23 April 2019

News Flash

संशोधन संस्थायण : काच आणि सिरॅमिकच्या विश्वात..

या संस्थेचे प्रमुख संशोधन म्हणजे ऑप्टिकल ग्लास.

सेन्ट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिटय़ूट, कोलकाता

कोलकाता येथे असलेली सेन्ट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीजीसीआरआय) ही काच व सिरॅमिक या विषयामध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख संशोधन म्हणजे ऑप्टिकल ग्लास. अतिशय अल्प खर्चामध्ये विविध प्रकारच्या ऑप्टिकल ग्लासेस विकसित करण्याच्या तंत्रज्ञानामुळे संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे.

संस्थेविषयी

स्वातंत्र्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक असलेल्या संशोधनाची गरज ओळखून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने संलग्न चार संशोधन संस्थांची स्थापना केली. स्थापना झालेल्या या पहिल्या चार संस्थांपैकी एक म्हणजे कोलकाता येथील सेन्ट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीजीसीआरआय) होय. या संस्थेचे सुरुवातीचे नाव सेन्ट्रल ग्लास अँड सिलिकेट रिसर्च इन्स्टिटय़ूट असे होते. या संशोधन संस्थेचे उद्घाटन दि. २६ ऑगस्ट १९५० रोजी करण्यात आले. तेव्हापासून जवळपास गेली सत्तर वर्षे काच आणि सिरॅमिकमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणे हे काम इथे चालते. या माध्यमातून देशाच्या संरक्षण, आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक गरजांशी संबंधित योग्य तंत्रज्ञान विकसित करता यावे आणि देशातील जनतेला आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक लाभ मिळवता यावेत, हे संस्था स्थापनेमागचे हेतू आहेत.

संशोधनातील योगदान

ही प्रामुख्याने ग्लास अँड सिरॅमिक सायन्स म्हणजे काच आणि सिरॅमिकच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेमध्ये मूलभूत व उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन केले जाते. मुळात ग्लास अँड सिरॅमिक सायन्स हा विषय अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राशी संबंधित आहे. त्यामुळे आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) संस्थेने दिलेले योगदान अधोरेखित होते. ग्लास अँड सिरॅमिक सायन्समधील मूलभूत व उपयोजित संशोधनाव्यतिरिक्त संस्था संशोधन आणि विकास सल्लागार म्हणूनही काम करते. त्यामुळेच सीजीसीआरआय खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी प्रायोजित केलेले संशोधन प्रकल्प हाती घेणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक असलेल्या आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीमध्ये असलेल्या संस्थांचे किंवा उद्योगांचे आर अँड डी प्रोजेक्ट्स पूर्ण करणे, देशविदेशातील अनेक प्रकल्पांसाठी तांत्रिक सल्ला पुरवणे, याबरोबरच पायाभूत संरचनात्मक सेवा जसे की प्रकल्प अभियांत्रिकी, चाचणी आणि मूल्यमापन, प्रशिक्षण आणि शिक्षण, सार्वजनिक क्षेत्रासाठी वैज्ञानिक माहितीचा प्रसार इत्यादींसाठी तांत्रिकदृष्टय़ा सल्लागार संस्था म्हणून काम करणे, अशा स्वरूपाची संशोधनाला चालना देणारी कामे संस्था करते. संस्थेच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र व शैक्षणिक संस्था यांच्या फायद्यासाठी अनेक अर्धवेळ अभ्यासक्रमही चालवले जातात. ऑप्टिकल ग्लास एक लेन्स म्हणून अनेक मोक्याच्या ठिकाणी वापरली जाणारी सामग्री आहे. उदा. परिक्रोप, द्विनेत्री, रेंज-फाइंडर्स, गन साइटस, अग्निशामक दिग्दर्शक, वैज्ञानिक, छायाचित्रण यासाठी ऑप्टिकल ग्लासचा वापर होतो. सर्वेक्षण साधनांमध्ये उदा. सूक्ष्मदर्शक, टेलिस्कोप, कॅमेरे, प्रोजेक्टर, थियोडोलाइट्स इत्यादी ठिकाणी ऑप्टिकल ग्लास वापरली जाते. त्यामुळेच ऑप्टिकल ग्लास व तत्सम सामग्री आयात न करता आपल्याच देशात तिची निर्मिती करणे, त्यासाठी गरजेच्या असलेल्या प्रक्रिया तंत्रज्ञानाची निर्मिती करणे हे उद्देश समोर ठेवूनच नियोजन आयोगाने सीजीसीआरआयला या सर्व गोष्टी विकसित करण्याची विशेष जबाबदारी दिली. अभिमानाची गोष्ट म्हणजे आजतागायत जगातील केवळ काही मोजक्याच देशांमध्ये ऑप्टिकल ग्लास तयार करण्यात आलेली आहे, भारत त्यापैकी एक आहे. कोणत्याही परदेशी सहकार्याशिवाय आवश्यक उपकरणांची रचना आणि बांधणी यासह तंत्रज्ञानाचा तपशील प्रस्थापित करण्यामध्ये सीजीसीआरआय ही संस्था यशस्वी झाली. संस्थेने नैसर्गिक दिसणारे आणि नैसर्गिकरीत्या हलणारे सच्छिद्र कक्षीय रोपण स्वरूपातील कृत्रिम डोळे विकसित केले आहेत. परदेशातील तंत्रज्ञानानुसार कृत्रिम डोळे रोपण करण्याचा एकूण खर्च सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपये येतो तेच तंत्र सीजीसीआरआयने अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये विकसित केले आहे. याच संशोधनाने म्हणजे विविध प्रकारच्या ऑप्टिकल ग्लासेस विकसित करण्याच्या तंत्रज्ञानाने संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशात आणले.

विद्यार्थ्यांसाठी संशोधनातील संधी

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. त्यामुळेच सीजीसीआरआय फक्त संशोधन संस्था न राहता एक प्रमुख शैक्षणिक केंद्र बनून जाते. सीजीसीआरआय अनेक विद्यापीठांशी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादी सारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या परीक्षांमधून गुणवत्ता मिळवलेले अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी इथे पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

संपर्क

सेन्ट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिटय़ूट, १९६, राजा एस.सी.मुलिक मार्ग, कोलकाता,पश्चिम बंगाल-७०००३२.

itsprathamesh@gmail.com

First Published on April 5, 2018 1:23 am

Web Title: csir central glass ceramic research institut