23 November 2017

News Flash

यूपीएससीची तयारी : जमातवादाचा मुद्दा

धार्मिक मूलतत्त्ववाद या अंगानेही जमातवादाचा अभ्यास केला जातो.

चंपत बोड्डेवार | Updated: September 14, 2017 2:34 AM

 

यूपीएससीच्या अभ्यासक्रमात सामाजिक मुद्दे अंतर्गत जमातवादहा उपघटक समाविष्ट आहे. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेत जमातवादाच्या समस्येला स्पर्शून जाणाऱ्या भारतातील बहुविधतेच्या सांस्कृतिक घटकांसंबंधी आणि राष्ट्रीय अस्मिता बांधणीसाठी बहुविधतेची प्रस्तुतता यावर प्रश्न विचारण्यात आला.

वसाहतिक काळापासून जमातवाद भारतातील एक प्रमुख सामाजिक समस्या बनून राहिलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही या समस्येने सांस्कृतिक विविधतेला विळखा घातलेला दिसून येतो. २०१५ मधील दादरी प्रकरणामुळे आणि त्यावरील प्रतिक्रियांमुळे जमातवादावरील चच्रेने पुन्हा एकदा जोर धरला. हे पाहता विद्यार्थ्यांनी प्रथमत: जमातवादाची मूळ संकल्पनात्मक धारणा समजून घ्यावी. त्यानंतर सामाजिक प्रक्रियेतील कोणत्या पोकळीतून जमातवादी जाणिवा निपजतात, तसेच बहुविध सांस्कृतिक, सामाजिक घटकांवर काय प्रकारचा प्रभाव टाकतात हे पाहावे. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून या मूलभूत समस्येवर विश्लेषणात्मक लेख प्रसिद्ध होतात. बिपनचंद्राच्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास’ या संदर्भपुस्तकातून जमातवादाच्या प्रक्रियेचे विश्लेषण मिळते. राम आहुजा यांच्या ‘Social Problems’ या पुस्तकामधून ही समस्या समजून घेता येईल.

मुख्य परीक्षेत या समस्येवर जमातवादाच्या स्वरूपासंबंधी थेट प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जमातवादाला स्पर्शून जाणाऱ्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. सामाजिक सद्भाव, सामाजिक ऐक्य, सामाजिक वीण, सामाजिक सहिष्णुता, सामाजिक ध्रुवीकरण इत्यादी. कारण हे सर्व मुद्दे वर्तमानातही उपस्थित आहेत. Communalism या संकल्पनेला मराठीत ‘जमातवाद’ अथवा ‘सांप्रदायिकता’ असेही शब्दप्रयोग वापरले जातात. धार्मिक मूलतत्त्ववाद या अंगानेही जमातवादाचा अभ्यास केला जातो. सर्वसामान्यांची रूढीप्रियता, धर्मभोळेपणा याचा वापर करून एखादा धार्मिक समुदाय दुसऱ्या धार्मिक समुदायाविरुद्ध धर्माच्या आधारावर संघर्ष करण्यास प्रवृत्त होतो

तेव्हा जमातवादाचा जन्म होतो. त्यातून धर्माचे राजकारण आकार घेते. थोडक्यात, जमातवाद म्हणजे दोन समुदायामध्ये धर्माच्या आधाराने संघर्ष निर्माण होणे.

जमातवाद समुदायाच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेवर भर देतो. प्रत्येक धार्मिक समुदायाचे हितसंबंध विभिन्न असतात किंबहुना परस्परविरोधी असतात. परिणामत: एका विशिष्ट धार्मिक समुदायाला आपल्या हितसंबंधाची जपणूक करायची म्हटले तर दुसऱ्या धार्मिक समुदायावर मात करण्याशिवाय पर्याय नसतो. ‘धर्म’ या घटिताच्या आधारे सामाजिक हितसंबंध जपता येतात असे सांगून त्यासाठी जमातवाद धर्माच्या आधारे संघटन करण्याचा प्रयत्न करतो. जमातवाद हा बहुविध संस्कृती झाकोळून टाकत असते. विशिष्ट सांस्कृतिक घटकांच्या हितसंबंधांचे राजकारण करून सांस्कृतिक बहुविधतेला प्रश्नचिन्ह म्हणून उभे करते.

राष्ट्रराज्य बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या भारतासमोरील मुख्य गतिरोधक आहे, वसाहतिक शासनाच्या कूटनीतीतून आणि त्यांच्या इतिहासलेखनातून जन्माला आलेली सांप्रदायिकतेची समस्या. स्वातंत्र्य चळवळीपासून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा मुद्दा वारंवार ऐरणीवर आलेला दिसतो. फाळणीच्या अनुभवानंतर नेहरूंनी जमातवादाला शह देण्यासाठी विविधतेतच भारताची संस्कृती लपलेली असून त्यातूनच एकता निर्माण करणे शक्य असल्याचे सांगितले. पुढील काळात जमातवाद आणि राजकारण याची सरमिसळ होऊ लागल्याने या समस्येचे निराकरण करणे शासनाच्या आवाक्याबाहेर गेले. जमातवाद ही समस्या सामाजिक न राहता ती राजकारणावर कुरघोडी करू लागली. त्यातून तिचे राजकीय समस्येत रूपांतर झाले. हे लक्षात घेता जमातवाद आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधांवर प्रश्न येऊ शकतात.

शासनसंस्थेद्वारा जमातवादी प्रक्रियेला गोंजारण्यातून जमातवादाची समस्या अधिकाधिक बळकट होत जाते. परिणामत: सामाजिक लोकशाही अडचणीत येते. सामाजिक मने दुभंगून समाजाची घडी विस्कटू लागते. जमातवादाच्या समस्येचे सामाजिक आणि राजकीय संदर्भ पाहता त्यातील गुंतागुंत समोर येते. विभिन्न समुदायांतर्गत लोकशाही जाणिवा रुजल्याशिवाय राष्ट्राची अखंडता अबाधित राहात नाही. त्यामुळेच जमातवादाचा मुद्दा आंतरिक सुरक्षेसमोर एक मोठे आव्हान उभे करतो. या संदर्भातही प्रश्न विचारला जाऊ शकतो.

जमातवादी प्रक्रियेने संविधानकृत नागरिकांना प्रदान केलेल्या ‘भारतीय’ या विवेकपूर्ण राष्ट्रीय अस्मितेसमोरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे दिसते. यातून समाजातील व्यक्तींना सांप्रदायिक ओळख प्रस्तुत करण्याचा प्रयत्न होतो. ‘आपण आणि ते’ अशी समाजाची वर्गवारी केली जाते. सामाजिक ताणाच्या निर्मितीतून संशयाची आणि शत्रुत्वाची भावना उपजते. एकमेकांकडे पाहण्याचे दृष्टिकोनही सांप्रदायिक बनू लागतात. इतिहास आणि सांस्कृतिक प्रतीकांचा आधार घेऊन, भावनिकतेला आवाहन करून लोकांना कृतीसज्ज केले जाते. त्यातून बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक अशा अस्मिता आणि संघर्ष जन्माला येतात.

खुल्या आíथक धोरण प्रक्रियेतील विसंगतीमुळे परिघावर फेकलेल्या समाजघटकांमध्ये ‘सापेक्षवंचिततेची जाणीव’ तयार होऊन सामाजिक तुटलेपण येऊ लागते. असे नाराज समाजघटक दोन्ही बाजूंनी जमातवादी प्रक्रियेत ओढले जातात किंवा त्या प्रक्रियेचे बळी ठरतात. वाढत्या बेरोजगारीमुळे संसाधनांची कमतरता आणि त्यातून इतरांची संसाधने बळकावण्याची प्रक्रिया जमातवादाच्या उदयाला कारणीभूत ठरते. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात दृक्श्राव्य माध्यमाच्या वापरातून आपल्या कृतिकार्यक्रमांना सहमती मिळवत जमातवाद आपले भरणपोषण करतो.

जमातवादामुळे सामाजिक सहिष्णुता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही घटनात्मक मूल्ये आक्रसली जातात. परस्परांच्या संस्कृतीविषयी आदर आणि आपली मते स्पष्ट मांडण्यास आडकाठी येते. सामाजिक सहिष्णुता वृद्धीसाठी अल्पसंख्याकांना विश्वासात घ्यावे लागते. राष्ट्रराज्याची अखंडतेसाठी सामाजिक लोकशाहीचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनसंस्था आणि नागरी समाज यांना घ्यावी लागते. याउलट विभिन्न समुदायांमध्ये परस्परांविषयी संशयी वातावरण तयार झाले असता सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया दूषित होऊन असहिष्णुता वाढीस लागते, त्यातून अभिव्यक्तीची गळचेपी होते. त्यामुळे भविष्यात मुख्य परीक्षेमध्ये यासंबंधी प्रश्न विचारला जाऊ शकतो.

First Published on September 14, 2017 2:34 am

Web Title: community dispute upsc exam