‘सीएसआयआर’ म्हणजेच काऊंसिल ऑफ साइंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने कनिष्ठ संशोधक व प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ नेट पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता परीक्षेअंतर्गत समाविष्ट विषय नेट पात्रता परीक्षेमध्ये केमिकल सायन्सेस, अर्थ, अ‍ॅटमॉस्फेरिक ओशन अ‍ॅण्ड प्लेनिटरी सायन्सेस, लाइफ सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस व फिजिकल सायन्सेस या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी वरील विषयांसह एमएस्सी वा समकक्ष पात्रता अथवा बीएस-एमएस, बीई- बीटेक, बीफार्म वा एमबीबीएस यांसारखी परीक्षा कमीत कमी ५५% गुणांसह (राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०%) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

विशेष सूचना – जे उमेदवार वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

वयोमर्यादा – कनिष्ठ संशोधक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २८ वर्षे असून प्राध्यापक पात्रता परीक्षेसाठी अशी वयोमर्यादा नाही.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची राष्ट्रीय पातळीवर लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. १७ डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येणारी ही निवड पात्रता परीक्षा ३ तास कालावधीची संबंधित विषयावर आधारित व २०० गुणांची असेल. अर्जदारांनी ‘नेट’ पात्रता परीक्षेतील प्राप्त गुणांकाच्या आधारे त्यांची संबंधित पदासाठी निवड करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – प्रवेश अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून खुल्या वर्गगटातील उमेदवारांनी २००० रु., इतर मागासवर्गीय उमेदवारांनी ५०० रु., तर अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांनी २०० रु. प्रवेश शुल्क म्हणून इंडियन बँकेच्या कुठल्याही शाखेत अथवा बँक ट्रान्स्फर पद्धतीने पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – नेट पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १९ ते २५ ऑगस्ट २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली काऊंसिल ऑफ इंडस्ट्रियल रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या www.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१७.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, औषधीनिर्माण यांसारख्या विषयांतील ज्या पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या क्षेत्रात शिक्षण संशोधनविषयक काम करण्यासह आपले करिअर करायचे असेल अशांसाठी नेट पात्रता परीक्षा उपयुक्त ठरेल.