राज्य सेवा पूर्व परीक्षा एप्रिल २०१८ मध्ये होत आहे. परीक्षेच्या तयारीतील वेगवेगळ्या घटकांच्या तयारीबाबत यापूर्वीच्या लेखांमध्ये चर्चा करण्यात आली आहे. चालू घडामोडी हा घटक म्हटले तर वेगळा आणि म्हटले तर इतर घटक विषयांचा संदर्भ असा विचारात घेता येतो. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते की, चालू घडामोडी घटकांत तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

* स्वतंत्र चालू घडामोडी

यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, व्यक्तीविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.

महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी, विक्रम, क्रीडाक्षेत्र, साहित्य, चित्रपट, संगीत, नोबल, मॅगसेसे, पद्म, शांतता पुरस्कार, साहित्य – नाटय़ संमेलने, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांसारखी वेगळी संमेलने, निधन पावलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती, आपल्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांचा ढोबळ मानाने यात समावेश होतो.

*  सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी

यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमधील निर्णय, भारताचे द्वीपक्षीय तसेच संघटना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध, निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे, नसíगक आपत्ती, वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक घटना, खगोलशास्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, आरोग्यविषयक घडामोडी, आíथक विकास दर, वेगवेगळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय निर्देशांक, जनगणना, बँक दर, जीएसटी, आíथक क्षेत्रातील नवे निर्णय, घडामोडी, शासकीय योजना इत्यादी बाबी येतात.

* सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती

खेळांचे नियम, लोकपरंपरा, सर्वात मोठे / लहान भौगोलिक क्षेत्र, प्रसिद्ध व्यक्तींची पुस्तके, शहरांची उपनावे अशासारखे मुद्दे विचारले जाऊ शकतात.

अभ्यासासाठी अशी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिका अभ्यासणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकरिता प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक परीक्षाíथनी जाणून घेणे आवश्यक आहे.

अनेक जागतिक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आíथक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब ‘सामान्य अध्ययन’ प्रश्नपत्रिकेत उमटते. हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे.

राज्यसेवेसहित महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांची काठिण्य पातळी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या काठिण्य पातळीच्या जवळपास जाणारी आहे हे मागील वर्षांच्या प्रश्नप्रत्रिका पाहिल्या की लक्षात येते. ही बाब समजून घेतली तर पूर्व परीक्षा पेपर – १ मधील ‘चालू घडामोडी’ हा घटक गांभीर्याने तयारी करायचा घटक आहे हे लक्षात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रश्नांमध्ये पारंपरिक पलू व चालू घडामोडींचे मिश्रण असते. एकाच प्रश्नात एखाद्या मुद्दय़ाची थिअरी आणि त्याबाबत नुकतीच घडलेली एखादी घटना एकाच वेळी विचारली जाऊ शकते. पूर्व परीक्षेत मात्र बहुविधानी, जोडय़ा जुळवा प्रकारचे प्रश्न डायरेक्ट विचारण्याचे प्रमाण जास्त आहे.

उमेदवारांचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एका विषयाची घडामोडींची माहिती वेगवेगळया दोन-तीन संदर्भ पुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत परीक्षार्थीना हा प्रश्न पडतो. यावर एखादे दुसरे गाइड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही अथवा माहितीस्रोत म्हणून एकाच संदर्भ पुस्तकाचा वापर करणे हे उपयोगाचे ठरत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की, अशा तऱ्हेने अभ्यास केल्यास आपण स्पध्रेत टिकणे कठीण आहे याची जाणीव होते. यासाठी इंग्रजी संदर्भ पुस्तके वापरणाऱ्या उमेदवारांनी ‘इंडिया इयर बुक’, ‘आíथक पाहणी अहवाल’ व ‘अर्थ संकल्प’ यांची प्रत्यक्ष डॉक्युमेंट्स पाहावीत. राज्याचा अर्थसंकल्प व आíथक पाहणी अहवाल मराठी व इंग्रजीतून उपलब्ध होतो. चालू घडामोडीच्या विश्लेषणावर आधारित प्रश्नांच्या तयारीसाठी ‘राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका’ हे पुस्तक उपयोगी ठरेल. नव्या योजना, कायदे यांचा अभ्यास करण्यासाठी योजनेचे संकेतस्थळ व कायद्याची मूळ प्रत पाहावी.

चालू घडामोडींचा आधार राज्यव्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत, इतिहासापासून सामान्य विज्ञानापर्यंत सर्वच विषयांत ठेवून उमेदवाराचे समकालील आकलन जोखण्याचा प्रयत्न आयोगामार्फत केला जातो. बहुतेक प्रश्नांच्या पाश्र्वभूमीला एखादी राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी असते. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एका ‘अनिवार्य’ प्रश्नपत्रिकेइतका महत्त्वाचा विषय आहे.