21 February 2019

News Flash

करिअर मंत्र

पहिली पदवी घेतल्यावर तिथेच किंवा इग्नूमध्ये पुढची पदवी घेणे शक्य आहे.

मी सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.ई.च्या दुसऱ्या वर्षांला शिकतो आहे. मला जे.एन.यू. इग्नू, पुणे विद्यापीठ अशा ठिकाणी पदवीनंतरचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल?

विठ्ठल चौधरी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे राज्याचे विद्यापीठ आहे, तर इग्नू म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही केंद्र सरकारने स्थापलेली आहे. पहिली पदवी घेतल्यावर तिथेच किंवा इग्नूमध्ये पुढची पदवी घेणे शक्य आहे. मात्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये तीव्र स्पर्धाही असते. त्यातून अव्वल बनत तुला प्रवेश मिळवावा लागेल.

मी पी.सी.एम. हे विषय घेऊन बी.एस्सी.मध्ये पदवी घेतली आहे. मी नोकरीकरिता काय करू शकते?

पुष्पा डोंगे

सायन्समधील पदवी घेऊन नोकरी कोणती मिळेल? असा तुझ्या प्रश्नाचा रोख असावा. याची दोन वेगवेगळी उत्तरे आहेत. सायन्स पदवीसंदर्भात बोलायचे तर नोकरी हवी असल्यास पदव्युत्तर पदवीची गरज पडेल. वाटल्यास बी.एड. पूर्ण करून शिक्षकी पेशा हाही रस्ता असू शकतो किंवा शालेय स्तरावरचे क्लासेसमध्ये शिकवायला सुरुवात असा थेटही असू शकतो.

दुसरा रस्ता म्हणजे इंग्रजीवर प्रभुत्व, कॉम्प्युटरची चांगली मैत्री व कोणतीही पदवी असे घटक हाती असणारा कोणताही पदवीधर आज अनेकांना हवा आहे. संवाद कौशल्याची जोड असल्यास फारच उत्तम. स्पर्धा परीक्षांद्वारे बँका, सरकारी आस्थापने, सुरक्षा दले याचाही विचार तुला करता येऊ शकतो. नाही तर सेवा क्षेत्रामध्ये म्हणजेच पर्यटन संस्था, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ केअर या क्षेत्रांत काम करायला उत्सुक आणि चुणचुणीत अशा सर्व पदवीधरांना संधी आहेत.

माझ्या भावाला दहावीत ९२ टक्के मिळाले होते. त्याने कला शाखेत प्रवेश घेतला आहे. तो गेली नऊ महिने उपजिल्हाधिकारी पदासाठी तयारी करत आहे. तो सध्या अकरावीत आहे. २०१८ राज्यसेवा परीक्षा तो देऊ शकतो का?

पूनम माळी

आपला भाऊ सध्या अकरावीत आहे. जोवर त्याच्या हाती पदवीचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोवर तो स्पर्धा परीक्षांच्या मुख्य परीक्षेला पात्र होत नाही. त्यामुळे त्याची तयारी चालू ठेवून २०२२ सालची परीक्षा देणे हे लक्ष्य ठेवावे. यासाठी ‘लोकसत्ता’च्या करिअर वृत्तांतमधील ‘एमपीएससी मंत्र’ हे सदर नियमित वाचत राहा. मुख्य म्हणजे परीक्षा आपला भाऊ देणार आहे, तेव्हा अशी किमान माहिती त्याची त्यालाच मिळवू द्यावी.

आपले प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com

First Published on February 10, 2018 12:36 am

Web Title: career tips