शिक्षणाचा पाया योग्य प्रकारे घालण्यासाठी पूर्व प्राथमिक वर्गात दाखल होणाऱ्या पाच वर्षांच्या आतील मुलांवर आर्थिक गुंतवणूक करणे अत्यावश्यक असल्याचे सर्वच प्रगत-अप्रगत राष्ट्रांना मान्य आहे.

तरीही लहान मुलांच्या कल्याणासाठी जागतिक पातळीवर काम करणाऱ्या ‘देअर वर्ल्ड’ या संस्थेच्या वतीने याच आठवडय़ात प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार समोर आलेली माहिती मात्र वेगळीच आहे. त्यानुसार जगभरात पाच वर्षांच्या आतील मुलांच्या शिक्षणावर केवळ एक टक्का रक्कम खर्च होत असून देशादेशांनुसार सहा वर्षांनंतर मुलांना प्राथमिक किंवा पूर्व प्राथमिक स्तरावर शिक्षण मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक विकासाचा पाया कमकुवत राहतो. जागतिक बँकेने २०१६ साली नमूद केल्यानुसार पाच वर्षे वयाच्या आतील मुलांना आरोग्य, पोषण आहार आणि मुलांच्या कलानुसार शिक्षण दिल्यास ती देशातील भावी पिढी घडविण्यासाठीची सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकते.

त्यानुसार गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जगभरामध्ये विविध उपक्रम आणि निधीसंकलनाद्वारे जगभरातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक मदत उभारली गेली. मात्र प्रत्येक देशातील पाच वर्षांखालील मुलांवर अपेक्षेपेक्षा केवळ एक टक्काच रक्कम खर्च होत असल्याचे देअर वर्ल्ड संस्थेने दाखवून दिले.

पाच वर्षांखालील मुलांचा मेंदू ९० टक्के विकसित असतो. त्यामुळे मेंदूच्या सुपीक अवस्थेत त्याला लागणाऱ्या मूलभूत गरजांसोबत शिक्षणाचा पाया भक्कम करण्याची संधी असते. देअर वर्ल्डच्या पाहणीत आफ्रिकेतील अप्रगत राष्ट्रांपासून ते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांपर्यंत सहा वर्षे वयानंतरच शैक्षणिक गुंतवणूक होत आहे. सध्या चीनपासून भारतापर्यंत विविध देशांमध्ये २०३० सालातील पिढीच्या अनुषंगाने शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे विविध कार्यक्रम आखले जात आहेत. भारतात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कार्यक्रम अडीच ते तीन वर्षांपासूनच्या मुलांसाठी गेले दीडेक दशक राबत आहे. तरीही भक्कम शैक्षणिक पाया अद्यापही उभा राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.