं .. असं करत करत मग त्याच्यावर क्लिअिरग एजंटांकडून इंपोर्ट-एक्स्पोर्टची कामं करून घेणं, परदेशी कस्टमर्सची राहणं-प्रवासाची सोय पाहणं, हाऊस कीपिंग स्टाफचं सुपरव्हिजन अशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या. अ‍ॅडमिन म्हटलं की ऑफिशिअल आणि पर्सनल, सगळीच कामं करावी लागतात हे सचिननं लगेचच ताडलं होतं. पर्सनल कामं केली की लोकांना लवकर खिशात घालता येतं ही गोष्ट तर त्याच्या विशेष लक्षात आली होती.
सचिनची हुशारी पेरीच्या लक्षात आली होती. वेळोवेळी त्यानं सचिनची तारीफ केली, त्याला प्रोत्साहन दिलं. पेरीची टेरर बाजू सचिनच्या कधी फार वाटय़ाला आलीच नाही. याचं कारण सचिनची कर्तबगारी. अधूनमधून पेरी त्याला थोडं सांभाळून राहायलाही सांगायचा. दर वेळी पेरीनं असं म्हटलं की सचिन म्हणायचा, आपण कुणाला घाबरत नाही.
काही वर्षांतच सचिन कंपनीचा ‘गो टू मॅन’ झाला. वरिष्ठांची अनेक ऑफिशिअल आणि पर्सनल कामं करण्यात तो माहीर होता. प्रत्येक मोठय़ा मॅनेजरला त्याला आवडेल अशा पर्सनल टचनं काम करण्यात सचिन उस्ताद होता. ही कामं करताना त्याला मोठय़ा लोकांची अनेक लफडी कुलंगडींची माहिती होऊ लागली. जाईल तिथे दारू लागणारे कोण, पसे खाणारं कोण, अनेक मोठय़ा लोकांची डार्क बाजू मग सचिनला ठाऊक होऊ लागली. हळूहळू अनेक मॅनेजर मंडळींच्या पद गाजवणाऱ्या फोल डरकाळ्यांची त्याला मजा वाटू लागली. वरवरचं गुरगुरणं आणि ऑर्डर करणं आणि आत कुठेतरी सचिनला आपली ती बाजू माहिती आहे हे त्यांच्या देहबोलीत कळतंय, अशी विचित्र अवस्था त्यांची होत असे. सचिनला या सगळ्याची खूप
गंमत वाटे.
सचिनला आता कंपनीत आठ र्वष झाली होती. एव्हाना त्याला आपल्या निर्भीडपणाची चांगलीच किक लागली होती. अनेक सीनियर मंडळींबरोबरच्या व्यवहारात समोरच्याकडे हुद्दा आणि त्याबरोबर येणारी पॉवर असली तरी आपण त्याला घाबरत नाही, कारण आपलं काम चोख आणि समोरच्याची लफडी कुलंगडी आपल्याला सगळी माहीत. त्याच्या एकंदर कर्तबगारीमुळे त्याच्या इतर साथीदारांच्या तुलनेत त्याची प्रगती झटपट होत गेली. अनेकांबरोबरच्या अनेक व्यवहारांत जेव्हा कधी कुणी सचिनला ‘बाबा जरा जपून’ म्हटलं की सचिनचा ‘आपण कुणाला घाबरत नाही’ हा डायलॉग वरचेवर ऐकू येऊ लागला.
फेब्रुवारीत पेरीने एकदा सचिनला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं. दार लावून घ्यायला सांगितलं. ‘बस’ म्हणाला. सचिनला असा अनुभव याआधी कधी नव्हता आला. पेरीनं त्याला विचारलं, ‘यंदाच्या अप्रेझलला काय अपेक्षा आहे तुझी?’
सचिन म्हणाला ‘असं का विचारताय? माझ्या मते माझं काम तर चोख आहे, त्यामुळं अप्रेझल चांगलं व्हावं.’
*..आणि नाही चांगलं झालं अप्रेझल तर?’
*..असं का व्हावं?’ सचिननं विचारलं.
पेरी हलकं हसला. ‘तुला काय वाटतं, केवळ चोख काम केल्यानं अप्रेझल चांगलं होईल?’
*..नाहीतर कशानं?’ सचिनचा संभ्रम त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
*..समजा, लोकांना तू आवडत नसशील तर?’
*..सर, माझं काम चांगलं आहे, मी सगळी कामं नीट जबाबदारीनं पार पाडतो, मी कुणाचं काही वाकडं केलेलं नाही. लोकांना मी न आवडण्याचं कारणच काय?’
*..तू कुणाला घाबरत नाहीस ना!’ पेरीचा तिरकसपणा सचिनला कळलाच नाही.
सचिनसारखी अनेक कर्तबगार मुलं असतात. आपल्या कर्तबगारीच्या बळावर वर चढतात, त्याचा त्यांना प्रचंड अभिमान असणंही त्यामुळं स्वाभाविक असतं. हा अभिमान जोवर निव्वळ अभिमान असतो तोवर काहीच प्रश्न नसतो. पण त्या अभिमानाचा कैफ चढणं धोक्याचं असू शकतं. कसं ते पाहू या.
कुठल्याही कंपनीत सरळ सच्च्या, कर्तबगार आणि निर्भीड स्वभावाच्या माणसाचा स्वत:चा म्हणून वेगळा धाक असतो, वचक असतो. अशी माणसं सहसा कुठल्या गोटातली नसतात. सगळीकडे ते कडेकडेनेच असतात. मात्र त्यांची कामातली कर्तबगारी चोख असते. त्यामुळे खरोखरची निकड निर्माण होते तेव्हा कंपनीला अशा माणसांवाचून पर्यायही नसतो. त्यामुळे बऱ्याचदा योग्य वेळ येईपर्यंत त्यांना प्रमोशन्स वगरेसाठी थांबावंही लागू शकतं.
एखादा गट, कंपू करून राहणाऱ्या माणसांपकी बऱ्याच जणांना एकटय़ानं असुरक्षित वाटू शकतं. अनेकदा गटाची ओळख हीच त्यांची ओळख असते. अशा ‘गटांचे’ म्हणून काही संकेत असतात. एकमेकांच्या माहीत असणाऱ्या गोष्टींबद्दल मौन पाळणं, हा त्यातलाच एक. गटबाजीचा एक फायदा म्हणजे सुरुवातीची काही प्रमोशन्स भराभर होऊ शकतात. पण एका लेव्हलनंतर केवळ गटबाजी नाही कामाला येत.
सचिन या दोन्हीतला नाही. तो कर्तबगार आहे, निíभडही आहे. मात्र तो कोणत्याही गटातला नाही. त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे अनेकांच्या अनेक खासगी गोष्टी त्याला माहीत आहेत, ज्यामुळे इतरांना असुरक्षित वाटू शकतं. त्यात ‘आपण कुणाला घाबरत नाही’ हा त्याचा कैफ. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला इतरांना कम्फर्टेबल नाही वाटत. लोकांना सचिन आवडत नाही, हे पेरीपर्यंत जे आलं आहे, ते यातूनच. थोडक्यात सचिन लोकांना डोईजड होऊ लागला आहे.
सच्चं असावं, कर्तबगार असावं, निर्भीड असावं, पण त्याची उठता-बसता वाच्यता करायची काहीच आवश्यकता नाही. नाही तर त्याचे निष्कारण दुष्परिणामच जास्त होऊ शकतात.
मिलिंद पळसुले -palsule.milind@gmail.com