डॉ. श्रीराम गीत

’ सर मी सेकंड इयर बी.एस्सी.ला आहे. मला स्टॅटिस्टिक्समधील करिअर्सबद्दल माहिती द्यावी.

– संकेत कंदेकर

संख्याशास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी नेमली जाणारी व्यक्ती असे कामाचे सामान्य स्वरूप असते. अशा व्यक्ती सर्व क्षेत्रात गरजेच्या असतात, मात्र नोकऱ्यांची संख्या खूप कमी असते.

’ मी सातारा येथे दहावीत शिकत आहे. मला नगर रचनाकार (टाउन प्लॅनर) बनायचे आहे. पुढे काय करावे? मासिक वेतन कितपत मिळेल? नामवंत महाविद्यालय कोणते?

– विराज काळे

प्रथम गणित घेऊन बारावी पूर्ण कर. त्यानंतर नाटाची (National Aptitude Test in Architecture – NATA) परीक्षा देऊन आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी पास होणे गरजेचे आहे. त्यानंतर नगररचना विषयात मास्टर्ससाठीची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. यासाठी इयत्ता दहावीनंतर सात ते आठ वर्षे शिकणे गरजेचे राहील. त्या वेळचे नामवंत महाविद्यालय वा त्या वेळचे मासिक वेतन याचे उत्तर देणे अवघड आहे. कारण टाउन प्लॅनर सहसा सरकारी नोकरीत असतो. ती मिळणे वा न मिळणे हे सांगणे अशक्य. मात्र यंदा दहावीची परीक्षा झाल्यावर एक काम जरूर करावे. भारतातील, महाराष्ट्रातील कोणती शहरे टाउन प्लॅनरने आखणी केल्याप्रमाणे वसवली गेली आहेत, याची एक यादी तयार कर.

’ सर मी संगमनेर येथील खासगी संस्थेतून डीएमएलटी (Diploma in Medical Laboratory Technology) कोर्स करत आहे. त्यानंतर सरकारी नोकरीच्या परीक्षा देऊ शकतो काय? यानंतर करिअरच्या संधी कोणत्या? धन्यवाद.

– अनिकेत शेळके

सरकारी आरोग्य खात्यासाठी डीएमएलटीची भरती अधूनमधून होते. जाहिरात निघाली तर प्रयत्न जरूर करावा. मात्र खासगी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून उमेदवारीसाठी सुरुवात व नंतर त्यामध्ये नोकरी हा नेहमीचा रस्ता आहे.

’ मी अर्थशास्त्र घेऊन एमए करत आहे. सध्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला नेट किंवा सेट करायचे आहे. कोणती पुस्तके वापरू? तयारी कशी करू?

– तुकाराम कोकरे

पुस्तक वाचनातून नेट किंवा सेटचा अभ्यास फारच क्वचित होत असतो. सेटची परीक्षा पद्धतीसुद्धा अधूनमधून बदलत असते. पेपर्स हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात. सखोल वाचन, अवांतर अभ्यास, उपयोजित अर्थशास्त्रावर भर दिल्यास तयारीची सुरुवात होईल. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.