News Flash

संशोधन संस्थायण : खनिज आणि इंधनाचा खजिना

केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्था या संशोधन संस्थेची स्थापना अगदी अलीकडे २००७ साली झालेली आहे.

केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्था, धनबाद

केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्था, धनबाद

प्रथमेश आडविलकर

खाण उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेले व देशाची ‘कोल कॅपिटल’ म्हणजेच कोळशाची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजे झारखंड राज्यामधील धनबाद. देशाच्या पूर्वेकडील भागात असलेले दामोदर नदीचे खोरे हा कोळशाने समृद्ध असलेला प्रदेश आहे. म्हणूनच देशातील कोळशाच्या अनेक मोठय़ा खाणी उभारण्यात व खनिज आधारित उद्योगांचे मोठे जाळे विणण्यात धनबाद आघाडीवर आहे.

धनबादचा कोळशाच्या खाणी व उद्योगांशी असलेला हा जवळचा संबंध लक्षात घेऊनच या क्षेत्रातील संशोधन संस्थेची इथे निर्मिती करण्यात आली असावी. धनबाद येथे असलेली सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड फ्युएल रिसर्च म्हणजेच केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्था नेमकी हीच बाब अधोरेखित करते. खनिज व इंधन क्षेत्रामधील मुलभूत संशोधन करणारी ही देशातील सर्वात महत्त्वाची आणि एकमेव शासकीय संस्था आहे.

 संस्थेविषयी

केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्था या संशोधन संस्थेची स्थापना अगदी अलीकडे २००७ साली झालेली आहे. १९४६ साली सेन्ट्रल फ्युएल रिसर्च इन्स्टिटय़ूट या नावाने स्थापन झालेली संस्था तेव्हा फक्त इंधन संशोधनामध्येच कार्यरत होती. दहा वर्षांनंतर त्यावेळच्या गरजेनुसार १९५६ साली खाणीसंदर्भात संशोधन करणारी सेन्ट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट या नावाची एक संशोधन संस्था निर्माण करण्यात आली. कालांतराने २००७ साली या दोन्ही संस्थांना एकत्रित केले गेले व संस्थेचे नाव बदलून सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅण्ड फ्युएल रिसर्च असे करण्यात आले. संरक्षण, आर्थिक आणि पर्यावरणविषयक अतिशय उच्च दर्जाचे निकष ठेऊन त्या निकषांवर आधारित खनिज उद्योगांचा जलदगतीने विकास करणे,  या माध्यमातून देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनापर्यंत पोहोचणे, तसेच संपूर्ण कोळशाच्या वापरापासून ते ऊर्जानिर्मितीच्या श्रृंखलेपर्यंत समाविष्ट असलेल्या प्रत्येक प्रक्रियेमधील विविध टप्प्यांचे संशोधन करणे अशा अनेक उद्देश्यांनी या संशोधन संस्थेची स्थापना झाली. नवी दिल्ली येथील केंद्रीय विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न असलेली ही संस्था सीआयएमएफआर धनबाद या नावाने सर्वत्र परिचित आहे. भारत सरकारच्या नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय मोहिमेच्या दृष्टिकोनातून सीआयएमएफआरने आपली ध्येय व धोरणांची अल्प व दीर्घ अशा दोन्ही कालावधींसाठी पुनर्रचना केलेली आहे. संस्थेचा विश्वास आहे की, यामुळे देशाच्या तंत्रज्ञान व आर्थिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रगतीला चालना मिळेल.

* संशोधनातील योगदान

केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्थेमध्ये एकूण चार प्रमुख संशोधन विभाग आहेत. या चार विभागांना अनेक उपविभागांमध्ये विभागले गेले आहे. प्रमुख विभागांमध्ये कोळसा, कोळसा-खाण, इंधन, कोळसा व इंधन वापराच्या दृष्टिकोनातून पर्यावरण व्यवस्थापन आणि इंधनविषयक चाचणी आणि विश्लेषण सेवा या विषयांचा समावेश आहे. संस्थेचे या विषयांमधील संशोधनातील योगदान हे निश्चितच दखलपात्र आहे. सीआयएमएफआरच्या संशोधनामध्ये पर्यावरणाला अनुकूल असलेल्या खाणींची निर्मिती, खाण क्षेत्रासाठी जैवसंवर्धन आणि पर्यावरणपूरक रसायने तयार करणे, स्वच्छ कोळशाच्या उत्पादनाच्या तंत्रज्ञानाची निर्मिती, उत्पादकता आणि सुरक्षा वाढविण्यासाठी मूल्यप्रभावी खाण तंत्रज्ञान विकसित करणे, बोगदे, रेल्वे आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी सुरक्षित खोदकाम पद्धतीचे डिझाइन तयार करणे इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे.  संस्थेने कोळसा काबरेनेटीकरणाचे तंत्रज्ञान, कोळसा दहन तंत्रज्ञान, कोळसा द्रवीकरण तंत्रज्ञान, कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञान, कोळशापासून रसायनांचा विकास, खाणींसाठी वायरलेस माहिती आणि सुरक्षा व्यवस्था, कोळसा खाणींसाठी पर्यावरण निरीक्षण यंत्रणा, प्रभावी वापरासाठी कोळशाचे गुणवत्ता मूल्यमापन, खाणींमध्ये फ्लाय अ‍ॅशचा उपयोग, कोळशाची धूळ गोळा करणे आणि ब्रिकेटिंग सिस्टम, सेन्सर आधारित भूस्खलन निरीक्षण आणि ओळख प्रणाली, प्रदूषण नियंत्रण, खाण क्षेत्रातील कचरा व्यवस्थापन, ग्रामीण पाणलोट व्यवस्थापन, ऊर्जेचा योग्य वापर आणि विविध प्रकारचे जीवाश्म इंधन या गोष्टींसाठी ऊर्जा परीक्षण इत्यादी बाबींसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे.

* विद्यार्थ्यांसाठी संधी

सीआयएमएफआरमध्ये शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय एमटेक आणि पीएच.डी.चे संशोधन करणारेही अनेक संशोधक विद्यार्थी आहेत. या विषयाला सध्याच्या कालावधीमध्ये असलेली प्रचंड मागणी व तुलनेत उपलब्ध असलेले तुटपुंजे मनुष्यबळ तसेच संस्थेमध्ये उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींमुळे सीआयएमएफआर देश-विदेशातील अनेक सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना वैज्ञानिक व संशोधन सेवा पुरवते. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. त्यामुळेच संस्थेच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे येथे अभियांत्रिकीसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जिओसायन्सेस व गणित इ. विषयांमधील विद्यार्थीसुद्धा येथे पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ  शकतात. चांगल्या आणि दर्जेदार संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आणि जागतिक विद्यापीठांच्या तोडीचा अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग या बहुमोल गोष्टी संशोधक विद्यार्थ्यांना इथे मिळतात. संस्थेने आपल्या संशोधन विषयांतील अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सची सदस्यता घेतली आहे.

* संपर्क

केंद्रीय खनन आणि इंधन संशोधन संस्था (सीआयएमएफआर), बरवा मार्ग,

धनबाद, झारखंड – ८२६०१५.

दूरध्वनी – ९१-३२६-२२९६००४/५/६ .

ई-मेल –  director@ cimfr.nic.in,

संकेतस्थळ –  http://www.cimfr.nic.in

itsprathamesh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:45 am

Web Title: central institute of mining and fuel research in dhanbad
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : गट क सेवा पूर्वपरीक्षा प्रश्नांचे स्वरूप विश्लेषण
2 करिअर वार्ता : गोंड भाषेच्या जतनासाठी..
3 यूपीएससीची तयारी : सामाजिक व आर्थिक भूगोल
Just Now!
X