15 December 2017

News Flash

‘चाईल्ड लाईन’

‘चाईल्ड लाईन’ हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे.

लोकसत्ता टीम | Updated: August 10, 2017 1:30 AM

‘चाईल्ड लाईन’ हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते १९ वयोगटातील मुला-मुलींकरिता २४ तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बाल भिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये चाईल्ड लाईन शून्य ते १८ वर्षांखालील मुलामुलींच्या मदतीसाठी कार्य करते. यासाठी १०९८ हा क्रमांक डायल करावा.

व्यसनमुक्ती

घरात मोठी व्यक्ती व्यसनाधीन असेल तर मुले त्यांचे अनुकरण करतात. आपल्या वयापेक्षा मोठय़ा किंवा बरोबरीच्या व्यसनाधीन मुलांच्या संगतीनेही ती व्यसनाच्या नादी लागतात. यातील अनेक बालकांना पेट्रोलचा वास घेणे, दारू पिणे, गुटखा खाणे अशा सवयी असतात. त्याबाबत चाईल्ड लाईनकडे मदतीसाठी दूरध्वनी आले. अशा अनेक मुलांचे चाईल्ड लाईनने समुपदेशन व मानसोपचारतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाद्वारे मार्गदर्शन याद्वारे पुनर्वसन केले आहे.

बाल भिक्षेकरी

चाईल्ड लाईनने आजपर्यंत बऱ्याच बाल भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन केले आहे. कधी घरची परिस्थिती बिकट असल्याने आई-वडील मुलांना भीक मागायला पाठवितात. मुलांना पैशाचे आकर्षण असते म्हणून भीक मागितली जाते. अशा स्थितीत चाईल्ड लाईन प्रथम धाडी टाकते व यात सापडलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना समज दिली जाते.

बालविवाह

बालविवाहाच्या कारणांमध्ये घरची परिस्थिती गरीब असणे, प्रेम-प्रकरणांची कुणकुण लागल्यास कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार, कुटुंबात भावंडांची संख्या जास्त असल्यास जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी बालविवाह केले जातात. बालविवाहाचा मुलीवर मानसिक व शारीरिक विपरीत परिणाम होतो. आता कायद्याने ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून अधिकार दिले आहेत.

लैंगिक शोषण

अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये चाईल्ड लाईन शोषित मुलींना व त्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करते. पुन्हा नव्याने आयुष्यात पुढे जगण्यासाठी प्रोत्साहित करते. शोषितांच्या शारिरीक व मानसिक स्थितीचा विचार करून चाईल्ड लाईन पुनर्वसनाचे काम करते.

First Published on August 10, 2017 1:30 am

Web Title: child line ministry of women and child development